Thursday, April 20, 2006

लार्ज ओक ब्लु (Large Oak Blue)

लायसॅनिड जातीतील हे बऱ्यापैकी मोठे फुलपाखरू. याच्या पंखांच्या वरचा झळाळता गडद निळा रंग जर एकदा का आपण बघितला तर परत आपण याला विसरणे केवळ अशक्य. या फुलपाखाराचा साधारणत: ४५-५५ मि.मि. असतो. पंखांचा वरचा रंग चमकदार, झळाळता निळा असून, नरांना त्याच्या कडेला बारीक काळी किनार असते तर माद्यांना ही किनार थोडी जाडसर असते. पंखांचा खालचा रंग मातकट तपकिरी असून त्यावर त्याच रंगाचे गडद ठिपके असतात आणि त्यांना पांढरी किनार असते.

हे फुलपाखरू दुर्मिळ नसले तरी ते सहजासहजी मात्र खचीतच दिसत नाही. पावसाळ्यामधे काहीवेळा आणि उन्हाळ्याच्या गरम महिन्यात ही फुलापाखरे दिसण्याची शक्यता जास्त असते. डोंगरऊतारावर, दाट झाडीमध्ये ही फुलपाखरे आढळतात. सहसा ही फुलपाखरे एकेकटी रहातात मात्र मी मे महिन्यामधे यांच्या मोठया झुंडी बांधवगडच्या (मध्य प्रदेश) जंगलात सतत ३/४ वर्षे बघितल्या आहेत. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे कोरडे ओढे, नाले यांच्या आसपास आढळतात. क्षणार्धात यांचा निळा रंग चमकतो आणि क्षणातच ती प्रचंड वेगाने गायब होतात. यांचा उडण्याचा प्रचंड वेग आणि वेडीवाकडी वळणे घेत उडण्याची पद्धत यामुळे ती आपल्याला सहज चकवा देतात. मात्र या फुलपाखरांना "चिखलपान" अतिशय प्रिय असल्याने ती परत परत त्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला दिशू शकतात. बऱ्याच वेळेला दुसऱ्या फुलपाखरांना ही उगाचच हुसकावून लावतात आणि जवळपासच्या पानावर जाऊन परत टेहेळणी करत बसतात. नशीब चांगले असेल तर यांचे नर क्वचित आपले चारही पंख उघडून आपल्याला आकर्षक निळा रंगसुद्धा दाखवतात. फुले ही काही या फुलपाख्ररांना प्रिय नाहीत पण काही झाडांचा डिंक आणि मुख्यत्वे आंबाच्या पानांचा चिकट रस यांना खुप आवडतो.

बदाम, तामण या सारख्या झाडांवर या फुलपाखराची मादी एकेकटे अंडे घालते. जेंव्हा अंडयातून बारीक अळी बाहेर येते तेंव्हा तीचे लाल, मोठया मुंग्या रक्षण करतात. या मुंग्या भयानक चावऱ्या असल्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही आणि त्यामुळे या छोटया अळ्यांना पुर्ण संरक्षण मिळते आणि त्याबदल्यात त्या आपल्या शरीरातील एका विशिषट गोड द्रावाची भेट त्या मुंग्यांना देतात. ही देवाणघेवाण अळ्यांनी कोष केल्यावरसुद्ध थांबत नाही तर त्या प्रामाणिक मुंग्या कोषातून फुलपाखरू बाहेर पडेपर्यंत त्या कोषाचे सुद्धा रक्षण करतात.

2 comments:

Gayatri said...

फार सुंदर आणि माहितीपूर्ण जालनिशी आहे. Thanks a lot for the time and efforts you are putting in!

शर्मिला said...

युवराज खूप छान माहिती दिली आहेस.
तु BNHS च्या butterfly trail ला जातोस का? ही फ़ुलपाखरे तु कधी आणि कुठे पाहिलीस, त्यावेळचं वर्णन पण आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. सिलोंढा ट्रेकच्या वेळी आम्ही पण अशीच खूप सुरेख फ़ुलपाखरे पाहिली होती. त्यांचे असे शास्त्रीय वर्णन वाचायला आवडलं.