Saturday, February 06, 2016

मांसाहारी एपफ्लाय.

फुलपाखरे म्ह्टली की ती फुलांना भेटी देणार आणि त्यातला गोड मध पिणार आणि त्यांच्या अळया ह्या अतिशय खादाड आणि झाडांची पाने फस्त करण्यात पटाईत असतात. अर्थात प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसेच काहीसे या फुलपाखरांच्या अळ्यांच्य बाबतीतही होते. या एपफ्ल्याय फुलपाखरांच्या अळ्या चक्क मांसाहारी असतात. आपल्या पिकांना उपद्रवी ठरणाऱ्या मिलीबग आणि स्केल इन्सेक्ट या किटकांवर या एपफ्ल्याय फुलपाखराच्या अळ्या गुजराण करतात. या एपफ्लाय फुलपाखराची मादी ज्या झाडावर हे मिलीबग अथवा स्केल इन्सेक्ट असतात त्या झाडावर अगदी त्या किटकांच्या मधे अंडी घालते. इतर सर्वसाधारण फुलपाखरांच्या अळ्या जश्या दिसतात त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या ह्या फुलपाखरांच्या अळ्या असतात. त्यांना त्या मिलीबग आणि स्केल इन्सेक्ट मधे वावरायचे असल्यामुळे यांचा एकंदर अविर्भाग अगदी त्यांच्यासारखाच असतो. यांचे पाय एकदम लहान असतात, शरीर चपटे आणि आखुड असते आणि त्यावर मेणचट आवरण असते.


हे एपफ्लाय फुलपाखरू आकाराने एकदम लहान असते आणि ते लायसॅनिड किंवा ब्लू या वर्गात येते. पंखांचा वरचा रंग हा गडद तपकीरी असून तो टोकाकडे अधिक गडद होत जातो आणि त्या ठिकाणी तिथे पिवळट रंगाचा एक ठिपका असतो. पंखांच्या खालचा रंग मात्र चकचकीत पांढरा, राखाडी असून त्यावर फिकट राखाडी, तपकीरी रंगाच्या नागमोडी रेघांची नक्षी असते. या पंखावर एक राखाडी रंगाचा ठिपकासुद्धा असतो. या फुलपाखराच्या स्पृशा या टोकाला वळणदार असून गडद भगव्या रंगाच्या असतात. या फुलपाखराला जर का जवळून बघितले तर पटकन नजरेत भरतात ते त्याचे उठावदार हिरवे, पोपटी डोळे. या फुलपाखराचे उडणे अगदी जलद असते आणि एकदम वेडीवाकडी वळणे घेत ते आजूबाजूला उडत रहाते, मधेच पटकन जमिनीलगतच्या झाडांवर बसते आणि लगेच परत उडून गायब होते.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments: