स्वालोटेल गटातील ब्ल्यू बॉट्ल हे एक नितांत
सुंदर फुलपाखरू. या फुलपाखराचा आकार मोठा म्हणजे साधारणत: ८० ते ९० मि.मि. एवढा
असतो. याच्या पंखांचा रंग गडद तपकीरी, राखाडी असतो पण त्यावर असलेल्या झळाळाणाऱ्या
गडद हिरवट निळ्या पट्ट्यामुळे याचे नामकरण ब्ल्यू बॉटल असे केले आहे. खालच्या
पंखाच्या इथे सुरू झालेला हा निळा पट्टा वरच्या पंखावर जाताना त्याचे मोठ्या
ठिपक्यांमधे परावर्तन होते. स्वालोटेल जातीचे हे फुलपाखरू असल्यामुळे दोन्ही पंख
टोकाकडे निमुळते असतात. मागील पंखाच्या टोकाला शेपट्या असतात आणि त्याच्या बाजूला
निळसर रंगाचे चंद्रकोरीसारख्या ठिपक्यांची नक्षी असते. या नक्षीच्या बाजूलाच अतिशय
फिकट लालसर ठिपके असतात. या फुलपाखरातील नर आणि मादी दिसातला सारखेच असतात.
सकाळच्या कोवळया उन्हात
मधाकरता अनेक प्रकारच्या फुलांना ते भेटी देतात. मात्र या फुलपाखराचा उडण्याचा वेग
प्रचंड असतो. एका फुलावर जेमतेम काही क्षणच ती असतात आणि लगेच वेगाने पुढच्या
फुलाला भेट देतात. फुलांतील मधाप्रमाणेच अतिपक्व फळे, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष,
त्यांची विष्ठा यावर सुद्धा ही फुलापाखरे आकर्षित झालेली आढळतात. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे कोरडे ओढे, नाले यांच्या आसपास आढळतात. या फुलपाखरांना "चिखलपान" अतिशय प्रिय असल्याने ती परत परत त्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला दिशू शकतात. हे फुलपाखरू जर का चिखलपान करत असेल तर त्याचे
छायाचित्रण आपल्याला सहज करता येते. भारतात हे फुलपाखरू घनदाट जंगलाप्रमाणेच अगदी
दाट वस्तीतील बागांमधेसुद्धा सहज दिसून येते.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com