Friday, May 08, 2009

आमचे पण "बेटींग".
फेब्रुवारी, मार्च महिना आला की आपली जंगले सुनसान होऊन जातात. एकतर हा शाळा, कॉलेजचा परिक्षांचा हंगाम असल्यामुळे सगळे गपचुप घरात अभ्यास करत बसलेले असतात आणि जंगलात तशी लोकांची वर्दळ कमी झालेली असते. याचवेळेस जंगलात पानझड झाली असल्यामुळे सबंध जंगल सुके, सुके आणि उघडे बोडके दिसत असते. सर्वत्र फक्त झाडांचे खराटे उरलेले असतात. याच काळात उन्हे प्रचंड तापायला सुरवात झालेली असते. सध्याच्या वर्षीचा उन्हाळा तर म्हणे २०/२५ वर्षांतला सर्वात गरम उन्हाळा आहे. या अशा काळात जर तुम्हाला सांगीतले की चला आपण जंगलात जाउ आणि छान फुलपाखरे बघून येऊ, तर सर्व जण वेड्यात काढतील. पण पावसाळ्यानंतरच्या काळानंतरचा हाच काळ फुलपाखरए बघण्याचा सर्वोत्तम काळ आहे. अर्थात या वेळेस आपल्याला "चिखल पान" करताना फुलपाखरे दिसतात. पण या चिखलपान करणाऱ्या फुलपाखरांच्या जाती अणि त्यांची संख्या खरोखरच विस्मयकारक असते.
कान्हा, रणथंभोरच्या जंगलात कीतीतरी प्राणी, पक्षी दिसत असले तरी जशी आमची नजर वाघाला, बिबळ्याला शोधत असते तसेच काहीसे या चिखलपानाच्या वेळी "राजांचे" होते. चिखलपानाच्या वेळी सुक्या ओढ्यात, ओलसर चिखलावर स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन गल, ईमीग्रंट, झेब्रा ब्लू, लाईन ब्लू, सेलर्स, प्लम जुडी, पॅन्सी अशी अनेल फुलपाखरे येत असली तरी आम्ही वाट बघत असतो तो राजांची. ब्लॅक राजा आणि टॉनी राजा ही वर्षात फक्त याच वेळी दिसणारी फुलपाखरे आहेत. त्यांच्या भन्नाट उडण्याच्या वेगामुळे एरवी ती फक्त सुसाट उडताना दिसली तरच दिसतात. या राजांची अजुन एक खासियत म्हणजे ती नुसत्या चिखलावर सहसा आकर्षित होत नाहीत. जर अती सडलेली फळे, दारू, प्राण्यांची विष्ठा किंवा मुत्र असेल तर त्यांची चंगळ असते आणि फक्त याच वेळेस ती खाली जमिनीवर उतरतात. इतरवेळी एकतर ती सुसाट उडत असतात किंवा झाडवर उंच बसलेली असतात. यातील टॉनी राजा हे अतिशय देखणे आणि आकाराने मोठे असलेले फुलपाखरू आहे. या फुलपाखराच्या पंखांची वरची बाजू उठावदार पिवळसर भगव्या रंगाची असते आणि वरच्या पंखांच्या टोकांना जाड काळी किनार असते. मादी असएल तर या काळ्या किनारीच्या खाली एक पांढरा पट्टा असतो. पंखांची खालची बाजू निळसर पिवळी असते आणि त्यावर चंदेरी झळाळी असते. वरती बारीक तपकीरी, लालसर रेघांची नक्षी असते. यांना छान उठावदार शेपट्यासुद्धा बहाल केलेल्या आहेत.
जंगलात जर का तुम्हाला यांना नैसर्गिक अवस्थेत बघायचे असेल तर एक वेळ जमू शकेल पण त्यांचे छायाचित्रण फारच कठीण आहे. कारण ती उंचाचर उडत असतात आणि त्यांचा वेगसुद्धा ताशी ६० कि.मी. पेक्षा जास्त असतो. यामुळे यांना जर आकर्षित करायचे असेल तर "बेटिंग"च करावे लागते. फळांच्या "बेट" वर साधरणत: ब्लू ओकलीफ, गॉडी बॅरन अश्या जाती आकर्षित होतात पण राजांना आकर्षित करायला दारूत बुडवलेली फळेसुद्धा चालत नाहीत. मोरी माशाचा खास २/३ दिवस सडवलेलेआ तुकडा, कोलंबीची २/३ दिवस पाण्यात कुजवलेली फोलकटे असा अतिघाण वास येणारा ऐवज ठेवला तर ही "राजा" मंडळी क्षणार्धात त्यावर येतात. एकदा का ती "बेट"बर आली की मग मात्र ती तीकडून उडायचे नाव घेत नाहीत आणि तुम्हाला त्यांचे यथेच्छ छायाचित्रण करून देतात. मात्र हे छायाचित्रण करताना प्रचंड दुर्गंधी आपल्याला सहन करावी लागते. साधारणत: २ मिनीटांपेक्षा जास्त तुम्ही तीथे थांबू शकत नाही. थोडेसे बाजूला जाउन, जरा मोकळी हवा घेउन परत त्या ठीकाणी जाउन छायाचित्रण करावे लागते. अर्थात याचा योग्य तो मोबदलासुद्धा आपल्याला छायाचित्राद्वारे मिळतो. अन्यथा यांची अशी छायाचित्रे मिळने केवळ अशक्य असते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

ग्रास डेमन.
पावसाळ्यात ग्रास डेमन हे फुलपाखरू आपल्याला अगदी सहज दिसते आणि ते ओळखण्यासाठीसुद्धा खुप सोपे असते. याचा आकार मध्यम असून त्यांचा रंग काळा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही ठिपक्यांची नक्षी पंखांच्या वर आणि खाली दोनही बाजूंना असते. यांचे नर आणि मादी सारखे दिसत असले तरी यांचा ड्राय सिझन फॉर्म (उन्हाळ्यातील रंगसंगती) थोडासा वेगळा दिसतो. यावेळी त्यांचे पंख थोडेसे पिवळसर असतात आणि त्यावर लालसर तपकिरी रंगाची छटासुद्धा असते. पावसाळ्यात ही फुलपाखरे जेंव्हा पानावर बसतात तेंव्हा ती थोडेसे पंख उघडून बसतात आणि सतत ते पंख असे काही हलवतात की त्यांच्या ठिपक्यांच्या मुळे ते पंख चक्राकार फिरत असल्याचा भास होतो. यासाठी ते त्यांचे खालचे पंख आधी हलवतात आणि ही क्रीया अर्धवट असतानाच वरचे पंखसुद्धा हलवायला सुरवात करतात. या त्यांच्या अजब आणि एकमेव वैशिष्ट्यामुळे त्यांना आपण जर एकदा बघितले तर ती आपण सहज ओळखू शकतो. आपल्या भारतात पंखांची अशी वैशीष्ट्यपुर्ण हालचाल करणारे हे एकमेव फुलपाखरू आहे.
हे फुलपाखरू सहज दिसणारे असले तरी यांची उडण्याची पद्धत जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत जाणारी असते. त्यातून याचा रंग काळा, पांढरा असल्यामुळे झाडीतील दाट काळोखात ती बसली तर पटकन दिसत नाहीत. मात्र यांचा वावर रानहळद, पेव या झाडांच्या आसपास असतो. कारण या जातींवर या फुलपाखराच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालण्यापुर्वी मादी बऱ्याच झाडांचे आधी परिक्षण करते आणि जेंव्हा तीला एखादे झाड योग्य वाटेल तेंव्हाच त्या झाडाच्या पानाखाली आपले पोट वळवून एक लालसर रंगाचे, गुळगुळीत, गोलाकार अंडे घालते. अंडयातून बाहेर आल्यावर अळी प्रथम अंडयाचे टरफल मटकावते आणि नंतर त्या झाडाच्या पानाची एक छोटीशी वळवून आपल्याकरता खोली बनवते. इतर फुलपाखरांच्या अळीप्रमाणे ही अळीसुद्धा खादाड असली तरी थोडीशी लाजाळू असते आणि आपला खाण्याचा प्रोग्राम फक्त रात्रीच उरकते. अळीनंतर कोषसुद्धा त्याच झाडावर होतो आणि त्याचा रंगसुद्धा अळीच्य रंगाशी मिळताजुळता असतो. कोषाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबलचक सोंड. ही सोंड त्यांच्या पंखाच्यासुद्धा बाहेर आलेली असते. अर्थातच प्रौढ फुलपाख्रराची सोंडसुद्धा शरीराच्यामानाने फारच मोठी प्रगत झालेली असते. "स्कीपर" जातीतील हे फुलपाखरू असल्यामुळे त्यांना फुलांतील मध खुप प्रिय असतो आणि त्यातून या लांबलचक सोंडेमुळे त्यांना घंटेसारख्या किंवा खोलगट फुलांतील मधसुद्धा सहज पीता येतो. काही घंटेच्या आकाराच्या अतिखोल फुलातील मध पिण्यासाठी तर या फुलपाखराला आख्खे आत घुसावे लागते आणि याच कारणामुळे त्या फुलांचे परागीभवन शक्य होते जे इतर कुठलाच किटक करू शकत नाही.
सर्वसाधारणपणे नविन छायाचित्रकार फुलपाखरांच्या छायाचित्रणासाठी अलिप्त असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फुलपाखरे खुप चंचल आणि चपळ असतात आणि एका जागी कधीच बसत नाहीत आणी यामुळे त्यांचे छायाचित्रण शक्य होत नाही. मात्र हे काही पुर्ण खरे नाही कारण फुलपाखरे जरी चपळ असली तरी फुलांतील मध पिण्यासाठी ती बराच वेळ फुलांना भेटी देतात आणि जेव्हा ती विश्रांतीसाठी बसतात तेंव्हा सुद्धा त्यांचे छायाचित्रण सहज शक्य होते. अर्थात यासाठी जर का आपला फुलापाखरांचा थोडासा अभ्यास असेल आणि आपल्याला त्यांच्या सवयींबद्द्ल माहिती असेल तर खरोखरच आपल्याला त्यांची छान, आकर्षक छायाचित्रे मिळू शकतात. ही "डेमन" मंडळी स्किपर या फुलपाखरांच्या गटात येतात, हा गट जलद उडण्यासाठी प्रसिद्ध आहे पण त्याच वेळेस फुलांतील मध पिण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या डेमन मधील ग्रास डेमन, रेस्ट्रीक्टेड डेमन आणि बॅंडेड डेमन ही मंडीळी फुलांवर हमखास भेट देतात. घाणेरी, सदाफुली या फुलांवर मध पिण्याकरता तर रानहळद, सोनटक्का यावर अंडी देण्यासाठी ही फुलपाखरे या झाडांच्या आजूबाजूस उडत असतात. त्यामुळे आपण जर का या फुलांच्या आसपास दबा धरून बसलो तर आपल्याला या प्रकारची अनेक छायाचित्रे अगदी कॉम्पॅक्ट कॅमेरानेही सहज मिळू शकतात.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, March 05, 2009

मंकी पझल.
हे एक विचित्र नाव असलेले पण अतिशय छान दिसणारे छोटेसे फुलपाखरू आहे. कुसूमच्या झाडाच्या लालभडक कोवळ्या पानांवर हे आपल्याला मार्च / एप्रीलच्या महिन्यात बसलेले आढळते. हे फुलपाखरू सहसा जमिनीच्या आसपास उडते. पण असे असले तरीही त्याची उडण्याचे पद्धत अतिशय जलद असते आणि त्याच्या पिवळ्या, काळ्या रंगामुळे ते उडताना कळतसुद्धा नाही. बऱ्याच वेळेला सकाळच्या कोवळ्या उन्हात ते पानांवर पंख उघडून बसलेले आढळते. याचा आकार इतर "ब्लू" फुलपाखरांप्रमाणेच अतिशय लहान असतो. पंखांची वरची बाजू गडद तपकीरी असते आणि वरच्या बाजूला पांढरट / पिवळट २-३ ठिपके असतात. खालच्या पंखाच्या वरच्या बाजूला पिवळसर ठिपक्यांची किनार असते णि ३ शेपट्या असतात. पंखाच्या खालच्या बाजूला मात्र असमान नक्षी असते. मुख्य रंग तपकीरी पिवळा असला तरी काळ्या पांढऱ्या रेषांची नक्षी त्यावर असते.
फुलपाखरांची "ब्लू" ही जात जगात संख्येने जवळपास सर्वात मोठी म्हणून मानली जाते. आज भारतातसुद्धा यांच्या ४५०हून अधीक उपजाती सापडतात. ही फुलपाखरे आकाराने छोटी असतात. सर्वसाधारणपणे यांच्या पंखांचा वरचा रंग नीळा किंवा जांभळा असतो म्हणून यांना "ब्लू" असे म्हणतात. यांच्यात नरांचे आणि माद्यांचे रंग वेगवेगळे असतात आणि नरांचे रंग अधीक गडद आणि झळाळणारे असतात. त्याचप्रमाणे हवामान आणि ऋतूंप्रमाणे यांचे रंग बदलतात किंवा कमी अधीक गडद होतात. बऱ्याच उपजातींचे नर हे कोवळ्या उन्हात आपले पंख उघडून बसलेले दिसतात. ही फुलपाखरे फुलांवर आकर्षीत होतात पण त्याच वेळेला काही उपजाती मेलेल्या प्राण्यांवर, त्यांच्या विष्ठेवर, झाडाच्या डिंकावर पण आकर्षीत होतात.
ही फुलपाखरे नाजूक, चिमुकली असली तरी त्यांना पण शत्रू असतात, आणि त्यांच्यापासून बचाव करायला त्यांच्याकडे काही खास युक्त्या आहेत. पहिली युक्ती म्हणजे त्यांच्या पंखांच्या टोकाला असणाया शेपट्या. या शेपट्या, त्या बाजूला असणारी ठिपक्यांची डोळ्यासारखी दिसणारी नक्षी यामुळे तो भाग एकदम डोक्यासारखा भासतो. ही फुलपाखरेसुद्धा बसताना या शेपट्या एकसारख्या हलवत रहातात यामुळे तो पंखाचा शेवटचा भाग त्याच्या डोक्यासारखा दिसतो आणि शेपट्या ह्या स्पृशांसारख्या वाटतात. यामुळे भक्षक खऱ्या डोक्याकडे हल्ला न करता ह्या खोट्या डोक्याकडे करतो आणि त्याच्या तोंडी फक्त पंखाचा काही भाग लागतो, आणि फुलपाखराचा जीव वाचतो. दुसरी युक्ती म्हणजे काही उपजातींच्या अळ्या ह्या मुंग्याबरोबर रहातात. या अळ्यांच्या शरीरावर एक गोड द्राव देणारी ग्रंथी असते. हा द्राव मुंग्यांना आकर्षीत करतो, म्हणून या मुंग्या ह्या अळ्यांना संपुर्ण संरक्षण देतात आणि त्याबदल्यात त्यांना या अळ्यांकडून हा गोड द्राव मिळतो. या प्रकारच्या सहजीवनामुळे दोनही कीटकांचा आपापसात फायदा होतो.
अतिशय दिमाखदार आणि देखण्या अश्या या फुलपाखराला जंगलात शोधता शोधता मात्र नाकी नऊ येतात. आकार एकदम लहान, जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत उडण्याची सवय आणि निसर्गात लपणारे रंग यामुळे ते पटकन सापडत नाही. जरी सापडले तरी ते छायाचित्र काढायच्या आत इतक्या वेगाने तिकडून उडून जाते की आपण त्याल फक्त "कुठे गेले कुठे गेले" म्हणून शोधत रहातो. मला आतापर्यंत यांची अनेक छायाचित्रे मिळाली पण त्याचे पंख उघडलेल्या स्थितीत काही छायाचित्र मिळत नव्हते. जरा त्यांच्या जवळ गेलो की ते लगेच एकतर पंख बंद तरी करायचे किंवा अर्धे पंख मिटून घ्यायचे. मात्र जेंव्हा दिवाळीच्या दिवसात आंबोलीला गेलो असताना तिकडच्या जंगलात जरा आत गेल्यावर, थंडी जबरदस्त असल्यामुळे वन खात्याच्या नर्सरीमधे ही फुलपाखरे मोठया प्रमाणावर पंख उघडून दिसली. दोन वर्षापुर्वी तर नागलाच्या जंगलात फिरताना मला हे फुलपाखरू दिसले, त्याची उडण्याची पद्धत जरा वेगळी वाटत होती आणि ते त्याच्या अन्नझाडाच्या आसपास घोटाळत उडत होते. बहुतेक ती मादी असून ती अंडे घालायला योग्य ती जागा शोधतेय असा अंदाज मी बांधला आणि खरोखरच तीने आपले पोट वक्राकार करून एक / दोन अंडी त्या झाडाच्या लालचुटूक पानावर घातली. हे सगळे इतके काही क्षणार्धात झाले के काही कळायच्या आत ते फुलपाखरू तिकडून उडून गेले होते, अर्थात मी आणि माझा कॅमेरा तयार असल्यामुळे मला एकतरी छायाचित्र जरूर मिळाले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, February 03, 2009

परोपजीवन.
परोपजीवन म्हटले की आपल्याला लगेच झाडांवरची बांडगुळे आठवतात. मात्र फुलपाखरासारख्या नाजूक आणि गोंडस किटकावरसुद्धा जगणारे बरेच परोपजीवी किटक आहेत. फुलपाखरांच्या अळ्या ह्या अशा परोपजीवी किटकांना पटकन बळी पडतात कारण त्यांची रचना ही परोपजीवी किटक वाढायला उपयोगी असते. एरवी यजमान आणि परोपजीवी प्राणी किंवा झाड दोघेही जगतात. मात्र फुलपाखरांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांच्यात यजमान अळी किंवा कोष हमखास मरतो आणि परोपजीवी किटक अगदी आनंदात आपली प्रजा वाढवतात. ह्या परोपजीवी माश्यांच्या यजमान अळ्या ठरलेल्या असतात. विशीष्ट्य जातीच्या अळ्यांवरच ते आपली अंडी अथवा कोष करतात. ब्रॅकोनिडी कुळातील माशी फुलपाखराच्या अळीला एक सूक्ष्म छिद्र पाडून त्यात अंडी घालतात. ही अंडी टाकायला त्यांच्याकडे तीक्ष्ण असा सुईसारखा अवयव त्यांच्या पोटाच्या टोकाशी असतो. ही अंडी आतल्या आत उबून आत अळीचे मांस अन्न म्हणून खायला सुरूवात करतात. प्रथम ते चरबी खातात, मग ते पचनसंस्था, मज्जासंस्था यांच्यावर हल्ला चढवतात. अशाप्रकारे ती फुलपाखराची अळी मरून जाते अथवा मलूल होते. यानंतर त्या अळ्या उरलेले मांस खातात आणि पुर्ण वाढ झाल्यावर तिथेच त्या अळीच्या मृत शरीरावर किंवा बाजूला सोनेरी किंवा पांढरे तांदळाच्या दाण्याएवढे कोष करतात. यथावकाश त्यातून त्या परोपजीवी माश्या बाहेर येतात.
टॅचनिडी कुळातील परोपजीवी माश्यासुद्धा काहीशी अशीच पद्धत वापरतात. पण जास्तीकरून त्या त्यांची अंडी अथवा अळ्या ह्या फुलपाखराच्या अळीच्या अन्नझाडावर टाकतात. मग या परोपजीवी अळ्या यजमान अळीला चिकटतात आणि स्वत:च तिच्या शरीरात शिरतात. माईटस जातीचे परोपजीवी किटक बाहेर राहून अळीच्या शरीरातील रस शोषून घेतात. कधी कधी कोषांनासुद्धा ह्या माश्या टोचून त्यात अंडी घालतात. ह्या परोपजीवी किटकांबरोबरच अळ्यांना इतरही रोग होऊ शकतात. बऱ्याचदा अळ्या मरगळलेल्या आणि सुरकुतलेल्या अवस्थेत टांगलेल्या दिसतात किंवा त्यांच्या शरीरातून एक चिकट द्राव आलेला दिसतो. असे होण्याची बरीच कारणे असू शकतात. एकाच झाडावर अळ्यांची जास्त गर्दी, अस्वच्छता, ओले खाणे अथवा उपासमार यामुळे असे रोग होतात. काही अळ्यांना व्हायरसमुळे किंवा बुरशीजन्य रोगसुद्धा होतात. ह्या सर्वांवर मात करूनही काही अळ्या यशस्वीपणे कोष करून मग त्यातून प्रौढ फुलपाखारू बाहेर येते आणि याच कारणासाठी मादीने जरूरीपेक्षा जास्त अंडी घातलेली असतात.
फुलपाखरांवर घडणाऱ्या या परोपजीवनाची छायाचित्रे निसर्गात क्वचीतच आणि नशीबाने मिळतात. सोबतच्या छायाचित्रात दिसणाऱ्या कॉमन नवाबच्या हिरव्या अळीच्या शरीरातून बाहेर येउन परोपजीवी माशीच्या पिवळसर अळ्या कापसासारख्या धाग्यांनी कोष विणत आहेत. त्यांनी एवढ्या सफाईने कॉमन नवाबच्या अळीचे शरीर खाल्ले होते की त्या तिचे शरीर फाडून बाहेर आल्यवरसुद्धा पुढे कित्येक वेळ ती अळी जिवंतच होती. असे होण्यासाठी या परोपजीवी अळ्यांचा जीवनक्रम एवढा जलद वाढतो की नवाबची अळी कोष करण्याच्या आधी त्यांना त्यांचा कोष करायचा असतो. त्यांचा कोषसुद्धा होतो तो नवाबच्या अळीच्या शरीराखालीच, बीचारी ती अळी मात्र त्यांच्या कोषावर मलूलपणे बसून रहाते. एकदा लिंबाच्या झाडावर लाईम जातीच्या फुलपाखराने कोष केला. काही दिवसानंतर कोष काहीसा काळपट झाला अर्थात दुसऱ्या दिवशी ते फुलपाखरू कोषातून बाहेर येण्याची ती लक्षणे होती. मी पहाटेपासून कोषावर लक्ष ठेवून बसलो होतो. मात्र कोषातून छानसे पिवळ्या, काळ्या रंगाचे फुलपाखरू बाहेर यायच्या ऐवजी अतिशय बारक्या काळ्या रंगाच्या माश्या एका छोट्या भोकातून बाहेर यायला लागल्या. त्या एका कोषातून २७ परोपजीवी माश्या त्या सकाळी बाहेर आल्या आणि मला मात्र फुलपाखराऐवजे त्या छोट्या माश्यांचीच बाहेर येतानाची अनेक छायाचित्रे मिळाली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Friday, January 09, 2009

राजबिंडा ब्लॅक राजा.
एप्रिल, मे महिना आला की उन्हाची तलखी वाढायला लागते. आपल्या इकडच्या पानगळीच्या जंगलात जाताना दहावेळा विचार करावा लागतो कारण सर्वच मोठ्या झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि लहानसहान खुरटी झुडपे, गवत पुर्ण वाळून गेलेले असते. पक्षिनिरिक्षणासाठी आणि फुलपाखरांसाठी मात्र हा उत्तम काळ असतो. वाळक्या बिनपानांच्या झाडांत रंगीबेरंगी पक्षी सहज दिसतात. अगदी त्यांच्या आवाज आला आला तरी पर्णहीन झाडांवर त्यांना शोधणे सोपे जाते. या पक्ष्यांबरोबरच फुलपाखरांकरतासुद्धा हा काळ योग्यच असतो. बऱ्याच ओढ्यांच्या जागा, धबधब्यांच्या ठिकाणे वाळायला लागलेली असतात. पाण्याचे प्रमाण कमी असते आणि काही ठिकाणी चिखल सुकायला लागला असतो. हेच ठिकाण ह्या फुलपाखरांकरता योग्य असते. खुपशा फुलपाखरांच्या जातीतील नर अश्या ठिकाणी "चिखलपान" करायला एकत्र जमतात. एकत्र म्हणजे अक्षरश: ती शेकड्याने एकत्र, एकाच ठिकाणी जमलेली असतात. फुलपाखरांची वास घ्यायची क्षमता जबरदस्त असते आणि याच कारणामुळे ती जास्त मध असलेल्या फुलांवर लगेच आकर्षित होतात. याच मुळे ती या ओलसर चिखलावर पण आकर्षित होतात. ह्या चिखलात त्यांना पोषक अशी क्षारद्रव्ये मिळतात जी त्यांना फुलांतील मधापासून मिळत नाहीत.
बऱ्याच वेळेला नेहेमी जलद उडणारी फुलपाखरे यावेळी चिखलपान करताना आपल्याला अगदी शांत बसलेली आढळतात. याचबरोबर इतर वेळी न आढळणारी पण याच वेळेस दिसणारी स्पॉटेड स्वोर्डटेल, ब्लॅक ऍंगल अशी फुलपाखरे दिसतात. या सगळ्या फुलपाखरांबरोबर माझी नजर कायम शोधत असते ती "राजा" फुलपाखरांना. आपल्याकडे "टॉनी राजा" आणि "ब्लॅक राजा" असे दोन प्रकार दिसतात. दोघेही भन्नाट वेगाने उडणारे आणि बघता बघता होत्याचे नव्हते होणारे. ही फुलपाखरे तशी सहसा शहरात दिसत नाहीत. घनदाट जंगलांमधेच दिसली तर फार कमी वेळा दिसतात. या दोनही राजांना अतिपक्व फळे, मादक द्रव्ये, कुजलेली फळे / मांस यांची फार ओढ असते. त्यामुळे असे काही पदार्थ असतील तर त्यावर ती लगेच आकर्षित होतात आणि अश्या वेळेस त्यांचे छान छायाचित्रण होऊ शकते. हे ब्लॅक राजा फुलपाखरू खरोखरच राजा नावाला साजेसे असते. त्यांचे खालचे पंख चमकदार पांढऱ्या, राखी रंगाचे असतात आणि त्यावर निळसर झळाळी असते. ह्या पांढऱ्या रंगावर उठावदार पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. वरून मात्र हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून त्यावर ठळक पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांच्या रांगा असतात. सर्वात आकर्षक आणि राजाला शोभणाऱ्या म्हणजे याच्या खालच्या पंखांवर दोन दिमाखदार शेपट्या असतात. ज्या त्याच्या राजबिंड्या रूपात कायम भर घालतात. त्याच्या भन्नाट उडण्याच्या वेगामुळे आणि निसर्गाशी समरूप होणाऱ्या रंगामुळे ते एरवी पटकन दिसून येत नाहीत.
गेल्या वर्षी आम्ही नेलेल्या "फ्रुट बेट" वर एक ब्लॅक राजा आकर्षित झाले आणि आम्हाला त्याची बरीच छायाचित्रे मिळाली. मात्र या वर्षी माहिम निसर्ग उद्यानात माझ्या नेल्सन नावाच्या मित्राला एका झाडावर ७ ब्लॅक राजा एकाच ठिकाणी टिपता आले. त्याचे ते छायाचित्र अप्रतिम होते पण लगोलग आम्ही येऊरला गेलो असताना आम्हाला एक ब्लॅक राजा आकर्षित झालेले दिसले त्याचे छायाचित्रण करत असतानाच अजून दुसरे दोन ब्लॅक राजा आले आणि त्याच जागी बसले आणि मग मलासुद्धा एकाच वेळी तीन तीन ब्लॅक राजांची छायाचित्रे मिळाली. ती त्यांच्या रसपाना एवढी दंग होती की मी त्यातल्या एकाला हळूच बोटावर घेतले तरी त्याला त्याचे काही भान नव्हते. इतरांनी त्याची माझ्या बोटावर अगदी जवळून छायाचित्रे घेतल्यावर मी त्याला माझ्या मित्राच्या बोटावर सरकावले तरीही ते तिथेच स्थीर होते. इतरवेळी सुसाट वेगाने जाणारे हेच ते फुलपाखरू ह्यावर विश्वास बसत नव्हता. या नंतर तर तो मित्र त्याच्या कॅमेरात त्या फुलपाखराचे छायाचित्रण करताना त्याच्या लेन्समधे त्या ब्लॅक राजाचे प्रतिबिंब आणि पुढे ते बोटावरचे फुलपाखरू असेही छायाचित्र मला मिळवता आले.
युवराज गुर्जर.
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, January 06, 2009

फुलपाखराशी झटापट.
सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते. पण वेळप्रसंगी ते इतर कोळी एवढेच नव्हे तर त्यांच्याच जातीतील अशक्त कोळ्यांवरसुद्धा ताव मारायला पुढेमागे बघत नाहीत. सर्वसाधारणपणे कोळी जरी असले लहानसहान भक्ष्य खात असले तरी काही जातीचे कोळी हे बेडूक, सरडे, उंदीर आणी लहान पक्ष्यांचीसुद्धा शिकार करतात. कोळ्यांचे तोंड हे फक्त द्रव पदार्थ पिण्याकरता खास बनलेले असते. भक्ष्याच्या शरीरातील सर्व जीवनरस हा त्याच्या खास मुखावयातून शोषला जातो. अर्थातच हा द्रव पदार्थ ते पीत असल्यामुळे त्यांना खास वेगळे असे पाणी अगदी कमी लागते. कोळी जरी खादाड असले तरी प्रसंगी मोठ्या काळाकरता ते सहज उपास सोसू शकतात. कोळी त्यांच्या धारदार आणि तिक्ष्ण सुळ्यांनी भक्ष्याच्या शरीरात विष पसरवतात आणि त्यांना बेशुद्ध करून मग त्यांच्यावर ताव मारतात.
जाळे विणणाऱ्या कोळ्यांमधे जेंव्हा जाळ्यात किटक सापडतो तेंव्हा कोळी आधी खात्री करू घेतो की ते त्याच्यासाठी योग्य खाद्य आहे की नाही. जर एखादी विषारी गांधीलमाशी सारखी माशी कोळ्याच्या जाळ्यात अडकली तर कोळी सावधपणे जाउन, तीच्यामधे योग्य अंतर ठेवून तीला जाळ्यातून हळूहळू सोडवण्याच्या प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला चविष्ट नसलेले किटक किंवा विषारी, अखाद्य फुलपाखरे जाळ्यार अडकतात तेंव्हासुद्धा त्यांना न चावता त्यांना हळूहळू जाळ्यातून सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. यामुळे त्याचे उपयोगी रेषमाचे धागे आणि विष यांची बचत होते. खाण्याजोग्या फुलपाखरांना मात्र लगेचच दुसऱ्या प्रकारच्या जाळ्याने वेटोळे घातले जातात आणि नंतर सावकाश भुख लागल्यावर त्याच्यावर ताव मारला जातो.
कुठल्या जातीचा किटक जाळ्यात सापडला आहे याच्यावरूनसुद्धा त्याला कुठे आणि कसे चावे घ्यायचे हे ठरलेले असते. गांधीलमाशी असेल तर तीला डंख करणारा काटा पोटाला असतो, तिथे चावा घेतला जातो. मधमाशी असेल तर तीच्या तोंडाचा चावा घेतला जातो. लाथा मारणारा नाकतोडा असेल तर त्याच्या लांब पायाचा चावा आधी घेतला जातो. पण त्याच वेळेला जर पतंग किंवा घरमाशी असे निरूपद्रवी भक्ष्य असेल तर थेट त्याच्या धडाचा आधी चावा घेतला जातो. जाळे बनवणारे कोळी अश्या प्रकारे शिकार करतात पण फुलात लपून रहाणारा "क्रॅब स्पायडर" हे त्याच्या रंगामुळे आजूबाजूला मिसळून जातात आणि मग तीथे आकर्षित होणाऱ्या किटकावर हल्ला करतात. जमीनीवर रहाणारे कोळी धावत जाउन, उडी मारून इतर किटक, मुंग्या ह्यांना पकडून त्यांची शिकार करतात.
बऱ्याच वेळेला फुलपाखरांचे छायाचित्रण करताना त्यांच्यावर ताव मारणारे, त्यांची शिकार करणारे कोळी बघायला मिळतात. येऊरच्या जंगलात सुंदर, रंगीबेरंगी "कॉमन जझबेल" या फुलपाखराचे छायाचित्रण करत होतो. अचानक ते फुलपाखरू घाणेरीच्या झुडपात बांधलेल्या मोठ्या "जायंट वूड स्पायडर"च्या जाळ्यात अडकले. त्या कोळ्याची भलीमोठी मादी जाळ्यावर त्या फुलपाखराच्या धडपडीची स्पंदने जाणवून लगेचच धावून आली आणि काही सेकंदातच त्याला दुसऱ्या चिकट रेषमाच्या धाग्यांनी वेढून टाकले. फक्त काही सेकंद चाललेला हा शिकारीचा खेळ खरोखरच थरारक होता. दुसऱ्या छायाचित्रात दिसणारे "ग्लासी टायगर" जातीचे फुलपाखरू फुलावर आकर्षित झाले होते पण त्याची हालचाल थोडी वेगळी जाणवत होती. जवळ जाउन निरीक्षण केले तेंव्हा कळले की त्या फुलाच्य खाली "क्रॅब स्पायडर" लपला होता आणि त्याने त्या आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या फुलपाखराला पकडले होते. काहे सेकंदातच त्या फुलपाख्रराच्या शरीरातील सर्व जीवनरस शोषून घेतला आणि फोलकटासारखे उरलेले त्याचे पंख खाली सोडून दिले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


Monday, January 05, 2009

चिमुकल्यांचे स्थलांतर.
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते. आज जगात बरेच पक्षी, मोठे प्राणी, मासे स्थलांतर करतात पण अतिशय चिमुकली, नाजुकशी फुलपाखरेसुद्धा स्थलांतर करतात हे बऱ्याच जणांना कदाचित नवीन असेल. लहान आणि नाजुकसुद्धा असणारे हे किटक प्रचंड लां अंतराचेसुद्धा स्थलांतर सहजासहजी करतात. पण तरीसुद्धा पक्ष्यांचे स्थलांतर आणि फुलपाखरांचे स्थलांतर यात थोडा फरक आहेच. पक्ष्यांचे स्थलांतर दुमार्गी असते तर फुलपाखरांचे एकमार्गी असते. पक्ष्यांसारखी फुलपाखरे परत त्यांच्या जन्मस्थळाला भेट देत नाहीत. पण तरीसुद्धा ही नाजुकशी फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात एकदाच स्थलांतर करतात आणि हे अंतर अगदी २ कि.मी. पासुन ३००० कि.मी. पर्यंत लांब असू शकते. तापमानातील आणि आर्द्रतेतील बदल, अन्नझाडांची कमतरता आणि अचानक वाढणारी संख्या ही फुलपाखरांच्या स्थलांतराची मुख्य कारणे असू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे.
पक्ष्यांमधे अथवा प्राण्यांमधे स्थलांतराचा अभ्यास करणे तसे सोपे असते कारण एकतर ते आकाराने मोठे असतात, त्यांचे आयुष्य जास्त असते आणि दरवर्षी नित्यतियमाने ते त्याच त्याच जागी परत येतात. पण फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते. त्यांची पुढची पीढी परत उत्तरेकडे उडत येते. या स्थलांतराच्या उड्डाणाकरता ही फुलपाखरे सहसा एकाचे दिशेने दोन भौगोलीक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सुर्यप्रकाश चांगला असे त्या दिवशी होतात. या सुर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती उर्जा मिळते. या स्थलांतराकरता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उदायचे हे कसे ठरवतात आणि जाण्याच्यी ठिकाणी त्यांच्या अळ्यांना भरपुर अन्नझाडे उपलब्ध आहेत की नाही हे त्यांना कसे कळते याचे कोडे काही अजुन पर्यंत उलगडलेले नाही.
आपल्या भारतातसुद्धा दोन प्रकारचे फुलपाखरांचे स्थलांतर बघायला मिळते. पहिल्या प्रकारात एकाच जातीची हजारो फुलपाखरे एकाच दिशेने उडताना दिसतात. यामधे मिल्कवीड आणि व्हाईट्स जातीची फुलापाखरे जास्त असतात. हा उडण्याचा काळ किंवा हंगाम अनिश्चीत असतो. दुसऱ्या प्रकारात हवामानात प्रतिकुल बदल झाल्यामुळे फुलपाखरे दुसरीकडे जातात. या प्रकारात सहसा त्यांची संख्या कमी असते आणि ही डोंगराळ प्रदेशातून खालच्या बाजूस उडतात. अतिथंड हवामान किंवा प्रचंड पाउस हेच याचे मुख्य कारण असते. आज भारतात जवळपास ६० जातीची फुलपाखरे स्थलांतर करतात अशी नोंद आहे. यात प्रामुख्याने कॉमन क्रो, स्ट्राईप्ड टायगर, ब्लु टायगर, डार्क ब्लु टायगर, पी ब्लु, कॉमन अल्बाट्रॉस या जाती आहेत. आज परदेशात फुलपाखरांच्या स्थलांतराच्या वेळी फुलपाखरांचे तज्ञ अक्षरश: ग्लायडर विमान घेउन त्यांचा मागोवा घेतात. पण सध्यातरी आपल्याकडे अश्या सोयीही नाहीत आणि असे लोकही नाहीत. तरीसुद्धा अगदी अलीकडे दक्षिण भारतात यावर जोरात काम सुरू झाले आहे आणि लवकरच त्या अभ्यासाचा, नोंदींचा आपल्या सर्वांना फायदा होइल.
आज भारतात या फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यास न झाल्यामुळे त्यांची काही ठोस दिशा, वेळ आणि काळ आपल्याला माहित नाही. त्यामुळे या स्थलांतरचे छायाचित्रण म्हणजे मोठे कठिणच काम आहे. पण जर का तुम्ही हिवाळ्यात जंगलात फिरायला गेलात आणि तुम्हाला यदाकदाचीत ही स्थलांतर करणारी फुलपाखरे दिसली तर मात्र त्यांचे छायाचित्रण करायचा मजा येते. याचे कारण एरवी आपल्याला एखाद दुसरे फुलपाखरू दिसते पण यावेळी मात्र हजारो फुलपाखरे एकाच वेळेस त्या जागी आपल्याकरता उपलब्ध असतात आणि या हजारो उडणाऱ्या, बसलेल्या फुलपाखरांपैकी कोणाचे छायाचित्र काढू ? असाच प्रश्न कायम पडतो. एकाच झाडावर बसलेली अगदी शेकडो फुलपाखरे मी आंबोली, वेळास, फणसाड, येऊर येथे बघीतली आहेत. त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर त्यातली बरीचशी उडतात पण तरीसुद्धा तुमच्या "फ्रेम"मधे १०/१२ फुलपाखरे तरी हमखास येणारच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, January 01, 2009

या कोषामागे दडलय काय ?
काही किटक त्यांच्या आयुष्यामधे संपुर्ण अवस्थांतर करतात. याचा अर्थ असा की त्यांच्या अयुष्यातील एकंदर जीवन अवस्थांमधली कुठलीही अवस्था दुसऱ्या अवस्थांसारखी नसते. या किटकांची लहान पिल्ले ही त्यांच्या पालकांपेक्षा आकाराने, रंगाने, रूपाने एकदम वेगळी दिसणारी असतात. फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या बाबतीत असेच घडते. फुलपाखराची मादी अंडी घालते ती अंडी एकदम वेगवेगळ्या आकाराची, रंगाची असतात. त्यानंतर त्यातून बाहेर येणारी अळी ही तर वेगळेच रंग असलेली असते. ही अळी वाढता वाढता पाच वेळा कात टाकते आणि त्यानंतर तीचा वेगळ्याच आकाराचा, रंगाचा कोष होतो. हा कोष मात्र बिलकुल वाढत नाही आणि हालचालही करत नाही. काही दिवसानंतर या कोषातून एक सुंदर, नाजूक पण वेगळ्याच रंगाचे फुलपाखरू बाहेर येते.
असेच हे "टॉनी कोस्टर" फुलपाखरू नुकतेच कोषातून बाहेर येत आहे. याचा रंग त्याच्या काटेरी, लालसर तपकीरी अळीपेक्षा कीतीतरी वेगळा आहे. जरी याचे पंख पुर्ण उलगडलेले नाहीत, सुकलेले नाहीत तरी त्याचा रंग पिवळसर भगवा आहे आणि त्यावर पांढरे, काळे ठिपके आहेत हे स्पष्ट दिसत आहे. साधारणत: महिन्याभरापुर्वी हे एक अतिशय बारके पिवळसर अंड्याच्या स्वरूपात होते. त्यानंतर त्यातून अळी बाहेर आली आणि तीने तीच्या कवचावरच उच्च प्रतीच्या प्रथीनांकरता ताव मारला. या जातीची फुलपाखरे कृष्णकमळाच्या वेलीवर मोठ्या संख्येने अंडी घालतात. बऱ्याच वेळा त्यातून एकाच वेळेस अळ्या बाहेर येतात आणि त्याच पानावर काही काळ रहातात. या वेळेस त्या पानाचा वरचा नाजूक पापुद्रा खाउन ते दिवस काढतात. काही दिवसानंतर मात्र त्या स्वतंत्र, वेगळ्या होऊन नवीन पानावर जातात आणि एकट्या रहातात. ही लालसर काळपट दिसणारी अळी प्रचंड खादाड असते आणि अक्षरश: पानामागून पान आणि फांदीमागून फांदी संपवत जाते.
यांचा कोष मात्र दिसायला अतिशय सुंदर असतो. फांदीवर लटकणारा हा कोष जेमतेम पाउण इंचाएवढा लांब असतो. याचा रंग परत वेगळा आणि फिकट गुलबट, पांढरा असतो आणि त्यावर काळ्या रेघांची नक्षी असते. त्यावर भगवे बारीक ठिपकेसुद्धा असतात. अंदाजे ७/८ दिवस हा कोष वेलीवर उलटा लटकत असतो. ज्या दिवशी फुलपाखरू बाहेर येणार त्याच्या आदल्या दिवशी हा कोष काळपट होतो. त्याचे बाह्याआवरण पारदर्शक होते आणि आतल्या पंखांचा रंग, आणि अवयव स्पष्ट दिसू लागतात.
बदलापुरला मला ह्या फुलपाखराचा संपुर्ण जीवनक्रम एका दिवसात एकाच वेळेस अचानक दिसला. कृष्णकमळाच्या वेलीचा एक मोठा मांडव होता. तिथे एका ठिकाणी कोषातून नुकतेच फुलपाखरू बाहेर आले होते. नंतर आजूबाजूला बारकाईने बघीतले तर काही पानांवर पिवळसर अंड्यांचे पुंजकेच पुंजके मला दिसले. काही पानांवर अर्धी अंडी शाबूत होती तर अर्ध्या अंड्यातून अळ्या नुकत्याच वळवळत बाहेर आल्या होत्या. इतर काही पानांवर वेगवेगळ्या अवस्थांमधील अळ्या, वेगवेगळ्या आकारात होत्या. काही काही अळ्यांनी नुकतीच कात टाकलेली होती आणि त्यांचे चमकदार रंग आणि बाजूला जुनी कातही तशीच दिसत होती. पलीकडे एका फांदीवर ह्या जातीच्या फुलपाखरांची जोडी मिलनावस्थेमधे दिसली. मांडवाच्या खालच्या बाजूला एक मादी आपले पोट वळवून अंडी घालतानासुद्धा दिसत होती. एकाच दिवशी ह्या फुलपाखरांच्या सर्व अवस्था आणि जिवनक्रम एकाच ठिकाणी दिसणे म्हणजे खरोखरच नवलाची गोष्ट होती.
नंतर यातला कोष घरी आणून त्यातून फुलपाखरू बाहेर येतानाचे छायाचित्रण करायाला दिवाळीच्या दिवशी अक्षरश: पहाटे पाचला उठून बसलो. अंदाजे सव्वा सातच्या सुमारास हलकेच तो कोष फाटून ते फुलपाखरू बाहेर आले आणि त्याने पंखांची उघडमीट केली. त्यावेळेस ते पंख ओले आणि आक्रसलेले होते. ज्या क्षणाची मी दोन अडीच तास वाट बघीतली ते फुलपाखरू बाहेर येणे मात्र काही सेकंदातच पार पडले आणि जेमतेम काही छायाचित्रे मिळाली. अर्थातच एका स्थीर कोषातून ते चळवळे फुलपाखरू बाहेर येताना बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव मला आणि माझ्या कॅमेरालाही होता.
युवराज गुर्जर.

http://www.yuwarajgurjar.com/

फुलपाखरांचा व्हॅलेंटाईन डे.
फुलपाखरे लहान, नाजूक आणि तशी अल्पायुषी असल्यामुळे त्यांना त्यांचा वंश पुढे वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो. या थोडक्या वेळातच नराला योग्य त्या मादीला शोधून तीला स्वत:कडे आकर्षित करून मिलन करायचे असते. अर्थातच त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा हा व्हॅलेंटाईन जरी "डे" नसला तरी हा काळ महत्वाचा असतो. आपल्या जातीच्या, योग्य आणि मिलनास तयार मादीला शोधण्यासाठी नर गोन मार्ग अवलंबतात. एक तर ते उंच फांदीवर जाउन टेहेळणी करतात. यामुळे ते आजुबाजुने जाणाऱ्या माद्यांवर लक्ष ठेवतात आणि त्याच वेळेस दुसरा कोणी प्रतिस्पर्धी घुसखोर नर त्यांच्या या हद्दीत येत नाही ना हे सुद्धा पहातात. दुसऱ्या मार्गामधे नर आजुबाजुला जीथे त्याला माद्या मिळण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणांना भेटी देत रहातात. जर का या दोनही मार्गांमुळे त्याला मादी दिसली तर त्याचे पुढचे काम सुरू होते. मादी दिसली की त्याचे अर्धे काम झाले असले तरी त्याला योग्य जात, लिंग, मादी मिलनास तयार आहे की नाही याची शहानिशा करावी लागते. त्याचप्रमाणे मादीसुद्धा नर मिलनास तयार असेल तर नर योग्य आकाराचा, उठावदार रंगाचा आणि वासाचा आहे की नाही हे पडताळून बघते.
प्रत्यक्ष बघून जरी नर मादी शोधत असला तरी बऱ्याच वेळेस त्यांच्या शरीरातून प्रसरण झालेल्या संप्रेरकांमुळे त्यांना योग्य तो "सिग्नल" मिळतो. या करता उडणारे नर आजुबाजुने जाणाऱ्या माद्यांच्या आसपास उडत रहातात. यामुळे मादीला संप्रेरकांचा वास येउन जर ती मिलनास तयार असेल तर थांबते आणि जवळपास उतरते. नर तीच्या आसपास उडत रहातो आणि तीच्या पंखांना, पायांना, स्पर्शीकांना स्पर्श करत रहातो. मादीने जर अनुकूल हालचाली केल्या तर तो तीच्या शेजारीच उतरतो. यानंतर त्यांचे प्रत्यक्ष मिलन घडून येते. मिलनाचा हा काळ अगदी अर्ध्या तासापासून ते २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. काही काही जाती सकाळी मिलन करणे पसंद करतात तर काही जाती दुपारी मिलन करतात. जर का या मिलन जोडीला धोका जाणवला तर सर्वसाधारणपणे मोठी असलेली मादी तशीच त्या अवस्थेत नराला घेउन उडत जाउन दुर सुरक्षीत ठिकाणी बसते. या मिलनानंतर मादीचे मुख्य काम असते ते योग्य असे अन्नझाड निवडून त्यावर अंडी घालण्याचे. काही जातीची फुलपाखरे एकेकटे अंडे घालतात त्यामुळे अर्थातच त्यांना बऱ्याच अन्नझाडांना भेटी द्याव्या लागतात. तर काही जातीची फुलपाखरे पुंजक्याने अंडी घालतात त्यामुळे त्यांचे एक दोन झाडांवरच काम निभावून जाते. बऱ्याच वेळेस या अन्नझाडांच्या आसपासच या माद्या आढळत असल्यामुळे बरेचसे नर सुद्धा या झाडांच्या आसपास त्यांच्याभोवती पिंगा घालताना आढळतात.
फुलपाखरांचे छायाचित्रण करताना जर का आपल्याला त्यांच्या सवयी माहित असतील तर आपल्याला त्यांची अधिक छान छायाचित्रे मिळू शकतात. एकदा नागलाच्या जंगलात हिवाळ्यात पहाटे गेलो असताना "कॉमन गल" जातीचा नर मादीच्या आसपास उडताना मला दिसला. बराच वेळ त्याने मादीच्या आसपास घिरट्या घालवण्यात घालवला. काही वेळानंतर जेव्हा त्याला समजले की मादी मिलनास तयार आहे तेंव्हा तो तीच्या अगदी बाजूस उतरला आणि त्यांचे मिलन सुरू झाले. अर्थात हे असे होणार हे मला माहित असल्यामुळे मी बराच काळ तीथे थांबून राहिलो आणि मला त्यांची बरीच वेगवेगळी छायाचित्रे मिळाली. मागे अरालमच्या अभयारण्यात एक भलामोठा "ब्लू मॉरमॉन" चा नर त्या जातीच्या मादीच्या कोषाबाहेर ती बाहेर येण्याची वाट बघत बसला होता. कोषाबाहेर मादी आल्यावर त्याला इतरत्र शोधाशोध न करता तीथल्या तीथे ती मिलनास आयती मिळणार होती. थोडा वेळ झाल्यावर अक्षरश: कोषातून बाहेर पडल्यापडल्या त्याने तीला मिलनास उद्युक्त केले आणि चक्क कोषाच्या वरच त्यांचे मिलन सुरू झाले. सोबतच्या छायाचित्रात अगदी झळाळणारी नवी कोरी मादी आणि नराची मिलन जोडी आणि खाली रिकामा कोष दिसत आहे. मात्र अशी छायाचित्रे मिळायला थोडेफार नशीब आणि त्यांचा अभ्यास असायला लागतो.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Wednesday, December 31, 2008

नजाकतदार यामफ्लाय.
पावसाळा म्हणजे कीटक, फुलपाखरे, पतंग बघण्याचा सर्वात उत्तम काळ. काही काही फुलपाखरांच्या, पतंगाच्या जाती या आपण फक्त याच काळात बघू शकतो. ऍटलास पतंगासारखा जगातला सर्वात मोठा पतंगसुद्धा आपल्याला याच काळात आपल्या जंगलामधे सापडू शकतो. ग्रास डेमन, कॉमन रेड आय, यामफ्लाय यासारखी फुलपाखरे याच काळात आपल्याला दिसू शकतात. यामफ्लाय हे छोटे पण अतिशय आकर्षक आणि उठावदार असे फुलपाखरू आहे. याच्या पंखाची वरची बाजू लालसर भगवी असते आणि वरच्या पंखाच्या टोकाला काळा रंग असतो. पंखाची खालची बाजू पिवळसर भगवी असते आणि त्यांवर अंगभूत नक्षी असते. पंखाच्या शेवटी लांब शेपट्या असतात. यांच्या टोकाला पांढरा रंग असतो आणि त्या शेवटी वळलेल्या असतात. वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्यांची हालचाल होत असते आणि याच कारणाकरता त्यांचे भक्षक सहज फसून डोके समजून शेपटीवर हल्ला चढवतात. यांची उडण्याची पद्धत संथ, हळू आणि जमीनीलगत असते. जंगलातील रस्त्याच्या आसपासच्या कमी उंचीच्या झाडाझूडपांवर ही एकेकटी उडताना दिसतात. यांच्या अळ्या फिकट हिरव्या रंगाच्या आणि त्यांच्या अन्नझाडाच्या कोवळ्या पानासारख्या दिसतात. याम या कोरफडीसारख्या झाडाचे कोवळे कोंब आणि स्माईलेक्सच्या वेलीवर या अळ्या वाढतात. या अळ्यांना एका विशिष्ट्य लाल, मोठ्या मुंग्यांकडून संरक्षण मिळते.
मुंग्या ह्या खऱ्यातर फुलपाखरांच्या अळ्यांच्या प्रमूख शत्रू, पण ह्या "लायसँनीड" किंवा "ब्लु" वर्गाच्या फुलपाखरांच्या अळ्यांचे खास प्रकारचे सहजीवन बऱ्याच जातीच्या मुंग्यांबरोबर असते. ह्या सहजीवनामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. काही जातींअध्ये अळ्यांकडून मुंग्याना एक मधासारखा गोड द्राव मिळतो आणि त्याबद्दल मुंग्या त्यांचे संरक्षण करतात. तर काही जातींअध्ये ह्या अळ्या चक्क त्या मुंग्यांच्या पिल्लांचा अन्न म्हणून वापर करतात. जेंव्हा ह्या अळ्यांचा आकार वाढत जातो तेंव्हा त्यांच्या ग्रंथीमधून गोड द्राव स्त्रवण्याचे प्रमाण वाढत जाते. त्याचबरोबर त्यांना मुंग्यांकडून मिळणारे लक्ष आणि संऱक्षण पण वाढत जाते.
ठराविक काळातच हे फुलपाखरू दिसत असल्यामुळे याच्या छायाचित्रणासाठी पावसाळ्यातच बाहेर पडावे लागते. मागे गोरेगावला बी.एन.एच.एस च्या जागेवर गेलो असताना संध्याकाळी अगदी उशीरा एका अकेशीयाच्या मोठ्या झुडपावर या जातीची ७/८ फुलपाखरे एकत्र बघितली. सहसा हे फुलपाखरू एकेकटे फिरत असल्यामुळे त्यांचे असे मोठ्या संख्येने एकत्र दिसणे आमच्या करता एकंदर नविनच होते मात्र अंधार बराच पडला असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण काही त्या वेळेस शक्य झाले नाही. दुसरे दिवशी अगदी सकाळीच उठून त्या जागेला परत भेट दिली पण त्यावेळेस तिथे जेमतेम २/३ फुलपाखरेच दिसत होती आणि ती सुद्धा लांब लांब बसली होती. त्यांचे जवळून छायाचित्रण करताना लक्षात आले की ते त्या अकेशिया झाडाच्या खोडावरील चपट लाल ग्रंथीमधून पाझरणारा रस पिण्याकरता त्यावर आकर्षित झाली होती. नागलाच्या जंगलातील भेटीमधे प्रथमच या फुलपाखराला मुंग्यांकडून रक्षण करताना बघितले. आतापर्यंत "ब्लू" जातीच्या अळ्यांना अश्याप्रकारचे मुंग्याकडून रक्षण मिळताना बघितले होते पण यामफ्लायला असे रक्षण होताना बघाणे मजेशीर होते. त्या फुलपाखराच्या अंगावर, पंखावर त्या मोठ्या लाल मुंग्या सर्रास फिरत होत्या पण त्या फुलपाखराला त्याचे काहीच वाटत नव्हते. अरूणाचल प्रदेशाच्या घनदाट जंगालातसुद्धा या जातीचे फुलपाखरू मला सापडले. त्याची अनेक वेगवेगळी छायाचित्रेसुद्धा मिळाली पण सोबतच्या ग्रुपमधिल मित्राने जेंव्हा त्याचे पुर्ण पंख उघडले असतानाचा छायाचित्र दाखवले ते अवर्णनीय होते. हिरव्यागार पानवरचे त्याचे झळाळते पिवळे, नजाकतदार पंख, लांब वळलेल्या, पांढरे ठिपके असणाऱ्या शेपट्या ह्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य. त्यामुळे ह्या पावसाळ्यात यामफ्लायचे पंख उघडलेले असतानाचे छायाचित्र मिळवायचा प्रयत्न जरूर करणार.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


सुसाट "हॉक" मॉथ.
आज जगात या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात. आपल्याकडे नुसत्या मुंबईतच यांच्या १६/१७ जाती अस्तित्वात आहेत. मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या पतंगांचे मोठे डोके आणि बटबटीत डोळे प्रामुख्याने नजरेत भरतात. यांचे पुढचे पंख त्रिकोणी आणि निमुळते असून मागचे पंख आकाराने लहान आणि पुढच्या पंखांखाली झाकले जाणारे असतात. हे जरी पंख निमुळते आणि लहान असले तरी तरी त्यांची उड्डाणशक्ती अतिशत जलद म्हणजे ताशी ५० कि.मी. असते. ह्यातील कित्येक जाती उडता उडता डावीकडे किंवा उजवीकडे जाऊ शकतात किंवा अगदी उडता उडताच फुलांतील मधुरस पीऊ शकतात. हे पतंग सहसा सुर्यास्तानंतर उडताना दिसतात. काही काही जाती तर अगदी मध्यरात्रीनंतर उडताना आढळतात तर काही जाती अपवादात्मक दिवसाच उडताना दिसतात. या पतंगांची अजून एक खासियत म्हणजे त्यांची लांबलचक सोंड. शरीरापेक्षा कीतीतरी मोठी लांब असलेल्या ह्या सोंडेने ते घंटेसारख्या खोलगट फुलांतील मध सुद्धा सहज पीऊ शकतात. या करता यांची सोंड अगदी १० ईंचापर्यंतसुद्धा लांब असू शकते. याच कारणासाठी ऑर्किड, पपई अश्या कित्येक झाडांचे परागीभवन खास या पतंगाकडून केले जाते आणि त्यासाठी ते आपल्यासाठी अतिशय उपकारक ठरतात.
या पतंगाची मादी त्यांच्या अन्नझाडाच्या पानाखाली एकेकटे अंडे घालते मात्र ती मादी एका हंगामात १००च्या आसपास अंडी घालते. हिरवट रंगाची ही अंडी जातीप्रमाणे ३ ते २१ दिवसात उबून त्यातून अळी बाहेर येते. ह्या अळ्याही मोठ्या, जाडजूड असतात. ह्या अळ्यांना ओळखायची सोपी खुण म्हणजे त्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागावर एक शेपटीसारखे शिंग असते. ही अळी दिसायला नितळ, गुळगुळीत पण जाडजूड आणि गुबगुबीत असते. ह्यांचे रंग अगदी उठावदार असतात. ह्यात प्रामुख्याने हिरवा, पिवळा, तपकीरी, लालसर, काळा रंग असतो. त्यांच्यावर पट्ट्या पट्टयांची किंवा डोळ्यांची नक्षी असते. ह्या डोळ्यांच्या किंवा पट्ट्यांच्या नक्षीमुळे त्यांचा अविर्भाव एखाद्या सापासारखा किंवा भयावह असा दिसतो. यात सुद्धा जर त्यांना डिवचले अथवा त्यांना धोका जाणवला तर त्या आपले डोके खाली घालून मान आणि शेपटीकडचा भाग उंचावतात. याच कारणासाठी त्यांना इंग्रजीमधे "स्फिंक्स" मॉथ असे सुद्धा नाव आहे. या आक्रमक पवित्र्याबरोबरच त्यांनी खाल्लेल्या पानांचा रस लगेचच त्या ओकतात. या कारणांकरता बऱ्याच वेळेला भक्षक त्यांच्यापासून दूर रहाणेच पसंत करतात. कोषावस्थेकरता त्या झाडाखाली उतरून पालापाचोळ्यामधे अथवा मातीमधे कोष करतात किंवा चक्क मातीआत शिरून मातीचा घुमटाकार आकार बनवून आत कोष करतात.
पावसाळ्यानंतर हिवाळ्याच्या सुरवतीस ह्यातील २/३ जाती अगदी आपल्या घरी ट्युबलाईटवर आकर्षित होऊन आपल्याला दिसू शकतात. यांच्या इतर जाती मात्र आपल्याला दाट जंगलातच आढळतात. हे पतंग दिसायला सुंदर असले तरी यांच्या अळ्या या दिसायला जास्त सुंदर असतात. त्यामुळे त्यांची छायाचित्रे छान येऊ शकतात. ह्या अळ्यांचे छायाचित्रण करण्यासाठी जर का आपल्याला त्यांचे अन्नझाड माहित असेल तर त्यांना शोधायला, ओळखायला आपल्याला जास्त सोपे जाते. कण्हेर, बारतोंडी, करवंद, काटेसावर, तेरडा अश्या अनेक प्रकारच्या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या हॉक मॉथच्या अळ्या असतात. ह्या अळ्यांचा आकार त्यांचा रंग आणि त्यावरची वेगवेगळी नक्षी यामुळे सबंध अळी तसेच त्यांचे एकदम जवळून छायाचित्र घेणे नेहेमीच जास्त उपयोगी ठरते. छायाचित्रण करताना जर का त्या फांदीला धक्का लागला तर त्या लगेचच त्यांची घाबरवणारी आक्रमक "पोज" घेतात, त्यांचा जर का असा आक्रमक पवित्रा मिळाला तर मग सोन्याहून पिवळे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
उडणारे "पान".
नैसर्गिक समरूपता हा बऱ्याचशा किटकांनी अवलंबलेला बचावाचा पवित्रा आहे. हे किटक त्यांच्या ह्या रंगामुळे आणि आकारामुळेसुद्धा आजूबाजूच्या वातावरणात एवढे तंतोतंत मिसळून जातात की त्यांच्या भक्षकांना त्यांना वेगळे ओळखणे शक्य होत नाही. ह्याच कारणासाठी आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे ते "ऑरेंज ओकलीफ" अथवा "डेड लीफ" ही फुलपाखराची जात. ही जात भारतात पुर्वेकडे आणि दक्षिणेतील काही जंगलात आढळते. महाराष्ट्रात आणि मध्य भारतात जरी ही जात दिसत नसली तरी त्यांचेच चुलत भावंड असणारे "ब्लू ओकलीफ" आपल्याकडे आढळते. "कॅलीमा" हे या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ’अतिशय सुंदर दिसणारे’, अर्थातच हे नाव या फुलपाखराला योग्य असेच आहे.
या फुलपाख्रराच्या पंखांचा आकार, त्यांच्या पंखाखालचा रंग आणि नक्षी त्यांना अगदी सुक्या, वाळक्या पानाचा अविर्भाव देतात. बऱ्याचशा जातीमधे या फुलपाखराच्या पंखांची खालची टोके अथवा शेपट्या ह्या थोड्याशा बाहेर आलेल्या, बोथट आणि वळलेल्या असतात. जेंव्हा ते विश्रांती घेताना झाडाच्या खोडावर किंवा फांदीवर बसतात तेंव्हा उलटे बसतात. यावेळेस ह्या शेपट्या त्या फांदीला अथवा खोडाला अगदी पानाच्या देठासारख्या चिकटवतात आणि या सगळ्याचा एकंदर परिणाम म्हणजे एखादे वाळके पानच झाडावर आहे असा आभास निर्माण होतो. या सगळ्यावर वरताण म्हणून सुकलेल्या पानावर जशा शिरा, डाग, ठिपके अथवा बुरशी आलेली असते तसे सर्व काही या फुलपाखरावर असते. या फुलपाखरामदे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वेगवेगळी रंगसंगती बघायला मिळते. फुलांच्या आसपास हे फुलपाखरू दिसायची शक्यता जरा कमीच असते. या उलट सडलेली, अतिपक्व फळे, झाडांचा रस, चीक, डिंक, प्राण्यांची विष्ठा यावरच ही जास्त आकर्षित झालेली आढळतात.
माझे ब्लू ओकलीफ हे आवडते फुलपाखरू असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जंगलांमधे मी याचे छायाचित्रण केले आहे. अगदी उन्हाळ्यातील याचा फिकट निळा रंग असू दे किंवा पावसाळ्यातील गडद निळ्या रंगाच्या छटा असू देत, ते कायमच आकर्षक दिसते. मात्र काहीसे उंच रहात असल्यामुळे किंवा वरतीच बसायच्या याच्या सवयीमुळे दरवेळेस ते दिसले तरी त्याचे छायाचित्रण होतेच असे नाही. अरूणाचल प्रदेशात खास फुलपाखरांच्या छायाचित्रणासाठी गेलो असताना तीथे ऑरेंज ओकलीफ दिसेल अशी आशा होतीच. त्याप्रमाणे सकाळी ते मला उंच झाडावर बसलेले आढळले. नेहेमीच्या सवयीप्रमाणे "रेकॉर्ड शॉट" घेतला आणि ते लगेचच तिथून उडले. यामुळे त्याची काही व्यवस्थीत छायाचित्रे मिळाली नाहीत. दुसऱ्या दिवशी थोड्या कमी उंचीवर ते फुलपाखरू आढळले, थोडे जवळ गेल्यावर ते लगेचच उडले पण त्याच्या पंखांवरचा झळाळता भगवा रंग दिसला. आपल्याइकडच्या ब्लू ओकलीफपेक्षा कितीतरी वेगळे आणि आकर्षक रंग त्याचे होते. अर्थात फक्त बाहेरूनच त्याचे छायाचित्र मिळाल्यामुळे मला सारखी हळहळ लागून राहिली होती.
नंतर नाम्दाफाच्या जंगलातून परत येताना एका छोट्या पायवाटेवर याच जातीची दोन फुलपाखरे अगदी खाली बसलेली दिसली. अगदी जपून, सावकाश पावली टाकत त्यांच्याकडे गेलो असताना दोन्ही फुलपाखरे विरूद्ध वेगवेगळ्या दिशांना अगदी आत दाट जंगलात उडून गेली. शेवटचा दिवस असल्यामुळे निराश होऊन तिथेच रस्त्यात बसकण मारली असताना अलगद एक फुलपाखरू अगदी समोरच्या झुडपावर येऊन बसले आणी त्याने हळूहळू पंख उघडायला सुरवाते केली. चक्क माझे नशीबच उघडले म्हणायचे. कॅमेरा धडधडू लागला, पण सोबतच्या मित्रांनासुद्धा छायाचित्रण करता यावे म्हणून मी त्यांना पुढे यायची संधी दिली आणि अलगद मागे सरकलो, अर्थात कॅमेरामधे २/४ उघडलेल्या स्थितीतील छायाचित्रे घेउनच आणि माझ्या फळफळलेल्या नशिबाचा विचार करतच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, December 30, 2008

स्मॉल ग्रीन आऊलेट.
स्किपर ही जात फुलपाखरांची असली तरी त्यांचा एकंदर अविर्भाव हा पतंगासारखा असतो. पतंगासारखेच त्यांचे शरीर जाडसर असते आणि त्यांचे रंग साधारणत: मातकट असतात. यांच्यातील काही जाती पतंगांसारख्याच पंख पसरवून बसतात तर काही जाती मात्र फुलपाखरांसारख्या पंख मिटून बसतात. आज जगात सुमारे ३५०० या जातीची फुलपाखरे आहेत आणि त्यातील ३२१ जातींची फुलपाखरे आपल्याकडे भारतात आढळतात. यांचा वावरसुद्धा भल्या पहाटे किंवा संध्याकाळी उशीरा असतो. काही काही जाती मात्र दिवसासुद्धा उडताना दिसतात. यांचा एकंदर मातकट, मळखाउ रंग, जलद उडण्याची पद्धत आणि अंधाऱ्या वेळी उडण्याच्या सवयीमुळे ही सहसा आढळून येत नाहीत. पण यातील काही काही जाती अगदी सहज दिसतात तर काही काही जाती शोधूनही सापडत नाहीत.
२००६ साली आम्ही "बटरफ्लाय मीट"ला जयरामपूर, अरूणाचल प्रदेश इथे गेलो होतो. पाच दिवसाच्या यशस्वी सभेनंतर आमचे आम्ही जवळच्या नाम्दाफाच्या जंगलात जायला निघालो होतो. मधल्या नदीच्या पाण्याला पावसामुळे जोर होता आणि त्यात आमची जीप सतत दोनदा अडकल्यामुळे आम्ही पुढे जाउ शकत नव्हतो. मुंबईपासून एवढ्या लांब आलो होतो, परत इथे कधी येऊ हे सांगता येत नव्हते, समोर घनदाट जंगल दिसत असून जाता येत नाही याचे राहून राहून वाईट वाटत होते. खिन्न मनाने आम्ही परत येत असताना नदीच्या काठावर एक भलामोठा फुलपाखरांचा थवा चिखलपान करताना आढळला आणि आम्ही आमचे दुख: विसरून छायाचित्रणाला लागलो. यात दुपारची संध्याकाळ कधी झाली हेच कळले नाही. आम्ही आता मात्र प्रसन्न चित्ताने परत निघालो ते दुसऱ्या दिवशी पर त्याच ठिकाणी भेट देण्याचे नक्की करूनच.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकळी लवकर उठून त्याच ठिकाणी निघालो. मात्र आदल्या दिवशी एवढी फुलपाखरे काही त्या दिवशी नव्हती. तरीसुद्धा काही वेगळ्या जातीची फुलपाखरे, पक्षी दिसले त्यांचे छायाचित्रण करत करत आम्ही पुढे गेलो. दिवसभर असे छायाचित्रण करून संध्याकाळी आम्ही परत फिरलो. बरोबरच्या काही मित्रांना गाडी मिळाल्याने ते पुढे गेले आणि आम्ही दोघे तिघेच मागून चालत येत होतो. सूर्य अस्ताला टेकला होता मात्र अजुनही त्याचा प्रकाश जाणवत होता. एका ठिकाणी अगदी सहज दिसणारी दोन पिवळी फुलपाखरे उड्ताना दिसली, त्यांच्याकडे बघताना जाणवले की त्यांच्या बाजूला काहीतरी वेगळीच हालचाल आहे. मी जवळ जाउन बघितले तेव्हा एक वेगळीच फुलपाखरांची जोडी दिसली. आतापर्यंत अशी फुलपाखरे कधी बघीतलीच नव्हती. त्यांच्या एकंदर अविर्भावावरून कळले की ती स्किपर जातीतली आहेत पण नक्की कोणती जात हे काही ओळखता आले नाही. यामुळे नक्कीच ती जात दुर्मिळ होती. अंधारून आल्यामुळे बॅगेत गेलेले आमचे कॅमेरे फटाफट बाहेर आले आणि म्ही त्यांचे छायाचित्रण सुरू केले. ती अगदी जमीनीवर असल्यामुळे आम्हाला चक्क रस्त्यात लोळण घेउन त्यांचे छायाचित्रण करावे लागत होते. त्यातले एक फुलपाखरू लगेचच उडून वर उंच फांदीवर जाऊन बसले मात्र दुसऱ्याने व्यवस्थीत छायाचित्रण करून दिले. सहसा न आढळणाऱ्या या रंगीत चमकदार फुलपाखराचे नंतर नाव शोधून काढले ते म्हणजे "स्मॉल ग्रीन आऊलेट". संध्याकाळी उशीरा उडण्याच्या यांच्या सवयीमुळे आणि फक्त काही मोजक्या अरूणाचल प्रदेश, सिक्कीम या भागातच आढळणाऱ्या यांच्या सवयीमुळे याचे छायाचित्रण फारसे झाले नव्हते आणि म्हणूनच हे छायाचित्र नुकत्याच प्रसीद्ध झालेल्या श्री. आयझॅक किहीमकर यांच्या "द बुक ऑफ इंडियन बटरफ्लाईज" या संदर्भ ग्रंथात स्किपर या वर्गाच्या प्रमुख पानावर प्रकाशीत झाले आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, December 21, 2006

पीकॉक पॅन्सी (Peacock Pansy)

हे पीकॉक पॅन्सी भारतात सहज आणि सर्वत्र सापडणारे एक अतिशय सुंदर फुलपाखरू निंफॅलीड जातीतील आहे. ही फुलपाखरे भडक आणि ऊजळ भगव्या रंगाची असतात. ही जलद उडणारी फुलपाखरे जशी फुलांवर मधाकरता आकर्षीत होतात त्याचप्रमाणे अतिपक फळे, झाडांचा गोंद, प्राण्याचे मल, मुत्र ह्यावर पण आकर्षीत होतात. ह्या पीकॉक पॅन्सी प्रमाणेच आपल्याकडे इतर पाच जातीची पॅन्सी फुलपाखरे आढळतात. ती म्हणजे ब्लू पॅन्सी, यलो पॅन्सी, ग्रे पॅन्सी, लेमन पॅन्सी आणि चॉकलेट पॅन्सी. हे पीकॉक पॅन्सी आणि बॅरोनेट जातीचे फुलपाखरू बरेचसे सारखे दिसतात.

ह्या फुलपाखराच्या वरच्या आणि खालच्या पंखांवर मोरपीशी डोळ्यांची नक्षी असते. ह्या शीतरक्ताच्या कीटकांना उडण्याकरता प्रचंड उर्जा लागते. ही उर्जा त्यांना सूर्यकीरणांपासून मिळते आणि याकरता बऱ्याच वेळा फुलपाखरे उन्हात आपले चारही पंख पसरून बसलेली आढळतात. अशाप्रकारे उन्हात बसल्यामुळे त्यांना त्या सूर्यकीरणांपासून २५ / ३० सेल्सी. एवढी उष्णता मिळते आणि त्यांचे उडण्याचे स्नायू सहज कार्यरत होतात. जेंव्हा ही पीकॉक पॅन्सी उन्हात पंख पसरवून बसलेली असतात तेंव्हा त्यांच्या पंखांवर असलेल्या डोळ्यांची नक्षी ही एखादा मोठा प्राणी अथवा पक्षीच डोळे वटारून बघतो आहे अशी दिसते. यामुळे भक्षक पक्षी त्यांच्यावर हल्ला करायचे सोडून त्यांना घाबरून लांब पळतात. या जातीचे नर हे त्या जातीचा दूसरा नर अथवा इतर कुठले फुलपाखरू त्याच्या आसपास आले तर त्याच्या पाठीमागे लागून त्याला पळवून लावते. घाणेरी, झेंडू या सारख्या बागेतील फुलांवर हे फुलपाखरू सहज आकर्षीत होते.

जेंव्हा नैसर्गीक समरूपता निसर्गात उपयोगी ठरत नाही तेंव्हा या कीटकांना इतर काही बचावाचे पवित्रे घ्यायला लागतात जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकतो. फुलपाखरे आणि काही जातीचे पतंग या कामात एकदम तरबेज आहेत. बऱ्याच जातीची फुलपाखरे ही बाहेरून अगदी तंतोतंत सुकलेल्या पानासारखी दिसतात पण आतून त्यांना झळाळणारे रंग असतात. मोक्याच्या वेळी ते भक्षकाला हे आतले भडक रंग एखाद्या कॅमेराच्या फ्लॅशसारखे चमकवून दाखवतात आणि तेथून पळ काढतात, भक्षक मात्र तोच रंग डोक्यात ठेवून शोधत रहातात. काही वेळेला या पीकॉक पॅन्सी सारख्या फुलपाखरांना भडक आणि बटबटीत डोळ्यांची नक्षी असते. त्यामुळे एखादा घुबडासारखा मोठा पक्षी आपलआकडे डोळे वटारून बघतो आहे असे वाटून भक्षक हल्ला करायचे सोडून पळ काढतो.

चेस्टनट बॉब (Chestnut Bob)

हे अतिशय चिमुकले पण आकर्षक फुलपाखरू "हेस्पेरीडी" वर्गात किंवा सर्वसामान्य भाषेत "स्कीपर" या वर्गात येते. याचा पंखाविस्तार जेमतेम २.५ ते ३ सें.मी. एवढा असतो. याच्या पंखांचा रंग गडद तपकीरी असून त्यावर पिवळट, भगव्या रंगाची (चेस्टनट) पखरण असते. याखेरीज खालच्या पंखाच्या बाहेरच्या भागावर बरोबर मध्यभागी चंदेरी ठिपका असतो आणि त्या ठिपक्याच्या कडा तपकीरी / काळ्या रंगाच्या असतात. वरच्या पंखाच्या बाहेरच्या बाजूला असेच पांढरे ठिपके असतात. पंखाच्य वरच्या भागावर पण पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी असते पण हे फुलपाखरू सहसा पंख उघडून बसत नसल्यामुळे ते आपल्याला सहज दिसत नाहीत. स्कीपर जातीतील हे फुलपाखरू असल्यामुळे अर्थातच याचे डोळे शरीराच्या मानानी मोठे आणि बटबटीत असतात.

भारतात तसे हे फुलपाखरू सर्वत्र दिसते आणि त्यांचा वावर सर्व प्रकारच्या जंगलांमध्ये असतो. जंगलामधील मोकळ्या पायवाटांवर किंवा घनदाट झाडीमध्ये हे फुलपाखरू आपल्याला दिसू शकते. या फुलपाखराची उडण्याची पद्धत संथ असते आणि ते सहसा जमिनीलगत उडत असते. मात्र कधी कधी ते एकदम झटका देउन उडते आणि त्यामुळे ते क्षणार्धात कुठे नाहीसे होते ते कळत नाही. त्याचा रंगसुद्धा उठावदार नसल्यामुळे ते पटकन शोधून सापडत नाही. पण परत परत एकाच विशीष्ट जागेवर यायची या फुलपाखराची सवय असल्यामुळे आपण जर का थोडे थांबलो तर आपल्याला त्याचे छायाचित्रण सहज करता येते.

या फुलपखराचे मुख्य अन्न हे फुलातील मध असल्यामुळे बऱ्याच वेळेला ती आपल्याला फुलांवर पण दिसतात. यांची सोंड जरा जास्तच लांब असल्यामुळे अगदी घंटेच्या आकाराच्या फुलांतील मधसुद्धा त्यांना सहज पिता येतो. हे फुलपाखरू बसताना शेवटच्या दोन पायांच्या जोडीवर बसते आणि पहिल्या पायांची जोडी धडाच्या बाजूला अशी काही दुमडून ठेवते की लांबून ती पायांची जोडी दिसतच नाही. यामुळे या फुलपाखराला चारच पाय आहेत की काय ? असा भास होत रहातो. या फुलपाखराची मादी गवताच्या पात्यावर आपले अंडे घालते. या अंडयाचा रंग लाल असतो आणि आकार घुमटासारखा असतो. हिरव्या रंगाची अळी पानाच्या कडा दुमडून त्याचा छोटा कप्पा करून त्यात रहाते. कोष सुद्धा असाच पानाच्या कप्प्याच्या आत दडलेला असतो. त्याचा रंग गडद तपकीरी असून त्यावर पांढऱ्या पावडरचा थर असतो.

टेल्ड जे (Tailed Jay)

आपल्याकडे शहरांमध्ये, बागांमध्ये अगदी जंगलांमधेसुद्धा हे आकर्षक फुलपाखरू सहज दिसते. अतिशय सुंदर, मनमोहक हिरव्या रंगाचे हे फुलपाखरू झपाटयाने, जलद उडत आरपार निघून जाते. याच्या पंखांचा आकार लांब आणि निमुळता असल्यामुळे ते जास्त वेगाने उडू शकतात. जंगालात ते उंच झाडांवर प्रचंड वेगाने सरळ उडत असतात. ही फुलपाखरे बागांमध्येपण फुलांना भेट देतात पण त्यांचे जलद उडणे मात्र सुरूच असते. फुलांतील मध पिताना त्यांच्या पंखांची जोरात फडफड सुरूच असते. शांत चित्ताने ते मध पिताना, फुलावर / फांदीवर बसले आहे असे कधीच आढळत नाही. घाणेरी, मुसांडा, एक्जोरा अशी जास्त मध असलेली फुले त्यांच्या जास्त आवडीची आहेत.

"स्वालोटेल" जातीतील हे फुलपाखरू असल्याने साहजीकच याच्या खालच्या पंखाच्या शेवटी निमुळती शेपटी असते. पंखाची वरची बाजू संपुर्ण काळी असून त्यावर उठावदार गडद हिरव्या रंगाचे मोठे मोठे ठिपके असतात. जणुकाही काळी, हिरवी जाळीच असल्याचा आभास होतो. पंखाची खालची बाजू मात्र थोडीफार फिकट रंगाची असते आणि त्यावर अधीक रंग असतात. लाल, गुलाबी, जांभळा, पांढरा, हिरवा आणि काळा हे रंग प्रामुख्याने दिसतात. अर्थातच हे फुलपाखरू अतिशय जलद उडत असल्याने आणि शांत न बसल्यामुळे हे खालचे रंग क्वचीतच दिसतात. याच्या स्पृशा लांब आणि टोकाकडे गोलाकार असतात. डोळे काळे आणि साधारणत: बटबटीत असतात. हे फुलपाखरू जरी सर्व भारतभर दिसत असले तरी सदाहरित आणि दाट जंगलांमध्ये यांचा वावर जास्त असतो. त्याचप्रमाणे संपुर्ण वर्षभर जरी हे फुलपाखरू दिसत असले तरी पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या महिन्यात ती आपल्याला जास्त मोठया प्रमाणावर दिसतात.

बऱ्याच वेळेला या जातीचे नर दुसऱ्या नरांचा किंवा इतर फुलपाखरांचा जलद पाठलाग करताना दिसतात. या फुलपाखराची मादी बागेतल्या, रस्त्याकडेच्या उंच अशोकाच्या पानांवर अंडी घालते. ही अंडी वाटोळी आणि हिरवट, पिवळ्या रंगाची असतात. अळी जर्द, गडद हिरव्या रंगाची असते. ल्हान असताना अळी झाडाची कोवळी पाने खाण्यासाठी जास्त पसंद करते. सहसा ही अळी पानाच्या वर बसलेली आढळते. ह्या फुलपाखराचा कोषसुद्धा हिरव्या रंगाचा असतो. मात्र ही अळी परोपजीवी माश्यांचे लक्ष्य बऱ्याचवेळेला ठरते. फुलपाखराच्या कोषातून फुलपाखरू बाहेर यायच्या ऐवजी ह्या माश्याच बाहेर येताना जास्त आढळतात.

कॉमन लेपर्ड (Common Leopard)

आपल्या जंगलातून निसर्ग फेरी करताना जर हे "कॉमन लेपर्ड" फुलपाखरू दिसले आणि आपण ओरडलो की "तो बघ लेपर्ड उडतोय !" आजूबाजूचे बरेचसे नवखे लोक दचकतात आणि अचंब्याने आपल्याकडे बघायला लागतात. काही बिबळ्या वाघ नसून फुलपाखरातील "कॉमन लेपर्ड" असतो. बऱ्याचशा फुलपाख्ररांना लेपर्ड, टायगर, क्रो अशी पक्ष्यांची, प्राण्यांची नावे दिली गेली आहेत. या फुलपाखराला असे नाव देण्याचे कारण म्हणजे त्याचे रंग. या फुलपाखराच्या समोर खरोखरच लेपर्ड उडत असतो पण तो पंखांवरील रंग उठावदार पिवळा / भगवा असून त्यावर बिबळ्याप्रमाणेच काळे ठिपके असतात. नुकतेच जर कोषातून फुलपाखरू बाहेर पडले असेल तर त्यावर निळी / जांभळी चमकदार छटा असते, मात्र कालांतराने ही झळाळी नष्ट होते.

हे फुलपाखरू भारतात सहज आढळते आणि पानगळीच्या जंगलांमध्ये यांचा वावर प्रमुख्याने असतो. आपल्याला ती अगदी वर्षभर जरी दिसत असली तरी उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरवातीला त्यांची संख्या जास्त असते. उन्हाळ्यात ती आपल्याला जंगलातील सुक्या, कोरडया ओढयांच्या पात्रात "चिखल पान" करताना आढळतात आणि पावसाळ्यात "लिया"च्या झुडपाच्या बहरावर शेकडोंनी झेपावलेली दिसतात. ही फुलपाखरे साधारणत: जमिनीलगत आणि कमी ऊंचीवरून उडतात. उडण्याची त्यांची पद्धत संथ असते आणि आपल्या पंखांची ते कमीतकमी उघडझाप करतात. उन चढल्यावर त्यांची लगबग जोरात सुरू होते आणि बऱ्याच वेळेला ते एखाद्या झाडाच्या फांदीच्या टोकावर बसून टेहेळणी करतात. आजूबाजूनी जाणाऱ्या दुसऱ्या जातीच्या फुलपाखरावर किंवा त्यांच्याच जातीच्या नरावर ते झपाटयाने चाल करून जातात आणि यावेळी मात्र त्यांचा उडण्याचा वेग प्रचंड असतो.

फुलपाखराची मादी काटेरी, निष्पर्ण झाडावर अंडी घालते पण तिचा अंदाज एवढा बरोबर असतो की जेवढया वेळात अंडयातून अळ्या बाहेर येतात तेवढया वेळात झाड नवीन पालवीने भरून गेलेले असते. अळी काटेरी असून पानामागून पान फस्त करत करत ती नवीन नवीन फांदीवर फिरत रहाते. जर यांचा कोष हिरव्या पानावर /यांचा मिलनाचा काळ वर्षभर असला तरी यांच्या माद्या सर्वात जास्त अंडी उन्हाळ्याच्या शेवटी घालतात. या फांदीवर झाला तर जर्द हिरवा असतो आणि जर का तो वाळक्या फांदीवर झाला तर तो पिवळ्सर पांढरा असतो. त्यावर आकर्षक लाल, चंदेरी ठिपकेसुद्धा असतात. या फुलपाखराची अंडयापासून ते प्रौढ फुलपाखरापर्यंत वाढ अतिशय झपाटयाने होते. जेमतेम २१ दिवसाच्या काळात हे फुलपाखरू त्याच्या जिवनातील पहिल्या ३ अवस्था सहज पार करते.

वॉटर स्नो फ्लॅट (Water Snow Flat)

हे फुलपाखरू सदाहरित आणि निमसदाहरित जंगलांमध्ये जास्त आढळते. पानगळीच्या जंगलामध्ये यांचा वावर जरा अभावानेच आढळतो. साधारणत: हे फुलपाखरू मध्यम आकारचे म्हणजे अंदाजे ३ ते ४ सें.मी. एवढे असते. याचे वरचे पंख गडद काळसर तपकीरी असतात आणि त्यावर अर्धपारदर्शक ठिपके असतात. खालचे दोन पंखही तशाच रंगाचे असतात पण त्याचा ३/४ खालचा भाग हा अगदी पांढरा शुभ्र असतो. ह्या पांढऱ्या भागाच्या कडेवर गडद काळे ठिपके असतात जे त्या शुभ्र पांढऱ्या रंगावर अतिशय उठून दिसतात. या फुलपाखराची नर आणि मादी ही सारखीच दिसते. हे फुलपाखरू "स्किपर" या वर्गातले आहे आणि त्यामुळेच हे फुलपाखरू बसताना कायम आपले पंख उघडून बसते. ह्या फुलपाखराने बसताना पंख मिटून बसले आहे असे कधीच घडत नाही म्हणूनच ह्यांना इंग्रजीमधे "स्प्रेड विंग्ज स्किपर" असे म्हणतात.

हे फुलपाखरू अतिशय जलद आणि सरळ उडते. मात्र उडताना मधे मधे एकदम झटके देउन दिशा बदलते. जलद गतीने उडताना यांचा काळसर रंग दिसून न येता फक्त पांढरा रंगच दिसतो आणि एक पांढऱ्या रंगाची फीत झपाट्याने इकडे तिकडे उडताना दिसते. झपाट्याने उडता उडता क्षणार्धात ते पानाच्या टोकावर बसते आणि तेथुनच आजुबाजुच्या भागाची टेहेळणी करते. त्याबाजुने जाणाऱ्या प्रत्येक फुलपाखराचा ते झपाट्याने पाठलाग करून त्याला पळवून लावते. दिवस जर बऱ्यापैकी वर आला असेल तर मात्र ते पानाच्या टोकावर शांतपणे बसून विश्रांतीसुद्धा घेताना दिसते. काही वेळा तर ते चपळाईने पानाच्या खाली जाउन आपले पंख उघडून बसते आणि मग त्याला शोधणे बरेच कठिण काम असते. फुलांतील मध त्यांना फारसा प्रिय नसला तरी काही विशीष्ट्य जातीच्या फुलांना मात्र ते आवर्जुन भेट देतात आणि परत परत त्या फुलांवर येताना आढळतात. या फुलांबरोबरच ते पक्ष्यांची विष्ठा आणि क्वचीतप्रसंगी "चिखलपान" करताना सुद्धा आढळतात. ही फुलपाखरे जरी वर्षभर दिसत असली तरी त्यांचे प्रमाण पावसाळ्याच्या महिन्यानंतर जास्त असते.

या फुलपाखरासारख्याच दिसणाऱ्या आणि त्याच प्रकारच्या अधिवासात रहाणाऱ्या दुसऱ्या दोन जाती आहेत. कॉमन स्नो फ्लॅट आणि सफुज्ड स्नो फ्लॅट ही साधारण याच आकाराची आणि रंगाची फुलपाखरे आहेत मात्र त्यांच्या खालच्या पंखांवरचा पांढरा रंग कमी प्रमाणात आणि कमी भागात पसरलेला असतो. ही सर्व फुलपाखरे जलद उडण्याकरता प्रसीद्ध आहेत. त्यांचे त्रिकोणी आणि लांब पंख या करता खास वापरले जातात. यांचे शरीर केसाळ, दाट खवल्यांनी आच्छादलेले असते.

Monday, November 06, 2006

रेड पियरो (Red Pierrot)

हे "रेड पियरो" जातीचे अतिशय सुंदर आणि आकर्षक फुलपाखरू आहे. याच्या पंखांचा वरचा रंग गडद काळा, जांभळी झाक असणारा असतो. खालच्या पंखांची कडा झळाळत्या भगव्या रंगाची असते आणि त्यांच्या टोकाला तपकीरी रंगाच्या दोन बारीक, नाजूक शेपटया असतात. पंखांचा खालचा रंग पांढरा शुभ्र असतो आणि त्यावर काळे ठिपके असतात. वरच्या पंखाची बाहेरची कडा काळी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. खालच्या पंखाच्या या काळ्या किनारीच्या आत भगव्या रंगाची जाड किनार असते आणि त्यावर पांढर्या रंगाच्या ठिपक्यांची एक रांग असते. येऊरच्या किंवा आपल्या आसपासच्या जंगलांमधे हे फुलपाखरू फार कमी दिसते. मात्र ज्या ठिकाणी त्यांचे अन्नझाड (पानफूटी) आहे त्याच्या आसपास, शहरामध्ये, बागांमध्ये ही फुलपाखरे मुबलक प्रमाणात दिसतात. हीवाळ्याच्या सुरवातीस ही फुलपाखरे आपल्याला जास्त आढळतात. आपल्या बागेत जर पानफूटीची रोपटी असतील तर आपण यांचा संपूर्ण जीवनक्रम सहज अभ्यासू शकतो.

हे फुलपाखरू अतिशय संथ गतीने उडत असते. हळूहळू पंख फडफडवत ते जमीनीच्या खालच्या पातळीवर आणि अन्नझाडाच्या आसपास उडत असते. हे छोटया छोटया गिरक्या घेत थोडयाच वेळात जवळच्या फांदीवर स्थीरावते, आणि पंखांचा भाग उंचावून आपल्या शेपटया हलवत बसते. यामुळे या शेपटया त्यांच्या मिश्या असल्याचा भास आपल्याला आणि भक्षकांनासुद्धा होतो. त्यामुळे त्या भक्षकाने जरी हल्ला केला तरी त्याच्या तोंडी पंखाचा शेवटचा भाग येतो आणि "जीवावरचे" शेपटीवर निभावते. या फुलपाखरांना फुलांतील मध खूप आवडतो आणि म्हणूनच ती आपल्याला फुलांच्या अवतीभोवती, बागांमध्ये आढळतात.

या फुलपाखराची मादी एका वेळेला एकच अंडे पानाच्या टोकावर टाकते. मात्र एकाच झाडावर ती वेगवेगळ्या पानांवर बरीच अंडी घालते. अंडयातून बाहेर येऊन लगेचच छोटी अळी पानाच्या आत शिरते. आता ती तीचा सगळा वेळ या पानाच्या दोन आवरणामध्येच घलवणार असते. या पानाच्या दोन पातळ पापुद्र्यामधला मांसल गर ती खाण्याकरता वापरते. ही अळी प्रचंड खादाड असते आणि काही काळातच आतला सगळा गर संपून त्याजागी तीची काळ्या रंगाची विष्ठा साठून रहाते. कोष मात्र पानाच्या बाहेरच्या बाजूला पानावर किंवा पानाखाली केली जातो. साधारणत: आठवडयाच्या काळात कोषातून प्रौढ फुलपाखरू बाहेर येऊन त्याचा पुढचा जीवनक्रम सूरु ठेवते.

Thursday, October 26, 2006

व्हाईट ऑरेंज टीप (White Orange Tip)

"व्हाईट ऑरेंज टीप" आकर्षक, सुंदर आणि उठावदार रंगांचे फुलपाखरू आपल्या आजूबाजूला अगदी सहज दिसते. साधारणत: मध्यम आकारचे हे फुलपाखरू आपण एकदा बघितले की नंतर नक्कीच विसरणार नाही याची खात्री पक्की. यांचा रंग वरून स्वच्छ पांढरा असून वरच्या पंखाच्या कडा टोकाला काळ्या आणि त्याखाली गडद भगवा रंग असतो. त्यामुळे एकंदर उडताना हे फुलपाखरू झळाळत्या पांढऱ्या रंगावर भगवी टोके असलेले दिसते. या जातीच्या मादीला त्या भगव्या रंगाच्या आत काही काळे ठिपके असतात. पंखांची खालची बाजू उठावदार पिवळ्या रंगाची असते आणि खालच्या पंखावर त्याठिकाणी काळे, तपकीरी ठिपके असतात.

हे फुलपाखरू भारतात सर्वत्र आढळते आणि त्यांचा वावर गवताळ प्रदेशात आणि पानझडीच्या जंगलात डोंगराच्या पायथ्याशी असतो. ही फुलपाखरे जलद उडतात आणि जमीनीलगतच्या झाडाझुडपांमधे बसताना / उडताना दिसतात. ही फुलपाखरे जरी कायम वर्षभर दिसत असली तरी पावसाळ्यानंतर यांची संख्या जास्त असते. उन्हाळ्यात या जातींचे नर कोरडया नाल्यातील थोडया ओल्या जमीनीवर ग्रास यलो, इमीग्रंट, स्वोर्डटेल या फुलपाखरांबरोबर "चिखलपान" करताना आढळतात. ह्या फुलापाखरांना सुर्यप्रकाश आवडत असल्यामुळे, सकाळच्या कोवळ्या उन्हात, जमीनीच्या आसपास ही फुलपाखरे आपल्याला उडताना दिसू शकतात. बऱ्याच वेळेला यांचे नर उन्हात आपले पंख उघडून "बास्कींग" करताना आढळतात. मात्र यांच्या माद्या जराशा लाजाळूच असतात आणि सहसा उडताना दिसत नाहीत पण त्यांच्या अन्नझाडाच्या आजूबाजूला त्यांचे वास्तव्य असते.

"कपारीस" जातीच्या झाडांवर यांची अंडी आणि अळ्या वाढतात. अंडी समूहाने घातली जातात. अळी साधारणत: ३/४ दिवसानंतर अंडयातून बाहेर येते. ही अळी हिरव्या रंगाची असून तीच्या बाजूला दोन बारीक, समांतर लाल रेषा असतात. ह्या अळ्या पानाखाली दडून रहातात आणि त्यांना कोवळी पाने आणि कोंब खायला आवडतात. कोष हा हिरव्या किंवा पिवळसर, तपकिरी रंगाचा असून आजूबाजूच्या वातावरणात सहज मिसळून जातो. "पायरीडी" या समुहातील फुलापाखरांना "व्हाईट्स" या सर्वसाधारण नावानेच ओळखले जाते कारण ह्या वर्गातीक बहूसंख्य फुलपाखरे ही पांढऱ्या/ पिवळ्या रंगाची असतात. ह्या जातीची फुलपाखरे अगदी सहज आणि शहरातही कायम बघायला मिळू शकतात. आपल्याकडे व्हाईट ऑरेंज टीप बरोबरच, ग्रेट ऑरेंज टीप, यलो ऑरेंज टीप आणि क्रीमजन टीप ही फुलपाखरेसुद्धा दिसतात.

ग्रेट ऑरेंज टीप (Great Orange Tip)

या फुलपाखराचे नाव आहे ग्रेट ऑरेंज टीप आणि जवळपास संपूर्ण भारतभर आपल्याला ते दिसू शकते. शहरातल्या बागांमधील फुलझाडांवर ज्यामधे खूप मध असतो, अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला हे फुलपाखरू बघायला मिळते. हे फुलपाखरू अतिशय जलद उडते, तसेच उडतानासुद्धा उंचावरून उडत असते. त्यामुळे याचे निरीक्षण करणे किंवा छायाचित्रण करणे खूपच अवघड असते. या फुलपाख्रराचे रंग खूप उठावदार आणि आकर्षक असतात. पण हे फुलपाखरू सहसा पंख उघडून बसत नाही त्यामुळे त्याचे हे छान रंग फक्त आपल्याला उडताना दिसतात.

हे फुलपाखरू जर फुलांतील मध पीत असेल अथवा कोवळ्या उन्हात उन खात बसलेले असेल तरच याचे छायाचित्र मिळू शकते. सहसा हे फुलपाखरू एकाच ठिकाणी, एकाच प्रकार्च्या फुलांना वारंवार भेटी देते. त्यामुळे या झाडाच्या आसपास दबा धरून बसले तर याचे चांगले छायाचित्र मिळू शकते मात्र तुमच्या जराशा हालचालीनेसुद्धा ते लांब उडून परत काही त्या झाडाकडे फिरकत नाही.

हे फुलपाखरू या जातीच्या फुलपाखरांंअध्ये आकाराने सर्वात मोठे आहे. तसेच सर्वात जलद आणि जास्त उडणाऱ्या फुलपाखरांपैकी सुद्धा एक आहे. या फुलपाखराच्या वरच्या बाजूने पंख पांढरेशुभ्र असतात आणि वरच्या पंखांची टोके ही गडद भगव्या रंगाची असतात. हे भगव्या आणि पांढर्या रंगाचे मिश्रण लांबून उडताना अतिशय ऊठावदार दिसते. या त्याच्या रंगामूळेच त्याचे नाव "ग्रेट ऑरेंज टीप" पडले आहे आणि यामूळेच ते चटकन ऒळखता येते. पंखाच्या खालची बाजू मात्र एकदम वाळक्या आणि सुक्या पानासारखी दिसते. सुकलेल्या पानावर जसे डाग, शीरा असतात तशीच नक्षी यावर असते. त्यामुळे लांबून सहसा हे फुलपाखरू बसलेले आहे हे लक्षात येत नाही. आपल्या भक्षकांपासून स्वत:चे संरक्षण करण्याची याची हुकमी पद्धत आहे.

या फुलपाखराची मादी उडता उडता पानाच्या टोकावर किंवा फांदीवर अंडे टाकते. या फांदीवर नवीन आलेले कोवळे पान आणि हे अंडे एकदव सारखे दिसते. या अंडयाचा आकार एखाद्या बाटलीसारखा आणि रंग पिवळट हिरवा असतो. यांची अळी ही हिरव्या रंगाची असते आणि ती कायम पानाच्या खाली राहाते. या सवयीमुळे आणि रंगामुळे तीचा बचाव सहज होतो. यांचा कोष हा हिरव्या रंगाचा किंवा मातकट पिवळ्या रंगाचा आणि ज्या पार्श्वभागावर होतो त्यावर अवलंबून असतो. या कोषाचा रंग अळी कशी काय ठरवते हे कोडे मात्र अजूनही उलगडलेले नाही.

Friday, September 22, 2006

मंकी पझल (Monkey Puzzle)

एक विचीत्र नाव असलेले पण अतिशय छान दिसणारे छोटेसे फुलपाखरू. कुसूमच्या लालभडक कोवळ्या पानांवर हे आपल्याला मार्च / एप्रीलच्या महिन्यात बसलेले आढळते. हे फुलपाखरू सहसा जमीनीच्या आसपास उडते. बऱ्याच वेळेला सकाळच्या कोवळ्या उन्हात ते पानांवर पंख उघडून बसलेले आढळते.

याचा आकार इतर "ब्लू" फुलपाखरांप्रमाणेच अतिशय लहान असतो. पंखांची वरची बाजू गडद तपकीरी असते आणि वरच्या बाजूला पांढरट / पिवळट २-३ ठिपके असतात. खालच्या पंखाच्या वरच्या बाजूला पिवळसर ठिपक्यांची किनार असते आणि ३ शेपटया असतात. पंखाच्या खालच्या बाजूला मात्र असमान नक्षी असते. मूख्य रंग तपकीरी पिवळा असला तरी काळ्या पांढर्या रेषांची नक्षी त्यांवर असते.

फुलपाखरांची "ब्लू" ही जात जगात जवळपास सर्वात मोठी म्हणून मानली जाते. आज भारतातसुद्धा यांच्या ४५०हून अधीक उपजाती सापडतात. ही फुलपाखरे आकाराने छोटी असतात. सर्वसाधारणपणे यांच्या पंखांचा वरचा रंग नीळा किंवा जांभळा असतो म्हणून यांना "ब्लू" असे म्हणतात. यांच्यात नरांचे आणि माद्यांचे रंग वेगवेगळे असतात आणि नरांचे रंग अधीक गडद आणि झळाळणारे असतात. त्याचप्रमाणे हवामान आणि ऋतूंप्रमाणे यांचे रंग बदलतात किंवा कमी अधीक गडद होतात. बऱ्याच उपजातींचे नर हे कोवळ्या उन्हात आपले पंख उघडून बसलेले दिसतात. ही फुलपाखरे फुलांवर आकर्षीत होतात पण त्याच वेळेला काही उपजाती मेलेल्या प्राण्यांवर, त्यांच्या विष्ठेवर, झाडाच्या डिंकावर पण आकर्षित होतात.

ही फुलपाखरे नाजूक, चिमुकली असली तरी त्यांना पण शत्रू असतात, आणि त्यांच्यापासून बचाव करायला त्यांच्याकडे काही खास युक्त्या आहेत. पहिली युक्ती म्हणजे त्यांच्या पंखांच्या टोकाला असणार्या शेपटया. या शेपटया, त्या बाजूला असणारी ठिपक्यांची डोळ्यासारखी दिसणारी नक्षी यामुळे तो भाग एकदम डोक्यासारखा दिसतो. ही फुलपाखरेसुद्धा बसताना या शेपटया एकसारख्या हलवत रहातात यामुळे तो पंखाचा शेवटचा भाग त्याच्या डोक्यासारखा दिसतो आणि शेपटया ह्या स्पृशांसारख्या वाटतात. यामुळे भक्षक खऱ्या डोक्याकडे हल्ला न करता ह्या खोटया डोक्याकडे करतो आणि त्याच्या तोंडी फक्त पंखाचा काही भाग लागतो, आणि फुलपाखराचा जीव वाचतो.

दूसरी युक्ती म्हणजे काही उपजातींच्या अळ्या ह्या मुंग्याबरोबर रहातात. या अळ्यांच्या शरीरावर एक गोड द्राव देणारी ग्रंथी असते. हा द्राव मुंग्यांना आकर्षीत करतो, म्हणून या मुंग्या ह्या अळ्यांना संपुर्ण संरक्षण देतात आणि त्याबदल्यात त्यांना या अळ्यांकडून हा गोड द्राव मिळतो. या प्रकारच्या सहजीवनामुळे दोनही कीटकांचा आपापसात फायदा होतो.

ब्ल्यू मॉरमॉन (Blue Mormon)

आपण सर्वसाधारणपणे मानतो की फुलपाखरे ही फुलामधील रस, मध पिऊन जगतात. पण हे काही पुर्णपणे सत्य नाही. छायाचित्रातील "ब्ल्यू मॉरमॉन" हे फुलपाखरू तर मेलेल्या खेकडयाच्या शरीरातून रस ओढून पिताना दिसत आहे. हे फुलपाखरू स्वालोटेल्स या जातीत येते. या प्रकारची फुलपाखरे आकाराने मोठी, अतिशय आकर्षक रंगाची आणि पंखाच्या शेवटी शेपटीसारखे टोक असणारी असतात. आज जगात त्यांच्या जवळपास ७०० उपजाती आढळतात. "बर्डवींग" हे जगातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरु याच जातीतले, तसेच "अपोलो" हे हिमालयासारख्या अती ऊंचावर आढळणारे फुलपाखरूसुद्धा याच जातीतील आहे.

हे ब्ल्यू मॉरमॉन आकाराने बरेच मोठे असते. म्हणजे बर्डवींग नंतर भारतात याचाच दुसरा नंबर आहे. जवळपास १२ ते १५ सें.मी. एवढा पंखांचा विस्तार यांचा आहे. मुख्य काळा रंग असला तरी वरचे पंख आणि खालचे पंख यांच्या वरच्या बाजूवर आकाशी निळ्या रंगाची झळाळी असते. तर पंखाच्या खालच्या बाजूला तसाच रंग असतो. पंखाच्या सुरवतीला गडद लाल रंगाचा ठिपका असतो. धड आणि पोट हे काळ्या रंगाचे असते. जंगलामधे, कधी कधी शहरामधे, बागांमधे सुद्धा हे आपल्याला सहज दिसू शकते. त्याचा मोठा आकार आणि उडण्याची विशीष्ट सवय यामुळे ते लगेच लक्षात येते.

जगलामधे फुलांवर किंवा त्याहीपेक्षा एखाद्या ओलसर मातीच्या भागावर ते सहज आकर्षीत होते. एकदा का मातीवर बसून ते क्षार शोषायला लागले की, ते सहसा विचलीत होत नाही. मग आपण त्यांच्या अगदी जवळ गेलो तरी त्यांना काही फरक पडत नाही. यांचा जीवनक्रम हा लिंबाच्या जातीच्या झाडांवर आणि इतर काही झाडांवर होतो. यांच्या अळ्या या सुरवातीला पानाच्या वर बसतात. पण त्यांचा आकार आणि रंग हा एखाद्या पक्ष्याच्या विष्ठेसारखा असल्यामुळे त्यांच्याकडे सरडे आणि पक्षी दुर्लक्ष करतात. नंतर मात्र अळी थोडी मोठी झाल्यावर ती जर्द हिरव्या रंगाची होते आणि पानाच्या खाली लपून बसते. नंतर थोडयाच दिवसात कोष झाडावर उलटा एका धाग्याच्या सहाय्याने लटकवला जातो आणि मग काही काळानंतर त्यातून झळाळणारे ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू बाहेर येते.

Monday, August 21, 2006

गॉडी बॅरन (Gaudy Baron)

हे फुलपाखरू अतिशय सुंदर आणि झळाळत्या मखमली रंगांचे असते. उन्हाळ्यात कोरडया नाल्यांमधे ओल्या मातीवर आपल्याला ते सहज दिसू शकते. उडण्याचा भन्नाट वेग आणि वेडीवाकडी वळणे घेणे ही याची खासीयत. ह्याच्या नराच्या आणि मादीच्या रंगामधे थोडाफार फरक असतो आणि दोघेही आकर्षक दिसतात. यांची पिवळीधम्मक सोंडसुद्धा सहज लक्षात रहाते.

फुलपाखरांना दोन पुढचे आणि दोन मागचे पंख असतात. जेंव्हा प्रौढ फुलपाखरू कोषातून बाहेर पडते तेंव्हा त्याचे पंख ओले आणि आक्रसलेले असतात. हे फुलपाखरू कशाचा तरी आधार घेउन उलटे बसते आणि मग त्याच्या शरीरातील रक्त हे वेगाने पम्खातील रक्तवाहीन्यांमधून सर्वत्र पसरवले जाते. यामुळे पंखांना बळकटी आणि पुर्ण आकार येतो.

फुलपाखरांचे पंख हे थरांनी बनलेले असतात आणि त्याच्या खालच्या नलीकांमधून त्यांना प्राणवायूचा पुरवठा होत असतो. ह्या पंखांवर हजारो रंगीबेरंगी खवले एखाद्या घराच्या कौलासारखे बसवलेले असतात. ह्या खवल्यांचे आकार आणि प्रकार वेगवेगळे असतात. काही काही खवले तर अगदी केसांसारखेसुद्धा असतात. एखाद्या पक्ष्याला जशी त्याची पंखावरची पिसे उपयोगी ठरतात त्याचप्रमाणे फुलपाखराला याचे हे खवले उपयोगी ठरतात.

काही जातीच्या फुलपाखराच्या पंखांवर "वासाच्या" ग्रंथी असलेले खवले असतात. यामधून विशीष्ट प्रकारचा गंध सोडला जातो जेणेकरून त्याच जातीच्या नर माद्या एकमेकांकडे आकर्षीत होतात. काही फुलपाखरांची नक्षी ही आपल्या साध्या मानवी डोळ्यांना दिसू शकत नाही, अतिनील प्रकाशासारखी त्याची ठेवण असते जी फक्त दूसऱ्या फुलपाखरांनाच दिसू शकते. या फुलपाखरांचे रंग हे एकाच वेळेला वेगवेगळे कामे करू शकतात. नैसर्गीक समरूपता, धोक्याचा इशारा, मादीला आकर्षीत करणे, ऊष्णता साठवणे अशी बरीच कामे हे पंख करतात.

हे रंग लवकांमुळे किंवा विशीष्ट रचनेमुळे अथवा दोघांच्या एकत्रीकरणामुळे बनलेले असतात. या लवकांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे वेगेवेगळे रंग येतात. दुसरा रंगांचा प्रकार ंहणजे रचनेपासून बनलेले रंग. हे रंग म्हणजे प्रत्यक्ष रंग नसून ते फुलपाखरांच्या पंखावरील खवल्यांच्या विशीष्ट रचनेमुळे आलेले असतात. ही रचना प्रकाश परवर्तीत करून रंग दर्शवते. मात्र याकरता प्रकाश कोणत्या कोनातून परवर्तीत होतोय ह्यावर रंग अवलंबून असतो. पावसाळ्यात रस्त्यांवर गाडीचे पेट्रोल पडलेले असते, त्यावर जर पाउस पडला तर ते सप्तरंगी चमकते तसेच हे रंग प्रकाश पडला की एकदम झळाळून उठतात.

यामफ्लाय (Yamfly)

पावसाळा म्हणजे कीटक, फुलपाखरे, पतंग बघण्याचा सर्वात उत्तं काळ. नवीन कोवळी पाने, फुले ह्यांची लयलूट असल्यामुळे या कीटकांना मोठ्या प्रंआणावर खाणे त्यांच्याकरता आणि त्यांच्या पिल्लांकरता उपलब्ध असते. ऍटलास पतंगासारखा जगातला सर्वात मोठा पतंगसुद्धा आपल्याला याच काळात आपल्या जंगलामधे सापडू शकतो. ग्रास डेमन, कॉमन रेड आय, यामफ्लाय यासारखी फुलपाखरे याच काळात आपल्याला दिसू शकतात.

यामफ्लाय हे छोटे पण अतिशय आकर्षक आणि उठावदार असे फुलपाखरू आहे. याच्या पंखाची वरची बाजू लालसर भगवी असते आणि वरच्या पंखाच्या टोकाला काळा रंग असतो. पंखाची खालची बाजू पिवळसर भगवी असते आणि त्यांवर अंगभूत नक्षी असते. पंखाच्या शेवटी लांब शेपट्या असतात. यांच्या टोकाला पांढरा रंग असतो आणि त्या शेवटी वळलेल्या असतात. वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्यांची हालचाल होत असते आणि याच कारणाकरता त्यांचे भक्षक सहज फसून डोके समजून शेपटीवर हल्ला चढवतात. यांची उडण्याची पद्धत संथ, हळू आणि जमीनीलगत असते. जंगलातील रस्त्याच्या आसपासच्या कमी उंचीच्या झाडाझूडपांवर ही एकेकटी उडताना दिसतात. यांच्या अळ्या फिकट हिरव्या रंगाच्या आणि त्यांच्या अन्नझाडाच्या कोवळ्या पानासारख्या दिसतात. यामचे कोवळे कोंब आणि स्माईलेक्सच्या वेलीवर या अळ्या वाढतात. या अळ्यांना एका विशिष्ट्य लाल, मोठ्या मुंग्यांकडून संरक्षण मिळते.

मुंग्या ह्या खऱ्यातर फुलपाखरांच्या अळ्यांच्या प्रमूख शत्रू. पण ह्या "लायसँनीड" किंवा "ब्लु" वर्गाच्या फुलपाखरांच्या अळ्यांचे खास प्रकारचे सहजीवन बऱ्याच जातीच्या मुंग्यांबरोबर असते. ह्या सहजीवनामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. काही जातीमध्ये अळ्यांकडून मुंग्याना एक मधासारखा गोड द्राव मिळतो आणि त्याबद्द्ल मुंग्या त्यांचे संरक्षण करतात. तर काही जातींअध्ये ह्या अळ्या चक्क त्या मुंग्यांच्या पिल्लांचा अन्न म्हणून वापर करतात. जेंव्हा ह्या अळ्यांचा आकार वाढत जातो तेंव्हा त्यांच्या ग्रंथीमधून गोड द्राव स्त्रवण्याचे प्रमाण वाढत जाते. त्याचबरोबर त्यांना मुंग्यांकडून मिळणारे लक्ष आणि संरक्षण पण वाढत जाते.

Monday, July 24, 2006

ग्रास यलो (Grass Yellow)

फुलपाखरू म्ह्टले की डोळ्यासमोर जी पिवळी फुलपाखरे येतात ती ह्याच जातीची. याचे कारण ती अतिशय सहज आणि सर्वत्र मोठया संख्येने शहरात, बागेमध्ये, आपल्या घराच्या आसपाससुद्धा आढळतात. यांचा रंग अगदी पिवळाधम्मक असून वरच्या पंखांच्या टोकाला काळ्या रंगाची किनार असते. पंखांच्या खालच्या बाजूला काळसर, तपकीरी रंगांचे ठिपके असतात. यांचा आकार लहान म्हणजे ४/५ सें.मी.एवढा असतो. यांची उडण्याची गती एकदम संथ असते आणि बऱ्याचवेळेला ती जमीनीलगत उडत असतात. मात्र वेळप्रसंगी ती ऊंच उडून तिथल्या फुलांतील मधसुद्धा पिताना दिसतात. यांचे नाव जरी "ग्रास यलो" असले तरी ती गवतावरती बसतात किंवा वाढतात असे नाही. भारतात ही फुलपाखरे सर्वत्र आढळतात. त्याच प्रमाणे ती इतर आशीयायी प्रदेशात, आफ्रीकेत आणि ऑस्ट्रेलियातसुद्धा आढळतात.

ही फुलपाखरे आपण वर्षाच्या बाराही महिने बघू शकतो तरी सुद्धा ह्यांची संख्या पावसाळ्यानंतरच्या महिन्यात जास्त असते. बागांमध्ये झाडाभोवतीच्या आळ्यामध्ये किंवा जंगलामध्ये ओल्या / सुक्या ओढयामधे ही फुलपाखरे मोठया संख्येनी "चिखलपान" करताना आढळतात. हिवाळ्यात पहाटे आणि इतरवेळी रात्री ती लहान झुडपांच्या पानांच्या खाली विश्रांती घेताना दिसतात. काही काही वेळेस ३/४ फुलपाखरे शेजारी शेजारी सुद्धा बसलेली आढळतात.

आपल्याला जरी "कॉमन ग्रास यलो" सहज आणि सतत दिसत असली तरी ह्या फुलपाखराच्या काही दुसऱ्या जाती आपल्या इथे आढळतात आणि आपण जर बारकाईने त्यांचे निरिक्षण केले तर आपल्याला त्यांच्यातील फरक सहज ओळखता येऊ शकतो. यांच्यासारखीच दिसणारी दुसरी जात आहे "स्पॉटलेस ग्रास यलो". याजातीचे वरचे पंख थोडे निमुळते असतात आणि पंखाच्या वरचा रंग थोडा फिकट पिवळा असतो. उन्हाळ्याच्या वेळेस तर पंखांचा खालचा रंग अगदि वाळक्या पानासारखा आणि फिकूटलेला असतो. त्यांच्यावर काळसर / तपकिरी ठिपकेही दिसत नाहीत आणि म्हणूनच ही "स्पॉटलेस". "स्मॉल ग्रास यलो" नावाची दुसरी जात आहे मात्र ही इतर ग्रास यलो सारखी सहज सापडणारी नाही. ही जात ग्रास यलोपेक्षा आकाराने थोडी लहान असते. त्यांच्या पंखांची बाहेरच्या बाजूची किनार गुलाबी, लाल रंगाची असते. "थ्री स्पॉट ग्रास यलो" ही अजून एक जात, मात्र ही जात ओळखायला अतिशय कठीण आहे कारण त्यांचा आकार, रंग, उडण्याची पद्धत अगदि काही ग्रास यलोसारखी असते फक्त पंखावर एका ठिकाणी तीन ठिपके असतात जे उडताना अजिबात दिसत नाहीत.

Friday, July 21, 2006

ग्रास ज्वेल (Grass Jewel)

ग्रास ज्वेल हे भारतातील सर्वात चिमुकले फुलपाखरू आहे. याचा आकार जेमतेम १५ ते २२ मिलीमिटर एवढाच असतो. पंखाची वरची बाजू ही झळाळती निळी, जांभळी, तपकीरी असते. खालच्या पंखांच्या शेवटी काळसर चार ठिपके असतात. चारही पंखांच्या कडेला नाजूक, केसाळ झालर असते. पंखांना वरच्या बाजूला फिकट तपकीरी रंग आणि त्याच रंगाची रेघांची आणि ठिपक्यांची नक्षी असते. खालच्या पंखाच्या शेवटी झळाळते निळे चार ठिपके असून त्याच्याभोवती गडद काळा रंग आणि त्याबाहेर भगवा रंग असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे ठिपके एखाद्या रत्नासारखे चमकतात म्हणूनच हे "ग्रास ज्वेल".

हे फुलपाखरू सर्व भारतभर अगदी सहज आढळते, मात्र याचा आकार एवढा लहान असतो की ते पटकन सापडत नाही. सर्वसामान्यपणे गवताळ कुरणांमधे, मोकळ्या जागेवर अगदी जमीनीच्या लगत उडताना आपल्याला दिसू शकते. बागेमध्ये, नदी नाल्याजवळ आणि घनदाट अरण्यामधे सुद्धा जिथे सुर्यप्रकाश जास्त असतो तिथे ही जास्त आकर्षित होतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे आपले पंख अर्धवट उघडे ठेवून "उन खात" बसलेली आढळतात. यांचा उडण्याचा वेग अतिशय संथ असतो. या फुलपाखरांचा आकार लहान असल्यामुळे अर्थातच त्यांना मध पिण्याकरता त्याहूनही चिमुकली फुले लागतात. मोठ्या पाकळ्या असलेली किंवा घंटेच्या आकाराची फुले यांच्या लहान सोंडेमुळे त्यांना मध पिण्याकरता चालत नाहीत.

या फुलपाखराची मादी अन्नझाडाच्या फुलाच्या, कळीच्या बाजूला एकेकटे अंडे घालते. अंडे एकदम लहान, चपट आणि हिरवट, पांढरट रंगाचे असते. अंड्यातून बाहेर आलेली इवलीशी अळी पुष्पदलांच्या आणि कळीच्या आजूबाजूला रहाते आणि त्यांवरच गुजराण करते. कोषसुद्धा जवळपासच्या फांदीवरच केला जातो आणि एका रेशमाच्या धाग्याने त्याला आधार दिलेला असतो. अगदी या फुलपाखरासारख्या दिसणाऱ्या अजून चार जाती आहेत. त्या म्हणजे टायनी ग्रास ब्लू, लेसर ग्रास ब्लू, पेल ग्रास ब्लू आणि डार्क ग्रास ब्लू. यांच्या सर्वसाधारण सवयी, हालचाली आणि रहाण्याची ठिकाणे एकच असतात.

Thursday, June 22, 2006

गोल्डन ऍंगल (Golden Angle)

पावसाळ्यात गोल्डन ऍंगल हे फुलपाखरू आपल्याला सहज दिसू शकते. याचा आकार मध्यम म्हणजे दिड ते दोन इंच एवढा असतो. यांचा रंग प्रामुख्याने गडद तपकीरी असून त्यावर पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची नक्षी असते. त्याचप्रमाणे चारही पंखावर अर्धपारदर्शक ठिपके असतात. यांचे शरीर जाडसर आणि केसाळ असते. या फुलपाखराच्या पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात वेगवेगळ्या रंगसंगती आढळतात. यांना ड्राय सिझन फॉर्म आणि वेट सिझन फॉर्म असे म्हणतात. यामुळे वेगवेगळ्या दोन हंगामात ही फुलपाखरे एवढी वेगळी दिसतात की ती भिन्न जातीची आहेत असेच पटकन वाटते. उन्हाळ्याच्या वेळेला ती एकदम पिवळी / सोनेरी समान, एकसारख्या रंगाची असतात आणि त्यावरील ठीपकेपण कमी असतात.

या फुलपाखराचा उडण्याचा वेग सुसाट असतो. ही एकदम झेप घेऊन झटक्यात उडतात आणि क्षणार्धात जवळच्या झाडाच्या पानाच्या टोकावर विसावतात. ही फुलपाखरे साधारण जमीनीलगत ऊडतात आणि या जातीचे नर स्वजातीच्या किंवा इतर जातीच्या फुलपाखरांचा कायम पाठलाग करताना आढळतात. बसताना नर आपले पुढचे पाय दोन्ही बाजूला फाकवून बसतो आणि त्याबाजूला त्याचे विशिष्ट वास ग्रहण करणारे केसासारखे दिसणारे खवले असतात. यामुळे एकंदर या फुलपाखराला दाढी आहे की काय असा भास होतो. ह्या जातीची फुलपाखरे पानगळीच्या जंगलांमध्ये जिथे सूर्यप्रकाश जास्त आहे तिथे आढळतात. मलबार फ्लॅट, फल्वस फ्लॅट ही फुलपाखरे साधारणत: या गोल्डन ऍंगलसारखीच दिसतात.

हे गोल्डन ऍंगल फुलपाखरू "हेस्पेरीडी" वर्गात किंवा सर्वसामान्य भाषेत "स्कीपर" या वर्गात येते. आजपर्यंत ३५०० या जातीची फुलपाखरे जगभरात नोंदली गेली आहेत, तर भारतात ३२० जातीम्ची नोंद झालेली आहे. ही फुलपाखरे आकाराने लहान किंवा मध्यम असतात आणि त्यांचे रंग सहसा काळपट, तपकीरी असून त्यांवर अर्धपारदर्शक ठिपक्याम्ची नक्षी असते. पंख त्रिकोणी असून, शरीर जाडसर आणि केसाळ खवल्यांनी झाकलेले असते. ही अतिशय चपळ आणि जलद उडण्याकरता प्रसीद्ध आहेत. यांची सोंड त्यांच्या शरीराच्या मानाने जरा जास्तच लांब असते आणि याच कारणामुळे ही फुलपाखरे लांब किंवा घंटेच्या आकाराच्या फुलांवर जास्त प्रमाणात आढळतात.

Wednesday, June 21, 2006

ग्रे पँन्सी (Grey Pansy)

पांढरट, राखाडी रंगाचे हे फुलपाखरू आणि त्यांवर बारीक गोळ्यांची नक्षी हे याचे रंगविशेष. पंखावर काळ्या, तपकिरी वळणदार रेषा आणि त्यामध्ये काळे, पिवळे, तपकिरी उठावदार ठिपके यामुळे हे फुलपाखरू चटकन ओळखता आणि लक्षात ठेवता येते. पँन्सी ह्या समुहातल्या सर्व फुलपाखरांच्या पंखांवर ही गोळ्यागोळयांची नक्षी असते. आपल्याकडे ६ जातीची पँन्सी दिसतात. ती म्हणजे ग्रे पँन्सी, लेमन पँन्सी, चॉकोलेट पँन्सी, पिकॉक पँन्सी, ब्लू पँन्सी आणि यलो पँन्सी. बऱ्याचवेळेला ही फुलपाखरे पंख पसरवून बसतात आणि त्यामुळे ती सहज ओळखता येतात. मात्र ह्यांचे पावसाळ्यात / उन्हाळ्यात रंग कमी अधीक गडद आणि वेगळे असतात. त्याचप्रमाणे यांच्या पंखांखालचे रंग अतिशय वेगळे असतात, यामुळे जर ही पँन्सी फुलपाखरे पंख मिटून बसलेली असतील तर सहज गल्लत व्हायची संभावना असते.

पुर्ण भारतभर आणि सर्व हंगामात हे फुलपाखरू आपल्याला दिसू शकते. मात्र पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या महिन्यांमधे ही आपल्याला मोठया संख्येने दिसतात. मोकळ्या मैदानात, गवताळ कुरणांमधे, पायवाटांवर, नदी नाल्यांच्या बाजूला ही जास्त आढळतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात ही जास्त उडताना दिसतात आणि एखाद्या फांदीच्या टोकावर बसून आजूबाजूला टेहेळणी करतात. बऱ्याच वेळेला इतर फुलपाखरांच्या पाठीमागे जलद उडत जाउन, त्यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावतात. घाणेरी, झेंडू, कॉसमॉस या जास्त मध असणाऱ्या फुलांवर ती आकर्षित होतात.

यांची अंडी आणि अळ्या या कोरांटी आणि इतर जातीच्या झाडांवर असतात. अंडी एकेकटी टाकली जातात आणि अळ्या ह्या काळसर रंगाच्या असून त्यांच्या अंगावर फांद्या असलेले काटे असतात. "निम्फॅलीड" जातीतील ही फुलपाखरे जलद उडण्याकरता प्रसीद्ध आहेत. तसेच त्यांचे रंगही आकर्षक, उठावदार आणि वेगवेगळ्या रंगसंगती असलेले असतात. यांना सर्वसाधारणपणे "ब्रश फुटेड" म्हणून संबोधले जाते कारण यांच्या पुढच्या पायांच्या आजूबाजूला काही वेळेस लांब, दाट केसासारखे खवले असतात आणि ते लांबून केसाळ ब्रशसारखे दिसतात. या जातीच्या फुलापाखरांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. यांच्यामध्ये एवढी विवीधता असल्यामुळे त्यांची वर्गवारी वेगवेगळ्या उपजातींमधे केली आहे.

सिल्वरलाईन (Silverline)

कलाबूत असलेले सिल्वरलाईन.
"सिल्वरलाईन" हे फुलपाखरू जेमतेम एक इंचाच्या आसपास असते पण याचे झळझळीत आकर्षक रंग त्याला एक वेगळाच उठाव देतात. यांच्या पंखांची खालची बाजू फीकट पिवळसर रंगाची असून त्यावर भडक लालसर गडद भगव्या रंगाचे पटटे असतात. या पटटयांच्या कडांना काळी किनार असते. सर्वात आकर्षक आणि उठावदार गोष्ट म्हणजे या भगव्या पटटयांच्या मधोमध एक बारीक चंदेरी / रूपेरी कलाबूतीप्रमाणे ओळ असते. आणि म्हणूनच हे "सिल्वरलाईन". एखाद्या भरजरी शालूवर जसे छान जरीकाम केलेले असते तसेच काहीसे या फुलपाखरावरसुद्धा असते. उन्हात हे सगळे रंग चमकताना बघणे म्हणजे खरोखरच अविस्मरणीय दृश्य असते. यांचे पंख त्रिकोणी निमूळते असतात. खालच्या पंखांच्या टोकाला दोन बारीक शेपटया असतात आणि खालची शेपटी वरच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असते. पंखांची वरची बाजू गडद असून त्यावर भगवे पटटे असतात. "ब्लू" जातीतील हे फुलपाखरू असल्यामुळे नरांना पंखाच्या वरच्या बाजूला निळसर झळाळी असते. यांचे पोट जाडसर असून त्याचा रंगसुद्धा फिकट पिवळसर असतो आणी त्यावर गडद काळ्या रंगाचे गोल पटटे असतात.

ही फुलपाखरे साधारणत: पावसात आणि त्यानंतरच्या काळात सहज दिसतात. हे फुलपाखरू उडताना झटके देत उडते. मात्र जेंव्हा ते फुलावर बसून मध पीत असते तेंव्हा अतिशय शांत बसते त्यामुळे त्याचे छायाचित्र घेणे सहज शक्य होते. पण जर का त्याचे लक्ष विचलीत झाले तर ते वेडीवाकडी वळणे घेत लांब उडत जाते आणि त्याचा पाठलाग करणे अशक्य असते. त्यांच्या पंखांचा वरचा रंग एवढा काही वातावरणात मिसळून जातो की ते परत सापडणे खूप कठीण असते. या फुलपाखराच्या इतर आठ उपजाती भारतात सापडतात पण त्यातसुद्धा "लॉंगबॅडेड सिल्वरलाईन" आणि "शॉट सिल्वरलाईन" अधीक सहज दिसतात.

हे फुलपाखरू त्याच्या बचावासाठी "खोटे डोके" असल्याचे उत्तम तंत्र वापरते. आपण जर बारकाईने त्याच्या खालच्या पंखाच्या शेवटी बघीतले तर आपल्याला त्या तीथे त्याचे डोळे, दोन मिश्या, तोंडाचा भाग अशी नक्षी सहज दिसून येते. बसतानासुद्धा ते हा पंखाचा भाग सतत हलवत आणि एकमेकांवर घासत बसते ज्यामुळे हे फुलपाखरू आपले डोके सारखे हलवत आहे असा भास होतो. या हालचालीमुळे आणि "खोटया डोक्याच्या" आभासामुळे त्यांचे भक्षक, पक्षी आणि सरडे त्यांच्या खोर्टया डोक्यावर हल्ला करतात आणि त्यांच्या तोंडात फक्त पंखाचा काही भाग उरतो. तेवढया वेळात वेडीवाकडी वळणे घेत हे फुलपाखरू लांब आणि सुरक्षीत जाउन बसते आणि त्याच्या जीवावरचे फक्त शेपटावर निभावते.

Wednesday, May 24, 2006

कॉमन जझबेल (Common Jezebel)

फुलपाखरे म्हटली की आपण ती रंगीबेरंगी आहेत असे लगेच म्हणतो मात्र बऱ्याचवेळा खुपशी फुलपाखरे ही काळ्या किंवा मातकट रंगाची असतात. पण हे कॉमन जझबेल फुलपाखरू मात्र खऱ्या अर्थाने रंगीबेरंगी असते. हे फुलपाखरू भारत आणि आसपासच्या देशातच फक्त आढळत असले तरे आपल्याला हे फुलपाखरू अतिशय सहज आणि सर्वत्र आढळते. अगदी शहऱ्यातल्या गजबजलेल्या भागात, बागांत, आसपासच्या जंगलात संपुर्ण वर्षभर हे फुलपाखरू आपण पाहू शकतो. हे फुलपाखरू मध्यम आकारचे असून त्याच्या पंखांचा वरचा रंग पांढरा असतो आणि त्यावर काळे पटटे असतात. पंखांचा खालचा रंग गडद पिवळा असून त्यांच्या कडेला साधारणत: पंचकोनी उठावदार भगव्या रंगाचे मोठे ठिपके असतात. पंखावरील शिरांची जाळी ठळक काळ्या रंगाची असते आणि त्यामुळे त्या पिवळ्या / भगव्या रंगांना एकदम "फ्रेम" केल्यासारखा उठाव येतो. इतर फुलपाखराचे वरचे रंग उठावदार असतात मात्र याच्याउलट या फुलपाखराचे बाहेरचे रंग जास्त ऊठावदार असतात.

ह्या फुलपाखरांना जास्त मध असलेली फुले खुप प्रिय असतात त्यामुळे बागेमधील घाणेरी, झिनीया वगैरे फुलांवर ती सतत येत असतात. दिवसा उन्हे चढल्यावर आणि दुपारी यांची जास्त वर्दळ असते. एरवी संथ उडणारी ही फुलपाखरे धोक्याच्या वेळी मात्र भन्नाट वेगाने उडून लांब जाउ शकतात. हे फुलपाखरू मधाकरता लहान झुडपांच्या आसपास, जमिनीलगत उडते. पण बऱ्याच वेळेला जेंव्हा मोठया वृक्षांना बहर येतो तेंव्हा त्यांच्या फुलांवर इतक्या उंचावरसुद्धा ती आपल्याला उडताना दिसतात.

ह्या फुलपाखराची मादी अंडी "लोरॅंथस" सारख्या बांडगुळांवर घालते. ही अंडी गोलाकार आणि पिवळ्याधम्मक रंगाची असून १०/१२ एका वेळी, एका जागी घातली जातात. सैन्यातील एखाद्या शिस्तबद्ध बटालियन प्रमाणे त्यांचे सगळे व्यवहार शिस्तीत, एकाच वेळेला होतात. अगदी अंडयातून बाहेर येण्याच्या वेळेपासून ते लहान असताना खाताना, बसताना त्या एकत्र, एकाच दिशेला तोंड करून बसतात. इतकेच काय पण कात टाकयची त्यांची वेळसुद्धा एकच असते. अगदी या फुलपाखराप्रमाणेच दिसणारे दुसरे एक फुलपाखरू भारतात सापडते त्याचे नाव आहे "पेंटेड सॉ टूथ", मात्र ते आपल्याला मुंबईत बघायला मिळत नाही.

Wednesday, May 10, 2006

ब्लु ओकलीफ (Blue Oakleaf)

कुठलाच प्राणीजीव हा सुऱइत नाही. त्याला कायं त्याम्च्या भ़अकाम्कडून मारले जाण्याचा धोका असतो आणि त्यातुन ते जर दुर्बल, बिनविषारी, अचपळ असतील तर त्याम्ना जास्तच धोका असतो. असे प्राणी, प़ई, किटक आजूबाजूच्या निसर्गाशी एवढे समरूप होऊन जातात की, त्याम्ना त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये वेगळे आपल्याला ओळखताच येत नाही आणि मग त्याम्चा त्याम्च्या भ़अकाम्पासुन सहज बचाव होऊ शकतो. असा बचाव होण्याकरता निसर्गाने त्याम्ना वेगवेगळ्या देणग्या दिल्या आहेत.

बरेचसे प्राणी हे सुक्या किम्वा ओल्या पानासारखे दिसतात. इतर प्राणी सुक्या दगड किम्वा मातीसारख्या रम्गाचे असतात तर काही प्राणी, किटक हे एखाद्या प्राण्याच्या/पय़ाच्या विष्टेसारखे दिसतात. कोणीकोणी तर भयावह अशा चेहेर्याची किम्वा घाबरवणारया डोळ्याम्ची ऩई असलेले असतात आणि यामुळे त्याम्चा त्याम्च्या भ़अकाम्पासुन सहज बचाव होऊ शकतो. हे सर्व प्राणी खाण्यायोग्य असतात आणि म्हणुनच त्याम्ना ऱअणाची गरज पडते. सहसा हे प्राणी निशाचर असतात आणि दिवसभर ते आपल्या निसर्ग समरूपतेचा फायदा घेऊन शाम्त, हालचाल न करता बसून असातात. त्यामुळेसुद्धा त्याम्चा बचाव होऊ शकतो.

निसर्गामधे समरूप होण्यासारखे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे हे ब्लु ओकलीफ फुलपाखरू. जेम्व्हा हे फुलपाखरू बसलेले असते तेम्व्हा त्याच्या पम्खाची बाहेरची बाजू म्हणजे निव्वळ एक सुकलेले, देठ असलेले पानच असते. सुकलेल्या पानावर जेवढे काही रम्ग, आकार असतात ते सर्व काही रम्ग, आकार अगदी हुबेहुब तुंहाला ह्या फुलपाखरावर सापडतील. एखाद्या सुकलेल्या पानावर जशा शिरा, ठिपके, कुजलेला भाग अथवा बुरशी आल्यावर डाग असतात ते डाग असे सर्व काही आकार, ऩई या फुलपाखरावर असते. तसेच प्र्त्येक फुलपाख्रावर वेगवेगळी ऩई, आकार, शिरा असतात.
या फुलपाखराच्या पम्खाच्या वरच्या बाजूला गडद नीळा, पाम्ढरा रम्ग असतो. उडतान मधूनच चकाकणारा नीळा रम्ग अतिशय छान दिसतो. मात्र या गडद नीळ्या रम्गाचासुद्धा हे फुलपाखरू फायदा करून घेते. एखादा प़ई जेम्व्हा हे नीळ्या रम्गाचे फुलपाखरू बघतो तेम्व्हा तो हा नीळा रम्ग ल़आत ठेवतो. तेवढ्या वेळात हे फुलपाखरू कुठेतरी गुपचुप दडून बसते. बसल्यावर त्याचा तम्तोतम्त पानासारखा आकार आणि रम्ग असल्यामुळे हे नम्तर दिसत नाही आणि प़ईसुद्धा नीळ्या फुलपाखराच्या शोधान पुढे निघून जातो. याची उडायची पद्धतसुद्धा वेडीवाकडी वळणे घेत जाणारी असते. फुलाम्वर बसण्यापे़आ हे फुलपाखरू सडलेली फळे, प्राण्याम्ची वीष्ठा याम्च्यावर बसणे जास्त पसम्द करते.

Thursday, April 20, 2006

ग्रास डेमन ( Grass Daemon)

पावसाळ्यात ग्रास डेमन हे फुलपाखरू आपल्याला अगदी सहज दिसते आणि ते ओळखण्यासाठीसुद्धा खुप सोपे असते. याचा आकार मध्यम असून त्यांचा रंग काळा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही ठिपक्यांची नक्षी पंखांच्या वर आणि खाली दोनही बाजूंना असते. यांचे नर आणि मादी सारखे दिसत असले तरी यांचा ड्राय सिझन फॉर्म (उन्हाळ्यातील रंगसंगती) थोडासा वेगळा दिसतो. यावेळी त्यांचे पंख थोडेसे पिवळसर असतात आणि त्यावर लालसर तपकिरी रंगाची छटासुद्धा असते. पावसाळ्यात ही फुलपाखरे जेंव्हा पानावर बसतात तेंव्हा ती थोडेसे पंख उघडून बसतात आणि सतत ते पंख असे काही हलवतात की त्यांच्या ठिपक्यांच्या मुळे ते पंख चक्राकार फिरत असल्याचा भास होतो. यासाठी ते त्यांचे
खालचे पंख आधी हलवतात आणि ही क्रीया अर्धवट असतानाच वरचे पंखसुद्धा हलवायला सुरवात करतात. या त्यांच्या अजब आणि एकमेव वैशिष्ट्यामुळे त्यांना आपण जर एकदा बघितले तर ती आपण सहज ओळखू शकतो.
हे फुलपाखरू सहज दिसणारे असले तरी यांची उडण्याची पद्धत जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत जाणारी असते. त्यातून याचा रंग काळा, पांढरा असल्यामुळे झाडीतील दाट काळोखात ती बसली तर पटकन दिसत नाहीत. मात्र यांचा वावर रानहळद, पेव या झाडांच्या आसपास असतो. कारण या जातींवर या फुलपाखराच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालण्यापुर्वी मादी बऱ्याच झाडांचे आधी परिक्षण करते आणि जेंव्हा तीला एखादे झाड योग्य वाटेल तेंव्हाच त्या झाडाच्या पानाखाली आपले पोट वळवून एक लालसर रंगाचे, गुळगुळीत, गोलाकार अंडे घालते. अंडयातून बाहेर आल्यावर अळीअ प्रथम अंडयाचे टरफल मटकावते आणि नंतर त्या झाडाच्या पानाची एक छोटीशी वळवून आपल्याकरता खोली बनवते. इतर फुलपाखरांच्या अळीप्रमाणे ही अळीसुद्धा खादाड असली तरी थोडीशी लाजाळू असते आणि आपला खाण्याचा प्रोग्राम फक्त रात्रीच उरकते. अळीनंतर कोषसुद्धा त्याच झाडावर होतो आणि त्याचा रंगसुद्धा अळीच्य रंगाशी मिळताजुळता असतो. कोषाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबलचक सोंड. ही सोंड त्यांच्या पंखाच्यासुद्धा बाहेर आलेली असते. अर्थातच प्रौढ फुलपाख्रराची सोंडसुद्धा शरीराच्यामानाने फारच मोठी प्रगत झालेली असते. "स्कीपर" जातीतील हे फुलपाखरू असल्यामुळे त्यांना फुलांतील मध खुप प्रिय असतो आणि त्यातून या लांबलचक सोंडेमुळे त्यांना घंटेसारख्या किंवा खोलगट फुलांतील मधसुद्धा सहज पीता येतो.

लार्ज ओक ब्लु (Large Oak Blue)

लायसॅनिड जातीतील हे बऱ्यापैकी मोठे फुलपाखरू. याच्या पंखांच्या वरचा झळाळता गडद निळा रंग जर एकदा का आपण बघितला तर परत आपण याला विसरणे केवळ अशक्य. या फुलपाखाराचा साधारणत: ४५-५५ मि.मि. असतो. पंखांचा वरचा रंग चमकदार, झळाळता निळा असून, नरांना त्याच्या कडेला बारीक काळी किनार असते तर माद्यांना ही किनार थोडी जाडसर असते. पंखांचा खालचा रंग मातकट तपकिरी असून त्यावर त्याच रंगाचे गडद ठिपके असतात आणि त्यांना पांढरी किनार असते.

हे फुलपाखरू दुर्मिळ नसले तरी ते सहजासहजी मात्र खचीतच दिसत नाही. पावसाळ्यामधे काहीवेळा आणि उन्हाळ्याच्या गरम महिन्यात ही फुलापाखरे दिसण्याची शक्यता जास्त असते. डोंगरऊतारावर, दाट झाडीमध्ये ही फुलपाखरे आढळतात. सहसा ही फुलपाखरे एकेकटी रहातात मात्र मी मे महिन्यामधे यांच्या मोठया झुंडी बांधवगडच्या (मध्य प्रदेश) जंगलात सतत ३/४ वर्षे बघितल्या आहेत. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे कोरडे ओढे, नाले यांच्या आसपास आढळतात. क्षणार्धात यांचा निळा रंग चमकतो आणि क्षणातच ती प्रचंड वेगाने गायब होतात. यांचा उडण्याचा प्रचंड वेग आणि वेडीवाकडी वळणे घेत उडण्याची पद्धत यामुळे ती आपल्याला सहज चकवा देतात. मात्र या फुलपाखरांना "चिखलपान" अतिशय प्रिय असल्याने ती परत परत त्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला दिशू शकतात. बऱ्याच वेळेला दुसऱ्या फुलपाखरांना ही उगाचच हुसकावून लावतात आणि जवळपासच्या पानावर जाऊन परत टेहेळणी करत बसतात. नशीब चांगले असेल तर यांचे नर क्वचित आपले चारही पंख उघडून आपल्याला आकर्षक निळा रंगसुद्धा दाखवतात. फुले ही काही या फुलपाख्ररांना प्रिय नाहीत पण काही झाडांचा डिंक आणि मुख्यत्वे आंबाच्या पानांचा चिकट रस यांना खुप आवडतो.

बदाम, तामण या सारख्या झाडांवर या फुलपाखराची मादी एकेकटे अंडे घालते. जेंव्हा अंडयातून बारीक अळी बाहेर येते तेंव्हा तीचे लाल, मोठया मुंग्या रक्षण करतात. या मुंग्या भयानक चावऱ्या असल्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही आणि त्यामुळे या छोटया अळ्यांना पुर्ण संरक्षण मिळते आणि त्याबदल्यात त्या आपल्या शरीरातील एका विशिषट गोड द्रावाची भेट त्या मुंग्यांना देतात. ही देवाणघेवाण अळ्यांनी कोष केल्यावरसुद्ध थांबत नाही तर त्या प्रामाणिक मुंग्या कोषातून फुलपाखरू बाहेर पडेपर्यंत त्या कोषाचे सुद्धा रक्षण करतात.