Friday, October 08, 2010

लॉबस्टर पतंगाची अळी.

फुलपाखरांच्या किंवा पतंगांच्या अळ्या ह्या तश्या निरूपद्रवी आणि अतिशय कमी हालचाल करणाऱ्या असतात. याच कारणांमुळे त्यांची पक्ष्यांकडून किंवा इतर भक्षकांकडून सहज शिकार केली जाते. यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांची रंगसंगती आजूबाजूशी एकदम मिळतीजुळती होणारी असते यामुळे त्या आसपासच्या रंगात एकदम मिसळून जातात. त्याचबरोबर काही जातीच्या अळ्या असे अनाकर्षक रंग धारण करतात की पक्षी त्यांच्या कडे ढुंकूनसुद्धा बघत नाहित. याही पेक्षा काही जातीत तर त्यांच्या आकारच अस काही खास असतो की त्यांचे अस्तित्व जाणवत नाही किंवा त्या अळ्या नसून दुसरेच काहीतरी असल्याचा आभास होतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या लॉबस्टर पतंगांच्या अळ्या. यांचा अविर्भाव असा काही गचाळ असतो की पक्षी साधारणत: यांच्या आसपास फिरकत नाहीत. याच अळ्या जेंव्हा अगदी लहान असतात तेंव्हा त्यांना डिवचले तर त्या एकदम त्यांचे शरीर आक्रसून घेतात. मग डोके आणि शेपुट एकत्र घेउन पाय ताणतात, यामुळे त्यांचा आकार काहीसा मुंग्यांसारखा भासतो. नवलाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या पाठीवरच्या खास ग्रंथींमधून फॉर्मिक आम्लाचा फवारासुद्धा सोडतात. या सगळ्यामुळे त्यांची मुंग्यांची नक्कल अगदी तंतोतंत ठरते आणि त्यांच्या आसपास त्यांचे भक्षक फिरकत नाहित.

फुलपाखराचा जीवनक्रम हा वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांचा असतो. प्रथम फुलपाखरे अंडी टाकतात, त्यानंतर त्यातून वळवळणारे कीडे बाहेर येतात. या वळवळणाऱ्या कीडयांनाच सुरवंट अथवा अळ्या म्हणतात. या एकाच अवस्थेमधे त्या प्रचंड प्रमाणात खाऊ शकतात आणि तेवढयाच प्रमाणात वाढू शकतात. नवीन जन्माला आलेली अळी तिच्या आयुष्यात १५०० पट खाणे खाते आणि तेवढयाच पटीने वाढते. अळीच्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खाणे, खाणे आणि खाणेच असते. एवढया प्रचंड प्रमाणात खाऊन त्या आपल्या शरीरात पुढच्या अवस्थांकरीता उर्जा चरबीच्या स्वरूपात साठवून ठेवतात.

या अळ्या अंडयाच्या टोकाला एक बारीकसे छीद्र पाडून त्यातुन बाहेर येतात. अंडयातून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम ते त्या अंडयाची टरफले खाऊन टाकतात. या अंडयाच्या कवचांमुळे त्यांना सर्वाधिक प्रथिने मीळतात. ही एकमेव वाढायची शारीरिक अवस्था असल्यामुळे जेवढे खाणे खाता येइल तेवढे अळी खाऊन घेते. या अळीचा जबडा एखद्या कात्रीसारखा भरभर चालतो आणि ती पानामागुन पान आणि फांदीमागुन फांदी फस्त करत जाते. जशी जशी अळी वाढत जाते तशी तशी तिची कातडी लहान लहान होत जाते. मग ती कात टाकून नवीन कातडीसकट परत वाढू लागते. अळीच्या आयुष्यात ती एकंदर पाच वेळेला कात टाकते.

जरी अळ्या पाने खाउन जगत असल्या तरी प्रत्येक अळीचे स्वता:चे असे अन्नझाड ठरलेले असते. पानांमधील जी काही रासायनिक द्रव्ये असतात तीच या अळ्यांच्या शरीराला पोषक असतात. म्हणुन अळ्या आपल्या विशिष्टय अन्नझाडावर किंवा त्या उपजातीच्या अन्नझाडावरच जगु शकतात. या अळ्या एखादे वेळी उपाशी मरतील पण दुसऱ्या जातीच्या झाडाला तोंड लावत नाहीत. या करता फुलपाखराच्या मादीने आपल्या उपजत कौशल्याने अगदी बरोबर असलेल्या अन्नझाडावरच अंडी घातलेली असतात. कधीकधी तर ती एखाद्या निष्पर्ण झाडावरसुद्धा अंडी घालते. पण त्या मादीचा अंदाज एवढा बरोबर असतो की जोपर्यंत अंडयातून अळ्या बाहेर येतात तोपर्यंत झाडाला नवीन पालवी फुटलेली असते. या अळ्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी आपल्याप्रमाणेच ठरलेल्या असतात. जातीप्रमाणे काही अळ्या अगदी कोवळी पाने खाणे पसंद करतात तर काही जातींच्या अळ्यांना मात्र अगदी जाड, निबर, जुन पानेच लागतात. काही जातीच्या अळ्या पानाचा वरचा पृष्टभाग पोखरून पानाच्या आत जाउन तेथला मांसल गर खातात.

या अशा वेगवेगळ्या अळ्यांना बघण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्याचा. अर्थातच या वेळी जंगलात अनेक प्रकारच्या नवनवीन झाडांना पालवी आलेली असते आणि याचमुळे त्यावर अनेक प्रकारची फुलपाखरे आणि पतंग अंडी घालतात. कालांतराने त्यातून अशा चित्रविचीत्र आकाराच्या अळ्या बाहेर येतात. त्यामुळे यावेळी जर का जंगलात आपण फेरफटका मारला तर नक्कीच १०/१२ वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आपल्याला दिसू शकतात. इतर अळ्या जरी सहज दिसत असल्या तरी या लॉबस्टर पतंगाच्या अळ्या दिसणे मात्र थोडे कठीणच काम असते. यांचा एकंदर अविर्भाव असा असतो की झाडावर काहीतरी सुक्या पानाचा कचराच पडला आहे असे वाटते. इथे छायाचित्रात मात्र त्यांचे एकदम जवळून छायाचित्र घेतल्यामुळे त्यांचा आकार, रंग अगदी व्यवस्थीत जाणवतो पण जंगलात मात्र लांबून त्यांन बघितले तर त्या अळ्या आहेत हे सांगूनही पटत नाही.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments: