Friday, January 09, 2009

राजबिंडा ब्लॅक राजा.
एप्रिल, मे महिना आला की उन्हाची तलखी वाढायला लागते. आपल्या इकडच्या पानगळीच्या जंगलात जाताना दहावेळा विचार करावा लागतो कारण सर्वच मोठ्या झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि लहानसहान खुरटी झुडपे, गवत पुर्ण वाळून गेलेले असते. पक्षिनिरिक्षणासाठी आणि फुलपाखरांसाठी मात्र हा उत्तम काळ असतो. वाळक्या बिनपानांच्या झाडांत रंगीबेरंगी पक्षी सहज दिसतात. अगदी त्यांच्या आवाज आला आला तरी पर्णहीन झाडांवर त्यांना शोधणे सोपे जाते. या पक्ष्यांबरोबरच फुलपाखरांकरतासुद्धा हा काळ योग्यच असतो. बऱ्याच ओढ्यांच्या जागा, धबधब्यांच्या ठिकाणे वाळायला लागलेली असतात. पाण्याचे प्रमाण कमी असते आणि काही ठिकाणी चिखल सुकायला लागला असतो. हेच ठिकाण ह्या फुलपाखरांकरता योग्य असते. खुपशा फुलपाखरांच्या जातीतील नर अश्या ठिकाणी "चिखलपान" करायला एकत्र जमतात. एकत्र म्हणजे अक्षरश: ती शेकड्याने एकत्र, एकाच ठिकाणी जमलेली असतात. फुलपाखरांची वास घ्यायची क्षमता जबरदस्त असते आणि याच कारणामुळे ती जास्त मध असलेल्या फुलांवर लगेच आकर्षित होतात. याच मुळे ती या ओलसर चिखलावर पण आकर्षित होतात. ह्या चिखलात त्यांना पोषक अशी क्षारद्रव्ये मिळतात जी त्यांना फुलांतील मधापासून मिळत नाहीत.
बऱ्याच वेळेला नेहेमी जलद उडणारी फुलपाखरे यावेळी चिखलपान करताना आपल्याला अगदी शांत बसलेली आढळतात. याचबरोबर इतर वेळी न आढळणारी पण याच वेळेस दिसणारी स्पॉटेड स्वोर्डटेल, ब्लॅक ऍंगल अशी फुलपाखरे दिसतात. या सगळ्या फुलपाखरांबरोबर माझी नजर कायम शोधत असते ती "राजा" फुलपाखरांना. आपल्याकडे "टॉनी राजा" आणि "ब्लॅक राजा" असे दोन प्रकार दिसतात. दोघेही भन्नाट वेगाने उडणारे आणि बघता बघता होत्याचे नव्हते होणारे. ही फुलपाखरे तशी सहसा शहरात दिसत नाहीत. घनदाट जंगलांमधेच दिसली तर फार कमी वेळा दिसतात. या दोनही राजांना अतिपक्व फळे, मादक द्रव्ये, कुजलेली फळे / मांस यांची फार ओढ असते. त्यामुळे असे काही पदार्थ असतील तर त्यावर ती लगेच आकर्षित होतात आणि अश्या वेळेस त्यांचे छान छायाचित्रण होऊ शकते. हे ब्लॅक राजा फुलपाखरू खरोखरच राजा नावाला साजेसे असते. त्यांचे खालचे पंख चमकदार पांढऱ्या, राखी रंगाचे असतात आणि त्यावर निळसर झळाळी असते. ह्या पांढऱ्या रंगावर उठावदार पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. वरून मात्र हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून त्यावर ठळक पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांच्या रांगा असतात. सर्वात आकर्षक आणि राजाला शोभणाऱ्या म्हणजे याच्या खालच्या पंखांवर दोन दिमाखदार शेपट्या असतात. ज्या त्याच्या राजबिंड्या रूपात कायम भर घालतात. त्याच्या भन्नाट उडण्याच्या वेगामुळे आणि निसर्गाशी समरूप होणाऱ्या रंगामुळे ते एरवी पटकन दिसून येत नाहीत.
गेल्या वर्षी आम्ही नेलेल्या "फ्रुट बेट" वर एक ब्लॅक राजा आकर्षित झाले आणि आम्हाला त्याची बरीच छायाचित्रे मिळाली. मात्र या वर्षी माहिम निसर्ग उद्यानात माझ्या नेल्सन नावाच्या मित्राला एका झाडावर ७ ब्लॅक राजा एकाच ठिकाणी टिपता आले. त्याचे ते छायाचित्र अप्रतिम होते पण लगोलग आम्ही येऊरला गेलो असताना आम्हाला एक ब्लॅक राजा आकर्षित झालेले दिसले त्याचे छायाचित्रण करत असतानाच अजून दुसरे दोन ब्लॅक राजा आले आणि त्याच जागी बसले आणि मग मलासुद्धा एकाच वेळी तीन तीन ब्लॅक राजांची छायाचित्रे मिळाली. ती त्यांच्या रसपाना एवढी दंग होती की मी त्यातल्या एकाला हळूच बोटावर घेतले तरी त्याला त्याचे काही भान नव्हते. इतरांनी त्याची माझ्या बोटावर अगदी जवळून छायाचित्रे घेतल्यावर मी त्याला माझ्या मित्राच्या बोटावर सरकावले तरीही ते तिथेच स्थीर होते. इतरवेळी सुसाट वेगाने जाणारे हेच ते फुलपाखरू ह्यावर विश्वास बसत नव्हता. या नंतर तर तो मित्र त्याच्या कॅमेरात त्या फुलपाखराचे छायाचित्रण करताना त्याच्या लेन्समधे त्या ब्लॅक राजाचे प्रतिबिंब आणि पुढे ते बोटावरचे फुलपाखरू असेही छायाचित्र मला मिळवता आले.
युवराज गुर्जर.
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, January 06, 2009

फुलपाखराशी झटापट.
सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते. पण वेळप्रसंगी ते इतर कोळी एवढेच नव्हे तर त्यांच्याच जातीतील अशक्त कोळ्यांवरसुद्धा ताव मारायला पुढेमागे बघत नाहीत. सर्वसाधारणपणे कोळी जरी असले लहानसहान भक्ष्य खात असले तरी काही जातीचे कोळी हे बेडूक, सरडे, उंदीर आणी लहान पक्ष्यांचीसुद्धा शिकार करतात. कोळ्यांचे तोंड हे फक्त द्रव पदार्थ पिण्याकरता खास बनलेले असते. भक्ष्याच्या शरीरातील सर्व जीवनरस हा त्याच्या खास मुखावयातून शोषला जातो. अर्थातच हा द्रव पदार्थ ते पीत असल्यामुळे त्यांना खास वेगळे असे पाणी अगदी कमी लागते. कोळी जरी खादाड असले तरी प्रसंगी मोठ्या काळाकरता ते सहज उपास सोसू शकतात. कोळी त्यांच्या धारदार आणि तिक्ष्ण सुळ्यांनी भक्ष्याच्या शरीरात विष पसरवतात आणि त्यांना बेशुद्ध करून मग त्यांच्यावर ताव मारतात.
जाळे विणणाऱ्या कोळ्यांमधे जेंव्हा जाळ्यात किटक सापडतो तेंव्हा कोळी आधी खात्री करू घेतो की ते त्याच्यासाठी योग्य खाद्य आहे की नाही. जर एखादी विषारी गांधीलमाशी सारखी माशी कोळ्याच्या जाळ्यात अडकली तर कोळी सावधपणे जाउन, तीच्यामधे योग्य अंतर ठेवून तीला जाळ्यातून हळूहळू सोडवण्याच्या प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला चविष्ट नसलेले किटक किंवा विषारी, अखाद्य फुलपाखरे जाळ्यार अडकतात तेंव्हासुद्धा त्यांना न चावता त्यांना हळूहळू जाळ्यातून सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. यामुळे त्याचे उपयोगी रेषमाचे धागे आणि विष यांची बचत होते. खाण्याजोग्या फुलपाखरांना मात्र लगेचच दुसऱ्या प्रकारच्या जाळ्याने वेटोळे घातले जातात आणि नंतर सावकाश भुख लागल्यावर त्याच्यावर ताव मारला जातो.
कुठल्या जातीचा किटक जाळ्यात सापडला आहे याच्यावरूनसुद्धा त्याला कुठे आणि कसे चावे घ्यायचे हे ठरलेले असते. गांधीलमाशी असेल तर तीला डंख करणारा काटा पोटाला असतो, तिथे चावा घेतला जातो. मधमाशी असेल तर तीच्या तोंडाचा चावा घेतला जातो. लाथा मारणारा नाकतोडा असेल तर त्याच्या लांब पायाचा चावा आधी घेतला जातो. पण त्याच वेळेला जर पतंग किंवा घरमाशी असे निरूपद्रवी भक्ष्य असेल तर थेट त्याच्या धडाचा आधी चावा घेतला जातो. जाळे बनवणारे कोळी अश्या प्रकारे शिकार करतात पण फुलात लपून रहाणारा "क्रॅब स्पायडर" हे त्याच्या रंगामुळे आजूबाजूला मिसळून जातात आणि मग तीथे आकर्षित होणाऱ्या किटकावर हल्ला करतात. जमीनीवर रहाणारे कोळी धावत जाउन, उडी मारून इतर किटक, मुंग्या ह्यांना पकडून त्यांची शिकार करतात.
बऱ्याच वेळेला फुलपाखरांचे छायाचित्रण करताना त्यांच्यावर ताव मारणारे, त्यांची शिकार करणारे कोळी बघायला मिळतात. येऊरच्या जंगलात सुंदर, रंगीबेरंगी "कॉमन जझबेल" या फुलपाखराचे छायाचित्रण करत होतो. अचानक ते फुलपाखरू घाणेरीच्या झुडपात बांधलेल्या मोठ्या "जायंट वूड स्पायडर"च्या जाळ्यात अडकले. त्या कोळ्याची भलीमोठी मादी जाळ्यावर त्या फुलपाखराच्या धडपडीची स्पंदने जाणवून लगेचच धावून आली आणि काही सेकंदातच त्याला दुसऱ्या चिकट रेषमाच्या धाग्यांनी वेढून टाकले. फक्त काही सेकंद चाललेला हा शिकारीचा खेळ खरोखरच थरारक होता. दुसऱ्या छायाचित्रात दिसणारे "ग्लासी टायगर" जातीचे फुलपाखरू फुलावर आकर्षित झाले होते पण त्याची हालचाल थोडी वेगळी जाणवत होती. जवळ जाउन निरीक्षण केले तेंव्हा कळले की त्या फुलाच्य खाली "क्रॅब स्पायडर" लपला होता आणि त्याने त्या आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या फुलपाखराला पकडले होते. काहे सेकंदातच त्या फुलपाख्रराच्या शरीरातील सर्व जीवनरस शोषून घेतला आणि फोलकटासारखे उरलेले त्याचे पंख खाली सोडून दिले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


Monday, January 05, 2009

चिमुकल्यांचे स्थलांतर.
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते. आज जगात बरेच पक्षी, मोठे प्राणी, मासे स्थलांतर करतात पण अतिशय चिमुकली, नाजुकशी फुलपाखरेसुद्धा स्थलांतर करतात हे बऱ्याच जणांना कदाचित नवीन असेल. लहान आणि नाजुकसुद्धा असणारे हे किटक प्रचंड लां अंतराचेसुद्धा स्थलांतर सहजासहजी करतात. पण तरीसुद्धा पक्ष्यांचे स्थलांतर आणि फुलपाखरांचे स्थलांतर यात थोडा फरक आहेच. पक्ष्यांचे स्थलांतर दुमार्गी असते तर फुलपाखरांचे एकमार्गी असते. पक्ष्यांसारखी फुलपाखरे परत त्यांच्या जन्मस्थळाला भेट देत नाहीत. पण तरीसुद्धा ही नाजुकशी फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात एकदाच स्थलांतर करतात आणि हे अंतर अगदी २ कि.मी. पासुन ३००० कि.मी. पर्यंत लांब असू शकते. तापमानातील आणि आर्द्रतेतील बदल, अन्नझाडांची कमतरता आणि अचानक वाढणारी संख्या ही फुलपाखरांच्या स्थलांतराची मुख्य कारणे असू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे.
पक्ष्यांमधे अथवा प्राण्यांमधे स्थलांतराचा अभ्यास करणे तसे सोपे असते कारण एकतर ते आकाराने मोठे असतात, त्यांचे आयुष्य जास्त असते आणि दरवर्षी नित्यतियमाने ते त्याच त्याच जागी परत येतात. पण फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते. त्यांची पुढची पीढी परत उत्तरेकडे उडत येते. या स्थलांतराच्या उड्डाणाकरता ही फुलपाखरे सहसा एकाचे दिशेने दोन भौगोलीक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सुर्यप्रकाश चांगला असे त्या दिवशी होतात. या सुर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती उर्जा मिळते. या स्थलांतराकरता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उदायचे हे कसे ठरवतात आणि जाण्याच्यी ठिकाणी त्यांच्या अळ्यांना भरपुर अन्नझाडे उपलब्ध आहेत की नाही हे त्यांना कसे कळते याचे कोडे काही अजुन पर्यंत उलगडलेले नाही.
आपल्या भारतातसुद्धा दोन प्रकारचे फुलपाखरांचे स्थलांतर बघायला मिळते. पहिल्या प्रकारात एकाच जातीची हजारो फुलपाखरे एकाच दिशेने उडताना दिसतात. यामधे मिल्कवीड आणि व्हाईट्स जातीची फुलापाखरे जास्त असतात. हा उडण्याचा काळ किंवा हंगाम अनिश्चीत असतो. दुसऱ्या प्रकारात हवामानात प्रतिकुल बदल झाल्यामुळे फुलपाखरे दुसरीकडे जातात. या प्रकारात सहसा त्यांची संख्या कमी असते आणि ही डोंगराळ प्रदेशातून खालच्या बाजूस उडतात. अतिथंड हवामान किंवा प्रचंड पाउस हेच याचे मुख्य कारण असते. आज भारतात जवळपास ६० जातीची फुलपाखरे स्थलांतर करतात अशी नोंद आहे. यात प्रामुख्याने कॉमन क्रो, स्ट्राईप्ड टायगर, ब्लु टायगर, डार्क ब्लु टायगर, पी ब्लु, कॉमन अल्बाट्रॉस या जाती आहेत. आज परदेशात फुलपाखरांच्या स्थलांतराच्या वेळी फुलपाखरांचे तज्ञ अक्षरश: ग्लायडर विमान घेउन त्यांचा मागोवा घेतात. पण सध्यातरी आपल्याकडे अश्या सोयीही नाहीत आणि असे लोकही नाहीत. तरीसुद्धा अगदी अलीकडे दक्षिण भारतात यावर जोरात काम सुरू झाले आहे आणि लवकरच त्या अभ्यासाचा, नोंदींचा आपल्या सर्वांना फायदा होइल.
आज भारतात या फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यास न झाल्यामुळे त्यांची काही ठोस दिशा, वेळ आणि काळ आपल्याला माहित नाही. त्यामुळे या स्थलांतरचे छायाचित्रण म्हणजे मोठे कठिणच काम आहे. पण जर का तुम्ही हिवाळ्यात जंगलात फिरायला गेलात आणि तुम्हाला यदाकदाचीत ही स्थलांतर करणारी फुलपाखरे दिसली तर मात्र त्यांचे छायाचित्रण करायचा मजा येते. याचे कारण एरवी आपल्याला एखाद दुसरे फुलपाखरू दिसते पण यावेळी मात्र हजारो फुलपाखरे एकाच वेळेस त्या जागी आपल्याकरता उपलब्ध असतात आणि या हजारो उडणाऱ्या, बसलेल्या फुलपाखरांपैकी कोणाचे छायाचित्र काढू ? असाच प्रश्न कायम पडतो. एकाच झाडावर बसलेली अगदी शेकडो फुलपाखरे मी आंबोली, वेळास, फणसाड, येऊर येथे बघीतली आहेत. त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर त्यातली बरीचशी उडतात पण तरीसुद्धा तुमच्या "फ्रेम"मधे १०/१२ फुलपाखरे तरी हमखास येणारच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, January 01, 2009

या कोषामागे दडलय काय ?
काही किटक त्यांच्या आयुष्यामधे संपुर्ण अवस्थांतर करतात. याचा अर्थ असा की त्यांच्या अयुष्यातील एकंदर जीवन अवस्थांमधली कुठलीही अवस्था दुसऱ्या अवस्थांसारखी नसते. या किटकांची लहान पिल्ले ही त्यांच्या पालकांपेक्षा आकाराने, रंगाने, रूपाने एकदम वेगळी दिसणारी असतात. फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या बाबतीत असेच घडते. फुलपाखराची मादी अंडी घालते ती अंडी एकदम वेगवेगळ्या आकाराची, रंगाची असतात. त्यानंतर त्यातून बाहेर येणारी अळी ही तर वेगळेच रंग असलेली असते. ही अळी वाढता वाढता पाच वेळा कात टाकते आणि त्यानंतर तीचा वेगळ्याच आकाराचा, रंगाचा कोष होतो. हा कोष मात्र बिलकुल वाढत नाही आणि हालचालही करत नाही. काही दिवसानंतर या कोषातून एक सुंदर, नाजूक पण वेगळ्याच रंगाचे फुलपाखरू बाहेर येते.
असेच हे "टॉनी कोस्टर" फुलपाखरू नुकतेच कोषातून बाहेर येत आहे. याचा रंग त्याच्या काटेरी, लालसर तपकीरी अळीपेक्षा कीतीतरी वेगळा आहे. जरी याचे पंख पुर्ण उलगडलेले नाहीत, सुकलेले नाहीत तरी त्याचा रंग पिवळसर भगवा आहे आणि त्यावर पांढरे, काळे ठिपके आहेत हे स्पष्ट दिसत आहे. साधारणत: महिन्याभरापुर्वी हे एक अतिशय बारके पिवळसर अंड्याच्या स्वरूपात होते. त्यानंतर त्यातून अळी बाहेर आली आणि तीने तीच्या कवचावरच उच्च प्रतीच्या प्रथीनांकरता ताव मारला. या जातीची फुलपाखरे कृष्णकमळाच्या वेलीवर मोठ्या संख्येने अंडी घालतात. बऱ्याच वेळा त्यातून एकाच वेळेस अळ्या बाहेर येतात आणि त्याच पानावर काही काळ रहातात. या वेळेस त्या पानाचा वरचा नाजूक पापुद्रा खाउन ते दिवस काढतात. काही दिवसानंतर मात्र त्या स्वतंत्र, वेगळ्या होऊन नवीन पानावर जातात आणि एकट्या रहातात. ही लालसर काळपट दिसणारी अळी प्रचंड खादाड असते आणि अक्षरश: पानामागून पान आणि फांदीमागून फांदी संपवत जाते.
यांचा कोष मात्र दिसायला अतिशय सुंदर असतो. फांदीवर लटकणारा हा कोष जेमतेम पाउण इंचाएवढा लांब असतो. याचा रंग परत वेगळा आणि फिकट गुलबट, पांढरा असतो आणि त्यावर काळ्या रेघांची नक्षी असते. त्यावर भगवे बारीक ठिपकेसुद्धा असतात. अंदाजे ७/८ दिवस हा कोष वेलीवर उलटा लटकत असतो. ज्या दिवशी फुलपाखरू बाहेर येणार त्याच्या आदल्या दिवशी हा कोष काळपट होतो. त्याचे बाह्याआवरण पारदर्शक होते आणि आतल्या पंखांचा रंग, आणि अवयव स्पष्ट दिसू लागतात.
बदलापुरला मला ह्या फुलपाखराचा संपुर्ण जीवनक्रम एका दिवसात एकाच वेळेस अचानक दिसला. कृष्णकमळाच्या वेलीचा एक मोठा मांडव होता. तिथे एका ठिकाणी कोषातून नुकतेच फुलपाखरू बाहेर आले होते. नंतर आजूबाजूला बारकाईने बघीतले तर काही पानांवर पिवळसर अंड्यांचे पुंजकेच पुंजके मला दिसले. काही पानांवर अर्धी अंडी शाबूत होती तर अर्ध्या अंड्यातून अळ्या नुकत्याच वळवळत बाहेर आल्या होत्या. इतर काही पानांवर वेगवेगळ्या अवस्थांमधील अळ्या, वेगवेगळ्या आकारात होत्या. काही काही अळ्यांनी नुकतीच कात टाकलेली होती आणि त्यांचे चमकदार रंग आणि बाजूला जुनी कातही तशीच दिसत होती. पलीकडे एका फांदीवर ह्या जातीच्या फुलपाखरांची जोडी मिलनावस्थेमधे दिसली. मांडवाच्या खालच्या बाजूला एक मादी आपले पोट वळवून अंडी घालतानासुद्धा दिसत होती. एकाच दिवशी ह्या फुलपाखरांच्या सर्व अवस्था आणि जिवनक्रम एकाच ठिकाणी दिसणे म्हणजे खरोखरच नवलाची गोष्ट होती.
नंतर यातला कोष घरी आणून त्यातून फुलपाखरू बाहेर येतानाचे छायाचित्रण करायाला दिवाळीच्या दिवशी अक्षरश: पहाटे पाचला उठून बसलो. अंदाजे सव्वा सातच्या सुमारास हलकेच तो कोष फाटून ते फुलपाखरू बाहेर आले आणि त्याने पंखांची उघडमीट केली. त्यावेळेस ते पंख ओले आणि आक्रसलेले होते. ज्या क्षणाची मी दोन अडीच तास वाट बघीतली ते फुलपाखरू बाहेर येणे मात्र काही सेकंदातच पार पडले आणि जेमतेम काही छायाचित्रे मिळाली. अर्थातच एका स्थीर कोषातून ते चळवळे फुलपाखरू बाहेर येताना बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव मला आणि माझ्या कॅमेरालाही होता.
युवराज गुर्जर.

http://www.yuwarajgurjar.com/

फुलपाखरांचा व्हॅलेंटाईन डे.
फुलपाखरे लहान, नाजूक आणि तशी अल्पायुषी असल्यामुळे त्यांना त्यांचा वंश पुढे वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो. या थोडक्या वेळातच नराला योग्य त्या मादीला शोधून तीला स्वत:कडे आकर्षित करून मिलन करायचे असते. अर्थातच त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा हा व्हॅलेंटाईन जरी "डे" नसला तरी हा काळ महत्वाचा असतो. आपल्या जातीच्या, योग्य आणि मिलनास तयार मादीला शोधण्यासाठी नर गोन मार्ग अवलंबतात. एक तर ते उंच फांदीवर जाउन टेहेळणी करतात. यामुळे ते आजुबाजुने जाणाऱ्या माद्यांवर लक्ष ठेवतात आणि त्याच वेळेस दुसरा कोणी प्रतिस्पर्धी घुसखोर नर त्यांच्या या हद्दीत येत नाही ना हे सुद्धा पहातात. दुसऱ्या मार्गामधे नर आजुबाजुला जीथे त्याला माद्या मिळण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणांना भेटी देत रहातात. जर का या दोनही मार्गांमुळे त्याला मादी दिसली तर त्याचे पुढचे काम सुरू होते. मादी दिसली की त्याचे अर्धे काम झाले असले तरी त्याला योग्य जात, लिंग, मादी मिलनास तयार आहे की नाही याची शहानिशा करावी लागते. त्याचप्रमाणे मादीसुद्धा नर मिलनास तयार असेल तर नर योग्य आकाराचा, उठावदार रंगाचा आणि वासाचा आहे की नाही हे पडताळून बघते.
प्रत्यक्ष बघून जरी नर मादी शोधत असला तरी बऱ्याच वेळेस त्यांच्या शरीरातून प्रसरण झालेल्या संप्रेरकांमुळे त्यांना योग्य तो "सिग्नल" मिळतो. या करता उडणारे नर आजुबाजुने जाणाऱ्या माद्यांच्या आसपास उडत रहातात. यामुळे मादीला संप्रेरकांचा वास येउन जर ती मिलनास तयार असेल तर थांबते आणि जवळपास उतरते. नर तीच्या आसपास उडत रहातो आणि तीच्या पंखांना, पायांना, स्पर्शीकांना स्पर्श करत रहातो. मादीने जर अनुकूल हालचाली केल्या तर तो तीच्या शेजारीच उतरतो. यानंतर त्यांचे प्रत्यक्ष मिलन घडून येते. मिलनाचा हा काळ अगदी अर्ध्या तासापासून ते २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. काही काही जाती सकाळी मिलन करणे पसंद करतात तर काही जाती दुपारी मिलन करतात. जर का या मिलन जोडीला धोका जाणवला तर सर्वसाधारणपणे मोठी असलेली मादी तशीच त्या अवस्थेत नराला घेउन उडत जाउन दुर सुरक्षीत ठिकाणी बसते. या मिलनानंतर मादीचे मुख्य काम असते ते योग्य असे अन्नझाड निवडून त्यावर अंडी घालण्याचे. काही जातीची फुलपाखरे एकेकटे अंडे घालतात त्यामुळे अर्थातच त्यांना बऱ्याच अन्नझाडांना भेटी द्याव्या लागतात. तर काही जातीची फुलपाखरे पुंजक्याने अंडी घालतात त्यामुळे त्यांचे एक दोन झाडांवरच काम निभावून जाते. बऱ्याच वेळेस या अन्नझाडांच्या आसपासच या माद्या आढळत असल्यामुळे बरेचसे नर सुद्धा या झाडांच्या आसपास त्यांच्याभोवती पिंगा घालताना आढळतात.
फुलपाखरांचे छायाचित्रण करताना जर का आपल्याला त्यांच्या सवयी माहित असतील तर आपल्याला त्यांची अधिक छान छायाचित्रे मिळू शकतात. एकदा नागलाच्या जंगलात हिवाळ्यात पहाटे गेलो असताना "कॉमन गल" जातीचा नर मादीच्या आसपास उडताना मला दिसला. बराच वेळ त्याने मादीच्या आसपास घिरट्या घालवण्यात घालवला. काही वेळानंतर जेव्हा त्याला समजले की मादी मिलनास तयार आहे तेंव्हा तो तीच्या अगदी बाजूस उतरला आणि त्यांचे मिलन सुरू झाले. अर्थात हे असे होणार हे मला माहित असल्यामुळे मी बराच काळ तीथे थांबून राहिलो आणि मला त्यांची बरीच वेगवेगळी छायाचित्रे मिळाली. मागे अरालमच्या अभयारण्यात एक भलामोठा "ब्लू मॉरमॉन" चा नर त्या जातीच्या मादीच्या कोषाबाहेर ती बाहेर येण्याची वाट बघत बसला होता. कोषाबाहेर मादी आल्यावर त्याला इतरत्र शोधाशोध न करता तीथल्या तीथे ती मिलनास आयती मिळणार होती. थोडा वेळ झाल्यावर अक्षरश: कोषातून बाहेर पडल्यापडल्या त्याने तीला मिलनास उद्युक्त केले आणि चक्क कोषाच्या वरच त्यांचे मिलन सुरू झाले. सोबतच्या छायाचित्रात अगदी झळाळणारी नवी कोरी मादी आणि नराची मिलन जोडी आणि खाली रिकामा कोष दिसत आहे. मात्र अशी छायाचित्रे मिळायला थोडेफार नशीब आणि त्यांचा अभ्यास असायला लागतो.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/