Friday, February 19, 2016

चकचकीत अँगल्ड सनबिम.

या फुलपाखराचा आकार लहान म्हणजे साधारणत: ३५ ते ४२ मि.मि. एवढा असतो. आपल्याकडे ते पावसाळ्याच्या नंतरच्या महिन्यात दिसायला लागते आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या महिन्यात प्रामुख्याने दिसते. लायसिनॅडी गटातले हे फुलपाखर भारतात सर्वत्र आढळते. भारताबरोबरच पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि श्रिलंका इथेसुद्धा आढळते. या फुलपाखराचा रंग पांढरट चंदेरी असतो. पंखाची खालची बाजू ही पांढरट चंदेरी असते आणि त्यावर राखाडी झाक असते. पुढील पंखाची वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची शेपटाकडची टोके निमुळती आणि त्रिकोणाकार असतात. खालच्या बाजूच्या पंखांवर अतिशय बारीक काळ्या रंगाच्या ठिपक्यांची पखरण असते. पंखाच्या मध्यभागी एक अस्पष्ट काळसर रेघ असते. पंखाच्या बाहेरच्या कडा या लालसर भगव्या रंगाच्या असतात.


या फुलपाखराच्या जातीमधे नर आणि मादी दोघे जरी बाहेरून अगदी सारखे दिसत असले तरी त्यांच्या पंखांचा वरचा रंग मात्र अगदी वेगळा असतो. यामुळे उडताना पंखाचा वरचा रंग दिसला की आपण त्यांना सहज वेगळे ओळखू शकतो. नराच्या पंखांचा वरचा रंग गडद भगवा असतो आणि पंखाच्या कडांना जाडसर करडा, तपकीरी पट्टा असतो. मादीमधे हा कडेचा पट्टा अजून जाड असतो आणि भगव्या रंगाऐवजी पांढरा रंग असतो. हे फुलपाखरू उन्हाळ्यात इतर फुलपाखरांबरोबर चिखलपान करताना सर्रास आढळते. मात्र इतर जाती जश्या मोठ्या संख्येने चिखलपान करतात तसे हे फुलपाखरू मात्र एकेकटेच चिखलपान करताना दिसते. या जातीचे नर एखाद्या उंच झाडावर बसून आजूबाजूच्या भागाची टेहेळणी करताना दिसतात, जर का दुसरा नर त्या भागात आला तर त्याच्या पाठीमागे जाउन त्याला त्या भागातून हुसकावून लावतात.

युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

No comments: