Friday, October 08, 2010

बी हॉक मॉथ.

आज जगात हॉक मॉथ या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात. मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या पतंगांचे मोठे डोके आणि बटबटीत डोळे प्रामुख्याने नजरेत भरतात. हे त्यांचे बटबटीत डोळे वेगवेगळे रंगसुद्धा ओळखू शकतात असे आता अभ्यासानंतर सिद्ध झाले आहे. यांचे पुढचे पंख त्रिकोणी आणि निमुळते असून मागचे पंख आकाराने लहान आणि पुढच्या पंखांखाली झाकले जाणारे असतात. हे जरी पंख निमुळते आणि लहान असले तरी तरी त्यांची उड्डाणशक्ती अतिशत जलद म्हणजे ताशी ५० कि.मी. असते. ह्यातील कित्येक जाती उडता उडता डावीकडे किंवा उजवीकडे जाऊ शकतात किंवा अगदी उडता उडताच फुलांतील मधुरस पीऊ शकतात. हे पतंग सहसा सुर्यास्तानंतर उडताना दिसतात. काही काही जाती तर अगदी मध्यरात्रीनंतर उडताना आढळतात तर काही जाती अपवादात्मक दिवसाच उडताना दिसतात.

या हॉक मॉथ मधेही उड्डाणासाठी खास ओळखले जाणारे बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ आपल्याला फक्त पावसाळ्यातच दिसतात. बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ यासारखे पतंग फुलांवर मधाकरता झेपावताना तब्बल ३०० वेळा प्रतिसेकंद पंख हलवतात आणि हवेतल्या हवेतच, उडता उडता आपली लांब सोंड फुलांत खुपसून मध प्राशन करतात. त्यांची ही हालचाल एवढी जलद असते की आपल्याला उडताना त्यांचे फक्त शरीरच दिसते आणि पंखांची हालचाल जाणवून येत नाही. यातील बऱ्याचशा जातींचे पंख पारदर्शक असतात किंवा त्यावर बारीक नक्षी असते. पण म्हणूनच यांचे शरीर हे अतिशय रंगीत असते आणि त्यावर अनेक रंगाची पखरण दिसून येते. या पतंगांची अजून एक खासियत म्हणजे त्यांची लांबलचक सोंड. शरीरापेक्षा कीतीतरी मोठी लांब असलेल्या ह्या सोंडेने ते घंटेसारख्या खोलगट फुलांतील मध सुद्धा सहज पीऊ शकतात. या करता यांची सोंड अगदी १० ईंचापर्यंतसुद्धा लांब असू शकते. याच कारणासाठी ऑर्किड, पपई अश्या कित्येक झाडांचे परागीभवन खास या पतंगाकडून केले जाते आणि त्यासाठी ते आपल्यासाठी अतिशय उपकारक ठरतात.

या पतंगाची मादी त्यांच्या अन्नझाडाच्या पानाखाली एकेकटे अंडे घालते मात्र ती मादी एका हंगामात १००च्या आसपास अंडी घालते. हिरवट रंगाची ही अंडी जातीप्रमाणे ३ ते १० दिवसात उबून त्यातून अळी बाहेर येते. ह्या अळ्याही मोठ्या, जाडजूड असतात. ह्या अळ्यांना ओळखायची सोपी खुण म्हणजे त्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागावर एक शेपटीसारखे शिंग असते. ही अळी दिसायला नितळ, गुळगुळीत पण जाडजूड आणि गुबगुबीत असते. ह्यांचे रंग अगदी उठावदार असतात. ह्यात प्रामुख्याने हिरवा, पिवळा रंग असतो. त्यांच्यावर पट्ट्या पट्टयांची किंवा डोळ्यांची नक्षी असते. ह्या डोळ्यांच्या किंवा पट्ट्यांच्या नक्षीमुळे त्यांचा अविर्भाव एखाद्या सापासारखा किंवा भयावह असा दिसतो. यात सुद्धा जर त्यांना डिवचले अथवा त्यांना धोका जाणवला तर त्या आपले डोके खाली घालून मान आणि शेपटीकडचा भाग उंचावतात. कोषावस्थेकरता त्या झाडाखाली उतरून पालापाचोळ्यामधे अथवा मातीमधे कोष करतात किंवा चक्क मातीच्या आत शिरून मातीचा घुमटाकार आकार बनवून आत कोष करतात.

या जलद उडणाऱ्या पतंगाचे हवेतल्या हवेत, उडतानाचे छायाचित्र मिळवणे तसे थोडेफार कठिणच काम असते. एकतर इतर पतंगांपेक्षा हे पतंग आकाराने एकदम लहान असतात आणि त्यांचे पंखसुद्धा रंगीत नसतात त्यामुळे ते जंगलात पटकन सापडत नाहीत. यांना शोधण्यासाठी आधी ज्या फुलांमधे मध जास्त आहे अशी झाडे शोधावी लागतात आणि त्या ठिकाणी चक्क त्यांची वाट बघत बसावे लागते. यावेळी आपल्याकडे कॅमेरा, फ्लॅश अशी साधने असावी लागतात आणि "प्रचंड" वेळ थांबण्याची तयारी, चिकाटी असावी लागते. असा सर्व जामानिमा केला तरी आपल्याला योग्य असे छायाचित्र मिळेलच याची खात्री नसते कारण हे पतंग इतके जलद उडत असतात की त्यांच्यावर लेन्सनी फोकसिंग करणे कठिण असते. जर का फोकसिंग केले की तेवढ्यात त्यांचा त्या फुलातला मध पिऊन होतो आणि ते दुसऱ्याच फांदीवर वळतात. त्या फांदीकडे आपण लेन्स वळवली की ते आपल्या अगदी जवळच्या फांदीवरच्या फुलावर झेपावतात. आता ही फांदी आपल्या लेन्सच्या “minimum” फोकसिंग अंतराच्या आत असल्यामुळे आपण तिच्यावर फोकसिंग करू शकत नाही आणि तो पतंग अगदी जवळ असला तरी आपण त्याचे छायाचित्रण करू शकत नाही. आता चक्क तो आपल्या जवळून लांब जाण्याची वाट आपल्याला बघावी लागते पण कदाचीत त्याचा तिथल्या फुलातील “इंटरेस्ट” संपतो आणि तो तिकडून निघूनही जाउ शकतो. त्यामुळे स्वत:च्या “frustration level” ची पातळी कुठपर्यंत जाउ शकते हे बघायचे असेल तर या पतंगाच्या छायाचित्रणाचा अनुभव नक्की घ्यावा.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
लॉबस्टर पतंगाची अळी.

फुलपाखरांच्या किंवा पतंगांच्या अळ्या ह्या तश्या निरूपद्रवी आणि अतिशय कमी हालचाल करणाऱ्या असतात. याच कारणांमुळे त्यांची पक्ष्यांकडून किंवा इतर भक्षकांकडून सहज शिकार केली जाते. यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांची रंगसंगती आजूबाजूशी एकदम मिळतीजुळती होणारी असते यामुळे त्या आसपासच्या रंगात एकदम मिसळून जातात. त्याचबरोबर काही जातीच्या अळ्या असे अनाकर्षक रंग धारण करतात की पक्षी त्यांच्या कडे ढुंकूनसुद्धा बघत नाहित. याही पेक्षा काही जातीत तर त्यांच्या आकारच अस काही खास असतो की त्यांचे अस्तित्व जाणवत नाही किंवा त्या अळ्या नसून दुसरेच काहीतरी असल्याचा आभास होतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या लॉबस्टर पतंगांच्या अळ्या. यांचा अविर्भाव असा काही गचाळ असतो की पक्षी साधारणत: यांच्या आसपास फिरकत नाहीत. याच अळ्या जेंव्हा अगदी लहान असतात तेंव्हा त्यांना डिवचले तर त्या एकदम त्यांचे शरीर आक्रसून घेतात. मग डोके आणि शेपुट एकत्र घेउन पाय ताणतात, यामुळे त्यांचा आकार काहीसा मुंग्यांसारखा भासतो. नवलाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या पाठीवरच्या खास ग्रंथींमधून फॉर्मिक आम्लाचा फवारासुद्धा सोडतात. या सगळ्यामुळे त्यांची मुंग्यांची नक्कल अगदी तंतोतंत ठरते आणि त्यांच्या आसपास त्यांचे भक्षक फिरकत नाहित.

फुलपाखराचा जीवनक्रम हा वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांचा असतो. प्रथम फुलपाखरे अंडी टाकतात, त्यानंतर त्यातून वळवळणारे कीडे बाहेर येतात. या वळवळणाऱ्या कीडयांनाच सुरवंट अथवा अळ्या म्हणतात. या एकाच अवस्थेमधे त्या प्रचंड प्रमाणात खाऊ शकतात आणि तेवढयाच प्रमाणात वाढू शकतात. नवीन जन्माला आलेली अळी तिच्या आयुष्यात १५०० पट खाणे खाते आणि तेवढयाच पटीने वाढते. अळीच्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खाणे, खाणे आणि खाणेच असते. एवढया प्रचंड प्रमाणात खाऊन त्या आपल्या शरीरात पुढच्या अवस्थांकरीता उर्जा चरबीच्या स्वरूपात साठवून ठेवतात.

या अळ्या अंडयाच्या टोकाला एक बारीकसे छीद्र पाडून त्यातुन बाहेर येतात. अंडयातून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम ते त्या अंडयाची टरफले खाऊन टाकतात. या अंडयाच्या कवचांमुळे त्यांना सर्वाधिक प्रथिने मीळतात. ही एकमेव वाढायची शारीरिक अवस्था असल्यामुळे जेवढे खाणे खाता येइल तेवढे अळी खाऊन घेते. या अळीचा जबडा एखद्या कात्रीसारखा भरभर चालतो आणि ती पानामागुन पान आणि फांदीमागुन फांदी फस्त करत जाते. जशी जशी अळी वाढत जाते तशी तशी तिची कातडी लहान लहान होत जाते. मग ती कात टाकून नवीन कातडीसकट परत वाढू लागते. अळीच्या आयुष्यात ती एकंदर पाच वेळेला कात टाकते.

जरी अळ्या पाने खाउन जगत असल्या तरी प्रत्येक अळीचे स्वता:चे असे अन्नझाड ठरलेले असते. पानांमधील जी काही रासायनिक द्रव्ये असतात तीच या अळ्यांच्या शरीराला पोषक असतात. म्हणुन अळ्या आपल्या विशिष्टय अन्नझाडावर किंवा त्या उपजातीच्या अन्नझाडावरच जगु शकतात. या अळ्या एखादे वेळी उपाशी मरतील पण दुसऱ्या जातीच्या झाडाला तोंड लावत नाहीत. या करता फुलपाखराच्या मादीने आपल्या उपजत कौशल्याने अगदी बरोबर असलेल्या अन्नझाडावरच अंडी घातलेली असतात. कधीकधी तर ती एखाद्या निष्पर्ण झाडावरसुद्धा अंडी घालते. पण त्या मादीचा अंदाज एवढा बरोबर असतो की जोपर्यंत अंडयातून अळ्या बाहेर येतात तोपर्यंत झाडाला नवीन पालवी फुटलेली असते. या अळ्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी आपल्याप्रमाणेच ठरलेल्या असतात. जातीप्रमाणे काही अळ्या अगदी कोवळी पाने खाणे पसंद करतात तर काही जातींच्या अळ्यांना मात्र अगदी जाड, निबर, जुन पानेच लागतात. काही जातीच्या अळ्या पानाचा वरचा पृष्टभाग पोखरून पानाच्या आत जाउन तेथला मांसल गर खातात.

या अशा वेगवेगळ्या अळ्यांना बघण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्याचा. अर्थातच या वेळी जंगलात अनेक प्रकारच्या नवनवीन झाडांना पालवी आलेली असते आणि याचमुळे त्यावर अनेक प्रकारची फुलपाखरे आणि पतंग अंडी घालतात. कालांतराने त्यातून अशा चित्रविचीत्र आकाराच्या अळ्या बाहेर येतात. त्यामुळे यावेळी जर का जंगलात आपण फेरफटका मारला तर नक्कीच १०/१२ वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आपल्याला दिसू शकतात. इतर अळ्या जरी सहज दिसत असल्या तरी या लॉबस्टर पतंगाच्या अळ्या दिसणे मात्र थोडे कठीणच काम असते. यांचा एकंदर अविर्भाव असा असतो की झाडावर काहीतरी सुक्या पानाचा कचराच पडला आहे असे वाटते. इथे छायाचित्रात मात्र त्यांचे एकदम जवळून छायाचित्र घेतल्यामुळे त्यांचा आकार, रंग अगदी व्यवस्थीत जाणवतो पण जंगलात मात्र लांबून त्यांन बघितले तर त्या अळ्या आहेत हे सांगूनही पटत नाही.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com