Tuesday, September 29, 2015

फुलपाखरांची अंगत पंगत.....

मार्च / एप्रिलच्या महिन्यात थंडी गायब होते आणि अचानक उन्हाच्या झळा जाणवू लागतात. याच काळात पानझडी जंगलामधे सगळ्या झाडांची पाने गळून गेल्यामुळे जंगले उघडी बोडकी दिसायला लागतात. आधीच वरून सुर्य तळपत असतो आणि हिरव्या पानांचे आच्छादन गायब झाल्यामुळे त्या उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवतो. आता या अश्या रूख्यासुक्या जंगलात भटकताना छायाचित्रण तसे कमीच होते. अर्थात या कारणामुळे जर का आपण जंगलाला भेट दिली नाही तर तो खरोखरच वेडेपणा ठरेल कारण हाच काळ फुलपाखरांच्या दिसण्याचा आणि त्यांच्या छायाचित्रणाकरता उत्तम समजला जातो. बऱ्याच जणांचा असा समज असतो की पावसाळ्यात आणि जिथे फुले खुप असतात त्या वेळी आणि त्या ठिकाणी फुलपाखरे जास्त सापडतात. मात्र या उन्हाळ्याच्या गरम दिवसात सुद्धा बऱ्याच जातीची फुलपाखरे मोठ्या संख्येने चिखलपान करताना एकत्र दिसतात.


आता हे चिखलपानसुद्धा काय असते ते मला अगदी अचानकच कळले. खुप वर्षांआधी उन्हाळ्याच्या सुट्टीत पनवेलजवळच्या कर्नाळ्या किल्ल्यावर ट्रेकींगसाठी गेलो असताना, गडावरच्या टाक्यातील पाणी आणण्यासाठी आमची शोधाशोध सुरू होती. मी एका कोरड्या नाल्यामधून त्याच्या उगमाकडे वर वर चढत होतो. खरे तर तो एक कोरडा पडलेला धबधब्याचा झालेला ओढा होता. एका ठिकाणी खडकाच्या घळीमधे पाण्याचा थोडासा साठा होता आणि त्यातले काही पाणी खाली झिरपत होते आणि त्याचा चिखल झाला होता. मी एकदम पुढे गेलो तर एकदम शे / दोनशे फुलपाखरे भर्रकन उडाली. मी एकदम अचंबित होऊन थबकलो आणि बघितले तर जवळपासच्या चिखल्याच्या भागावर अनेक जातीची फुलपाखरे जणु त्यांना तिथे चिकटवले आहे अशी बसली होती. हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. एरवी एकेक फुलपाखरू दिसते आणि त्याच्या मागे मागे छायाचित्रणासाठी पळावे लागते पण इथे तर वेगळाच प्रकार दिसत होता. शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे मोठ्या संख्येने एकत्र शांत आणि तीसुद्धा जमिनीवर बसलेली म्हणजे छायाचित्रकारांची तर पर्वणीच म्हणायची.


परत आल्यानंतर या प्रकाराबद्द्ल अधिक माहिती शोधली. सहसा फुलपाखरे अनेक फुलांना भेटी देउन त्यातील मधुर रस अथवा मध प्राशन करतात पण याच जोडीला त्यांच्या शरीराला अनेक इतर क्षारांची गरज असते ती फक्त त्या मधातून पुर्ण केली जाउ शकत नाही. या करता त्यांना मग इतर पदार्थांमधून ते क्षार मिळवायला लागतात. या फुलपाखरांचे नर जेंव्हा चिखलपान अथवा  mud puddling  करतात तेंव्हा त्यांना सोडियम आणि अमिनो आम्ले मिळतात. मादीबरोबर मिलन करताना ही पोषक द्रव्ये मादीला दिली जातात ज्याचा फायदा त्यांची अंडी वाढण्याकरता होतो. फुलपाखरांचे चिखलपान सहसा उन्हाळ्यात होते. पानगळी रानांमध्ये, उन्हाळ्याच्या कोरड्या दिवसात ही फुलापाखरे मोठया संख्येनी पहायला मिळतात. अतिशय जलदगतीने उडणारी ही फुलपाखरे तापमान वाढू लागले की रानातील झऱ्याजवळ, ओढयाजवळच्या ओल्या जमिनीवर, चिखलावर बसलेली पहायला मिळतात. एका वेळी अक्षरश: शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे एकाच ठिकाणी अगदी एका ताटात जेवल्याप्रमाणे एकत्र बसलेली आढळतात. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन जे, ब्लू बॉट्ल, इमीग्रंट, कॉमन गल, झेब्रा ब्लू, ग्राम ब्लू, लेपर्ड, ग्रास ज्वेल, सनबीम अशी अनेक फुलपाखरे असे चिखलपान करताना आढळतात. उत्तर भारतात आणि दक्षीण भारतात आपल्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या जातीसुधा असे चिखलपान करताना दिसतात. या वेळेला अर्थातच त्यांचे छायाचित्रण आपल्याला सहज करता येते आणि एकाच जागी अनेक वेगवेगळ्या जाती आपल्याला छायाचित्रणासाठी मिळू शकतात.अर्थात असे चिखलपानाचे “स्पॉट” शोधून काढावे लागतात. सगळ्याच सुक्या ओढ्या / नाल्यांमधे हे चिखलपान होत नाही. त्या ठिकाणी थोडा चिखल, थोडी सुकी माती, मोठे दगड आणि प्रचंड उन असे सगळे व्यवस्थित जमले तर चिखलपान होते. मात्र असे एखादे ठिकाण जर आपल्याला सापडले तर मात्र दरवर्षी त्या ठिकाणी चिखलपान होतेच होते. फक्त ते होण्याचे दिवस उन्हाच्या तडाख्याप्रमाणे आणि त्या ठिकाणचे पाणी सुकण्याप्रमाणे पुढे मागे होतात. आतापर्यंत गेल्या काही वर्षात मी कर्नाळा अभयारण्य, येऊर, फणसाड, तुंगारेश्वर, बोंडला, नेत्रावली अशा अनेक जंगलात हे फुलपाखरांचे चिखलपान सातत्याने बघत आलो आहे. मार्च / एप्रिल झाला की या ठिकाणांना रणरणत्या उन्हात भेट द्यायची. तळपत्या उन्हात आणि तापलेल्या दगडांवर कुठे एखादा सावलीचा तुकडा असेल तर त्यावर बुड टेकवून तासन तास फुलपाखरांची वाट बघायची. ती बिचारी फुलपाखरेसुद्धा इतर मोठ्या प्राण्यांसारखा त्रास देत नाहित आणि आजूबाजुला उडत रहातात. हो पण दरवेळेला ते समोर बसून आपल्याला छायाचित्र देतीलच असे मात्र नक्कीच नाही. ती आपली त्यांच्याच मस्तीत, मजेत गिरक्या घेत आजूबाजूला लहरत रहातात आणि त्यांना वाटेल त्याच वेळेस बसतात. खरेच सांगतो त्या फुलपाखरांना बघताना, त्यांचे छायाचित्रण करताना त्या रणरणत्या उन्हाच्या त्रासाचे फारसे काहीच वाटत नाही.

या फुलपाखरांमधे नाजुकशी ब्लू जातीची अनेक छोटी छोटी फुलपाखरे असतात. मोठ्या आकाराची इमीग्रंट, स्पॉट स्वोर्ड्टेल, कॉमन जे सुद्धा असतात. या फुलपाखरांचे छायाचित्रण सुरू असतानाच मधेच एक गडद रंगाचे चपळ गॉडी बॅरन जातीचे झळाळणाऱ्या हिरव्या रंगाचे लाल ठिपके असलेले फुलपाखरू बाजूला येते आणि मग त्याच्या मागे मागे पळावे लागते. त्याचे छायाचित्रण सुरू असतानाच लांबच्या चिखलाच्या भागावर अलगद ब्लू ओकलीफ अवतरते. मग काय सगळा जामानिमा सावरत त्याच्या मागे पळावे लागते. वेगवेगळ्या भागात सतत फेऱ्या मारून कुठे वेगळी आणि सहज न दिसणारे फुलपाखरे तिथे आला आहेत का हे बघावे लागते. यामुळे वर्षभरात न दिसणारी फुलपाखरे आपल्याला टिपता येतात. इथे एक कायम लक्षात ठेवायचे की “हातचे सोडून पळत्याच्याच” मागे लागायचे आणि कायम “हाजीर तो वजीर” असेच समजायचे.

युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com