Monday, November 06, 2006

रेड पियरो (Red Pierrot)

हे "रेड पियरो" जातीचे अतिशय सुंदर आणि आकर्षक फुलपाखरू आहे. याच्या पंखांचा वरचा रंग गडद काळा, जांभळी झाक असणारा असतो. खालच्या पंखांची कडा झळाळत्या भगव्या रंगाची असते आणि त्यांच्या टोकाला तपकीरी रंगाच्या दोन बारीक, नाजूक शेपटया असतात. पंखांचा खालचा रंग पांढरा शुभ्र असतो आणि त्यावर काळे ठिपके असतात. वरच्या पंखाची बाहेरची कडा काळी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. खालच्या पंखाच्या या काळ्या किनारीच्या आत भगव्या रंगाची जाड किनार असते आणि त्यावर पांढर्या रंगाच्या ठिपक्यांची एक रांग असते. येऊरच्या किंवा आपल्या आसपासच्या जंगलांमधे हे फुलपाखरू फार कमी दिसते. मात्र ज्या ठिकाणी त्यांचे अन्नझाड (पानफूटी) आहे त्याच्या आसपास, शहरामध्ये, बागांमध्ये ही फुलपाखरे मुबलक प्रमाणात दिसतात. हीवाळ्याच्या सुरवातीस ही फुलपाखरे आपल्याला जास्त आढळतात. आपल्या बागेत जर पानफूटीची रोपटी असतील तर आपण यांचा संपूर्ण जीवनक्रम सहज अभ्यासू शकतो.

हे फुलपाखरू अतिशय संथ गतीने उडत असते. हळूहळू पंख फडफडवत ते जमीनीच्या खालच्या पातळीवर आणि अन्नझाडाच्या आसपास उडत असते. हे छोटया छोटया गिरक्या घेत थोडयाच वेळात जवळच्या फांदीवर स्थीरावते, आणि पंखांचा भाग उंचावून आपल्या शेपटया हलवत बसते. यामुळे या शेपटया त्यांच्या मिश्या असल्याचा भास आपल्याला आणि भक्षकांनासुद्धा होतो. त्यामुळे त्या भक्षकाने जरी हल्ला केला तरी त्याच्या तोंडी पंखाचा शेवटचा भाग येतो आणि "जीवावरचे" शेपटीवर निभावते. या फुलपाखरांना फुलांतील मध खूप आवडतो आणि म्हणूनच ती आपल्याला फुलांच्या अवतीभोवती, बागांमध्ये आढळतात.

या फुलपाखराची मादी एका वेळेला एकच अंडे पानाच्या टोकावर टाकते. मात्र एकाच झाडावर ती वेगवेगळ्या पानांवर बरीच अंडी घालते. अंडयातून बाहेर येऊन लगेचच छोटी अळी पानाच्या आत शिरते. आता ती तीचा सगळा वेळ या पानाच्या दोन आवरणामध्येच घलवणार असते. या पानाच्या दोन पातळ पापुद्र्यामधला मांसल गर ती खाण्याकरता वापरते. ही अळी प्रचंड खादाड असते आणि काही काळातच आतला सगळा गर संपून त्याजागी तीची काळ्या रंगाची विष्ठा साठून रहाते. कोष मात्र पानाच्या बाहेरच्या बाजूला पानावर किंवा पानाखाली केली जातो. साधारणत: आठवडयाच्या काळात कोषातून प्रौढ फुलपाखरू बाहेर येऊन त्याचा पुढचा जीवनक्रम सूरु ठेवते.