Tuesday, January 12, 2010

भगव्याची कमाल.
फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील स्कीपर हा वर्ग साधारणत: मातकट रंगाच्या फुलपाखरांचा आहे. या वर्गातील फुलपाखरे सहसा राखाडी, तपकीरी रंगाचीच आढळतात. त्यातील फार कमी जातीत रंगीबेरंगी नक्षी, रंग आढळून येतात. या वर्गातील फुलपाखरांचा आकारही हा अगदीच लहान अथवा मध्यम आकाराचा असतो. यांच्या उलट स्वालोटेल जातीतील फुलपाखरे मात्र आकाराने अतिशय मोठी, रंगानेसुद्धा भरजरी, दिमाखदार असतात. ही फुलपाखरे नुसतीच रंगीबेरंगी नसुन काही तर चमकदार आणि झळाळणारीसुद्धा असतात. त्यामुळे अर्थातच आपल्या जंगलात अश्या दिमाखदार फुलपाखरांच्या मागे छायाचित्रणासाठी पळणारे बरेचजण असतात. मोठ्या आकारामुळे, रंगीबेरंगी उठावदार रंगांमुळे आणि भरदिवसा त्यांच्या उडण्याच्या सवयीमुळे ती सहज सापडता आणि त्यांचे छायाचित्रण सहज करता येते.
मी मात्र स्कीपर जातीतील "भगव्यांच्या" मागावर बरेच दिवस होतो. आता हे भगवे म्हणजे नेमके सांगायचे झाले तर "ऑरेंज टेल आउल" आणि "ऑरेंज आउलेट" ही दोन फुलपाखरे. ही फुलपाखरे अगदी पहाटे किंवा संध्याकाळी उशीरा कार्यरत असतात. त्यामुळे जंगलात दिवसा फिरताना यांचा वावर एकदम कमी आढळतो. त्याच प्रमाणे अतिशय जलद उडण्याकरता ही खास प्रसिद्धा आहेत. त्यात यांचे रंगसुद्धा असे आहेत की अगदी जवळून बघितल्यावरच त्यांच्या "भगव्या" रंगाची जाणीव होते. अन्यथा तशाच मळकट रंगाची असल्यामुळे ती सुसाट उडताना कळतसुद्धा नाहीत. मागे येऊरच्या जंगलात एकदा एका उंच झाडावर हे ऑरेंज आउलेट उडत होते. लांब पल्ल्याच्या लेन्सने जेमतेम त्याचे क छायाचित्र घेता आले पण त्यात फक्त हे ऑरेंज आउलेट आहे एवढेच ओळखता येत होते आणि त्या छायाचित्राला काहीच मजा नव्हती. दुसरे ऑरेंज टेल आऊल तर फक्त एकदाच दिसले पण सुसाट वेगाने ते झाडीत शीरले की पुढे पळत जाउन त्याचा पाठलाग करूनसुद्धा त्याचे मला एकही छायाचित्र मिळवता आले नाही. त्यानंतर पुढे कित्येक वर्षे ती मला आमच्या जंगलात सापडलीच नाहित, तर त्यांचे छायाचित्रण तर दूरच राहीले.
या नंतर बऱ्याच वर्षांनी मला परत एकदा नागलाच्या जंगलात ऑरेंज आउलेट दिसले आणि थोडेफार त्याचे छायाचित्रणसुद्धा झाले. मात्र फार कमी वेळ ते समोरच्या फुलातील मध पीत होते त्यामुळे ते लगेचच तीथून उडून गेले. आता यावर्षी मात्र फणसाडच्या अभयारण्यात या दोनही भगव्यांनी मला एकाच वेळेस दर्शन दिले. आदल्या दिवशी चिखल गाणीच्या पाठवठ्यावर एक जंगली झाड फुलले होते. त्यावर मध पिण्यासाठी ऑरेंज आउलेट बऱ्याच उंचावर बसले होते. त्यामुळे त्याचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी अगदी भल्या पहाटे सकाळी सहा, साडेसहाच्या सुमारास वनखात्याच्या रेस्ट हाउसच्या आवारातच मला एक फुलपाखराची चाहूल लागली. त्याच्या जलद उडण्याच्या पद्धतीवरून ते नक्कीच स्किपर होते. मी अंदाज केला की ते बहुतेक ऑरेंज टेल आउल असावे पण तेवढ्यात ते त्या भागातून गायब झाले. परत ५/१० मिनीटातच ते परत घराच्या भिंतीवर आले. माझा अंदाज बरोबर होता ते दुर्मिळ ऑरेंज टेल आउलच होते. आपल्या शरीरातून पोटाकडून पाणी भिंतीवर सोडून, तिथला भाग ओला करून मग त्यात आपली लांबलचक सोंड खुपसून ते क्षार शोषून घेत होते. आमची धावपळ उडाली, पहाटेची वेळ असल्यामुळे कॅमेरे तयार नव्हते. आम्ही पळत पळत जाउन तंबूतून कॅमेरे आणून त्याचे छायाचित्रण सुरू केले. त्याचे मनसोक्त छायाचित्रण करेपर्यंतच बाजुच्या खोलीच्या आसपास ऑरेंज आउलेटची हालचाल सुरू झाली. चुलीच्या आसपासच्या राखेवर ते आकर्षीत होत होत. मात्र ते भयंकर चपळ आणि चंचल होते. सरतेशेवटी ते एका लाकडाच्या फळीवर बसले आणि मग त्याचीसुद्धा छायाचित्रे घेण्यासाठी आमची धावपळ सुरू झाली. फणसाडमधील भल्यापहाटे अगदी अनपेक्षीत अशी ही दोन भगव्यांची एकत्र भेट मला कायम लक्षात राहील.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

मखमली मून मॉथ.
जगातल्या सर्व देखण्या पतंगांची यादी केली तर त्यात आपल्या भारतातल्या मून मॉथ याचा नंबर नक्कीच वराच वरती येईल. दिसायला अतिशय सुंदर असणारा हा पतंग भलामोठा म्हणजे अगदी ५ इंचांएवढा असतो. अतिशय तलम, मखमली पिस्ता रंगाचे हिरवट असे यांचे पंख असतात. त्या पंखांची वरची कडा गडद किरमीजी रंगाची असते तर खालच्या पंखांची टोके एखाद्या शेपटीसारखी लांब आणि वळलेली असतात. पंखांच्या मधे एक पारदर्शक खीडकीसारखे गोलाकार छिद्र भासते. ही नक्षी चंद्राच्या कलेसारखी दिसते म्हणूनच हा "मून" मॉथ. यांचे शरीर जाडजूड, केसाळ आणि पांढरेशुभ्र असते. पाय आणि तोंडाचा भाग गडद किरमीजी रंगाचा असतो. ह्यांच्या स्पृशासुद्धा मोठ्या, कंगव्यासारख्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. पंखांवरची गुलबट, पिवळसर झाक एकदम मनोहारी भासते.
भारतात सर्वत्र हा पतंग दिसत असला तरी तो सहज मात्र नक्कीच दिसत नाही. पावसाळ्यात आणि पावसानंतरच्या काही दिवसात यांची दिसण्याची शक्यता असते. निशाचर असल्यामुळे हे रात्रीच कार्यरत असतात आणि बऱ्याच वेळेला दिव्यावर आकर्षित झालेले आढळतात. दिवसामात्र झाडांच्या पानामागे हे दडून शांत बसून रहातात. नरापेक्षा आकाराने मोठी असलेली मादी करवंदावर, जांभळाच्या झाडावर जोंधळ्याच्या दाण्याएवढी पांढरट अंडी घालते. या अंड्यांवर तपकीरी, काळसर ठिपके असतात. साधारणत: १२/१४ दिवसानंतर त्यातून हिरवट रंगाच्या अळ्या बाहेर येतात. अतिशय खादाड असणाऱ्या अळ्या ह्या प्रचंड वेगाने खातात आणि तेवढ्याच जबरदस्त वेगाने वाढतात. आजुबाजुची एकदोन पाने वळवून ते आत कोष तयार करतात.
फार पुर्वी फिल्म कॅमेराच्या जमान्यात याची छायाचित्रे मी येऊरच्या जंगलात काढली होती, पन नंतर मात्र मधली काही वर्षे यांनी मला दर्शन दिले नव्हते. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील गोव्याच्या बटरफ्ल्याय मीटच्या वेळी मात्र याला प्रत्येक दिवशी बघायचा योग आला आणि त्यामुळे त्यांचे व्यवस्थीत छायाचित्रणसुद्धा करता आले. आम्ही गोव्याच्या तांबडी सुर्ला या भागातील जंगलात भटकत असताना आमच्या ग्रुपला एका ठिकाणी हा पतंग एका झाडामागे दडलेला सापडला. त्याचे छायाचित्रण झाल्यावर आम्ही पुढे निघालो. एका झऱ्याच्या काठावर आम्ही विश्रांती घेत होतो. समोरच "बेट"वर आलेल्या मलबार रेवन, क्रुझर, कॉमन जे यांचे छायाचित्रण सुरू होते. एवढ्यात कोणीतरी सांगल आला की तीथे एक पिवळसर, पांढरा वेगळाच दिसणारा किडा आहे आणि त्याने मला त्याच्या मोबाईलच्या कॅमेराने काढलेला त्याचे छायाचित्र दाखवले. मी चक्रावून गेलो, तो कुठलातरी किडा नसुन नुकतेच कोषातून बाहेर आलेले मून मॉथ होते. त्याचे पंखसुद्धा पुर्ण सुकले नव्हती आणि त्यांचा विस्तारसुद्धा झालेला नव्हता.
अर्थातच आम्ही पळत पळत त्या जागेवर पोहोचलो, जमिनीपासून जेमतेम एका फुटाच्या अंतरावर गवताच्या पात्यांच्या आधाराने ते मून मॉथ बसले होते. बाजुलाच त्याच्या , रीकामा, अर्धवट गुंडाळलेला कोष दिसत होता. एखाद्या कापसाच्या बोंडासारखे त्याचे पांढरेशुभ्र शरीर आणि त्यावर पिवळसर, गुलाबी, लाल कडा असलेले पंख अतिशय सुंदर दिसत होते. आम्ही सर्वांनी त्याची झटपट छायाचित्रे काढून घेतली आणि झऱ्यावर परतलो. दर १०/१५ मिनीटांनी मी परत परत त्याच्याकडे जाउन त्याचे निरिक्षण आणि छायाचित्रण करत होतो. त्याची प्रत्येक अवस्था ही अधिकाधिक मनमोहक होती. जवळपास दोन तासांच्या अंतराने त्याचे पंख पुर्ण प्रसरण पावले. तोपर्यंत आम्ही सर्वांनी त्याची शेकड्यानी छायाचित्रे घेतली होती. डोळ्यासमोर त्याचे पंख पुर्ण विस्तार होताना बघणे म्हणजे शब्दात व्यक्त न करण्यासारखे दृश्य होते. जमिनीवर एवढया खालच्या अंतरावर, एवढ्या उठावदार रंगाचा, एवढ्या मोठ्या आकाराचा पतंग असा सहज कसा बसला होता याचेच आम्हाला आश्चर्य वाटत होते. त्यानंतरच्या २/३ दिवसात आम्हाला खुप वेळा वेगवेगळे मून मॉथ दिसले. त्याच्या लालभडक पायांचे, त्याच्या कंगव्यासारख्या हिरव्या स्पृशांचे, त्याच्या वळलेल्या लांबलचक शेपटीचे, त्याच्या पंखांवरील चंद्राच्या कलेप्रमाणे असलेल्या नक्षीचे मी बरेच छायाचित्रण केले. पण अर्थातच त्याचे कोषातून बाहेर येणे आणि पंख विस्ताराचे दर्शन हे कधीही न विसरण्यासारखे दृश्य आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/