Friday, February 19, 2016

ब्ल्यू बॉटल.

स्वालोटेल गटातील ब्ल्यू बॉट्ल हे एक नितांत सुंदर फुलपाखरू. या फुलपाखराचा आकार मोठा म्हणजे साधारणत: ८० ते ९० मि.मि. एवढा असतो. याच्या पंखांचा रंग गडद तपकीरी, राखाडी असतो पण त्यावर असलेल्या झळाळाणाऱ्या गडद हिरवट निळ्या पट्ट्यामुळे याचे नामकरण ब्ल्यू बॉटल असे केले आहे. खालच्या पंखाच्या इथे सुरू झालेला हा निळा पट्टा वरच्या पंखावर जाताना त्याचे मोठ्या ठिपक्यांमधे परावर्तन होते. स्वालोटेल जातीचे हे फुलपाखरू असल्यामुळे दोन्ही पंख टोकाकडे निमुळते असतात. मागील पंखाच्या टोकाला शेपट्या असतात आणि त्याच्या बाजूला निळसर रंगाचे चंद्रकोरीसारख्या ठिपक्यांची नक्षी असते. या नक्षीच्या बाजूलाच अतिशय फिकट लालसर ठिपके असतात. या फुलपाखरातील नर आणि मादी दिसातला सारखेच असतात.


सकाळच्या कोवळया उन्हात मधाकरता अनेक प्रकारच्या फुलांना ते भेटी देतात. मात्र या फुलपाखराचा उडण्याचा वेग प्रचंड असतो. एका फुलावर जेमतेम काही क्षणच ती असतात आणि लगेच वेगाने पुढच्या फुलाला भेट देतात. फुलांतील मधाप्रमाणेच अतिपक्व फळे, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष, त्यांची विष्ठा यावर सुद्धा ही फुलापाखरे आकर्षित झालेली आढळतात. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे कोरडे ओढे, नाले यांच्या आसपास आढळतात. या फुलपाखरांना "चिखलपान" अतिशय प्रिय असल्याने ती परत परत त्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला दिशू शकतात. हे फुलपाखरू जर का चिखलपान करत असेल तर त्याचे छायाचित्रण आपल्याला सहज करता येते. भारतात हे फुलपाखरू घनदाट जंगलाप्रमाणेच अगदी दाट वस्तीतील बागांमधेसुद्धा सहज दिसून येते.


युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

चकचकीत अँगल्ड सनबिम.

या फुलपाखराचा आकार लहान म्हणजे साधारणत: ३५ ते ४२ मि.मि. एवढा असतो. आपल्याकडे ते पावसाळ्याच्या नंतरच्या महिन्यात दिसायला लागते आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या महिन्यात प्रामुख्याने दिसते. लायसिनॅडी गटातले हे फुलपाखर भारतात सर्वत्र आढळते. भारताबरोबरच पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि श्रिलंका इथेसुद्धा आढळते. या फुलपाखराचा रंग पांढरट चंदेरी असतो. पंखाची खालची बाजू ही पांढरट चंदेरी असते आणि त्यावर राखाडी झाक असते. पुढील पंखाची वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची शेपटाकडची टोके निमुळती आणि त्रिकोणाकार असतात. खालच्या बाजूच्या पंखांवर अतिशय बारीक काळ्या रंगाच्या ठिपक्यांची पखरण असते. पंखाच्या मध्यभागी एक अस्पष्ट काळसर रेघ असते. पंखाच्या बाहेरच्या कडा या लालसर भगव्या रंगाच्या असतात.


या फुलपाखराच्या जातीमधे नर आणि मादी दोघे जरी बाहेरून अगदी सारखे दिसत असले तरी त्यांच्या पंखांचा वरचा रंग मात्र अगदी वेगळा असतो. यामुळे उडताना पंखाचा वरचा रंग दिसला की आपण त्यांना सहज वेगळे ओळखू शकतो. नराच्या पंखांचा वरचा रंग गडद भगवा असतो आणि पंखाच्या कडांना जाडसर करडा, तपकीरी पट्टा असतो. मादीमधे हा कडेचा पट्टा अजून जाड असतो आणि भगव्या रंगाऐवजी पांढरा रंग असतो. हे फुलपाखरू उन्हाळ्यात इतर फुलपाखरांबरोबर चिखलपान करताना सर्रास आढळते. मात्र इतर जाती जश्या मोठ्या संख्येने चिखलपान करतात तसे हे फुलपाखरू मात्र एकेकटेच चिखलपान करताना दिसते. या जातीचे नर एखाद्या उंच झाडावर बसून आजूबाजूच्या भागाची टेहेळणी करताना दिसतात, जर का दुसरा नर त्या भागात आला तर त्याच्या पाठीमागे जाउन त्याला त्या भागातून हुसकावून लावतात.

युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

Saturday, February 06, 2016

भडक बॅरोनेट.

बॅरोनेट हे आपल्याकडे पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यात सहज दिसते. जर्द भगवा रंग ही याची खासियत. या फुलपाखराचा आकार मध्यम असून त्याच्या पंखांचा विस्तार हा साधारणत: ६० ते ७० मि.मि. एवढा असतो. याचे पुढचे आणि मागचे पंख गडद भगव्या रंगाचे असतात आणि त्यावर काळ्या रंगाची, कंसाकार वळणावळणाची नक्षी असते. पंखांची खालची बाजू वरच्या बाजूच्या भगव्या रंगाचीच असते पण हा रंग तेवढा गडद नसतो आणि त्यावर पांढऱ्या आणि निळसर रंगाची झळाळी असते. तिथे अतिशय बारीक काळ्या, लाल ठिपक्यांची नक्षी असते. पांढरया रंगाचे दोन मोठे चट्टेसुद्धा असतात. यांच्या स्पृशा काळ्या रंगाच्या असून त्यांची टोके गडद पिवळ्या / भगव्या रंगाची असतात. या जातीतील नर आणि मादी दोघेही एकसारखेच दिसतात.


पावसाळ्याच्या महिन्यात जंगलातील पाय़वाटांवर आणि रस्त्यावरच हे फुलपाखरू बसलेले आढळते. त्याच्या जरा जवळ जायचा प्रयत्न केला तर थोडेसेच पुढे जाउन बसते. आपण परत पुढे गेलो की हे फुलपाखरू परत आपल्याला हुलकावणी देउन अजून पुढे जाउन बसते. सकाळच्या कोवळ्या उन्हात ही जास्त उडताना दिसतात आणि एखाद्या फांदीच्या टोकावर बसून आजूबाजूला टेहेळणी करतात. बऱ्याच वेळेला इतर फुलपाखरांच्या पाठीमागे जलद उडत जाउन, त्यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावतात.  उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला ही फुलपाखरे कोरडे ओढे, नाले यांच्या आसपास आढळतात. या फुलपाखरांना "चिखलपान" अतिशय प्रिय असल्याने ती परत परत त्या आणि आजूबाजूच्या ठिकाणी आपल्याला दिशू शकतात.


युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

मांसाहारी एपफ्लाय.

फुलपाखरे म्ह्टली की ती फुलांना भेटी देणार आणि त्यातला गोड मध पिणार आणि त्यांच्या अळया ह्या अतिशय खादाड आणि झाडांची पाने फस्त करण्यात पटाईत असतात. अर्थात प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसेच काहीसे या फुलपाखरांच्या अळ्यांच्य बाबतीतही होते. या एपफ्ल्याय फुलपाखरांच्या अळ्या चक्क मांसाहारी असतात. आपल्या पिकांना उपद्रवी ठरणाऱ्या मिलीबग आणि स्केल इन्सेक्ट या किटकांवर या एपफ्ल्याय फुलपाखराच्या अळ्या गुजराण करतात. या एपफ्लाय फुलपाखराची मादी ज्या झाडावर हे मिलीबग अथवा स्केल इन्सेक्ट असतात त्या झाडावर अगदी त्या किटकांच्या मधे अंडी घालते. इतर सर्वसाधारण फुलपाखरांच्या अळ्या जश्या दिसतात त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या ह्या फुलपाखरांच्या अळ्या असतात. त्यांना त्या मिलीबग आणि स्केल इन्सेक्ट मधे वावरायचे असल्यामुळे यांचा एकंदर अविर्भाग अगदी त्यांच्यासारखाच असतो. यांचे पाय एकदम लहान असतात, शरीर चपटे आणि आखुड असते आणि त्यावर मेणचट आवरण असते.


हे एपफ्लाय फुलपाखरू आकाराने एकदम लहान असते आणि ते लायसॅनिड किंवा ब्लू या वर्गात येते. पंखांचा वरचा रंग हा गडद तपकीरी असून तो टोकाकडे अधिक गडद होत जातो आणि त्या ठिकाणी तिथे पिवळट रंगाचा एक ठिपका असतो. पंखांच्या खालचा रंग मात्र चकचकीत पांढरा, राखाडी असून त्यावर फिकट राखाडी, तपकीरी रंगाच्या नागमोडी रेघांची नक्षी असते. या पंखावर एक राखाडी रंगाचा ठिपकासुद्धा असतो. या फुलपाखराच्या स्पृशा या टोकाला वळणदार असून गडद भगव्या रंगाच्या असतात. या फुलपाखराला जर का जवळून बघितले तर पटकन नजरेत भरतात ते त्याचे उठावदार हिरवे, पोपटी डोळे. या फुलपाखराचे उडणे अगदी जलद असते आणि एकदम वेडीवाकडी वळणे घेत ते आजूबाजूला उडत रहाते, मधेच पटकन जमिनीलगतच्या झाडांवर बसते आणि लगेच परत उडून गायब होते.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com