Saturday, February 06, 2016

भडक बॅरोनेट.

बॅरोनेट हे आपल्याकडे पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यात सहज दिसते. जर्द भगवा रंग ही याची खासियत. या फुलपाखराचा आकार मध्यम असून त्याच्या पंखांचा विस्तार हा साधारणत: ६० ते ७० मि.मि. एवढा असतो. याचे पुढचे आणि मागचे पंख गडद भगव्या रंगाचे असतात आणि त्यावर काळ्या रंगाची, कंसाकार वळणावळणाची नक्षी असते. पंखांची खालची बाजू वरच्या बाजूच्या भगव्या रंगाचीच असते पण हा रंग तेवढा गडद नसतो आणि त्यावर पांढऱ्या आणि निळसर रंगाची झळाळी असते. तिथे अतिशय बारीक काळ्या, लाल ठिपक्यांची नक्षी असते. पांढरया रंगाचे दोन मोठे चट्टेसुद्धा असतात. यांच्या स्पृशा काळ्या रंगाच्या असून त्यांची टोके गडद पिवळ्या / भगव्या रंगाची असतात. या जातीतील नर आणि मादी दोघेही एकसारखेच दिसतात.


पावसाळ्याच्या महिन्यात जंगलातील पाय़वाटांवर आणि रस्त्यावरच हे फुलपाखरू बसलेले आढळते. त्याच्या जरा जवळ जायचा प्रयत्न केला तर थोडेसेच पुढे जाउन बसते. आपण परत पुढे गेलो की हे फुलपाखरू परत आपल्याला हुलकावणी देउन अजून पुढे जाउन बसते. सकाळच्या कोवळ्या उन्हात ही जास्त उडताना दिसतात आणि एखाद्या फांदीच्या टोकावर बसून आजूबाजूला टेहेळणी करतात. बऱ्याच वेळेला इतर फुलपाखरांच्या पाठीमागे जलद उडत जाउन, त्यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावतात.  उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे कोरडे ओढे, नाले यांच्या आसपास आढळतात. या फुलपाखरांना "चिखलपान" अतिशय प्रिय असल्याने ती परत परत त्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला दिशू शकतात.


युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

No comments: