पावसाळ्यात ग्रास डेमन हे फुलपाखरू आपल्याला अगदी सहज दिसते आणि ते ओळखण्यासाठीसुद्धा खुप सोपे असते. याचा

आकार मध्यम असून त्यांचा रंग काळा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही ठिपक्यांची नक्षी पंखांच्या वर आणि खाली दोनही बाजूंना असते. यांचे नर आणि मादी सारखे दिसत असले तरी यांचा ड्राय सिझन फॉर्म (उन्हाळ्यातील रंगसंगती) थोडासा वेगळा दिसतो. यावेळी त्यांचे पंख थोडेसे पिवळसर असतात आणि त्यावर लालसर तपकिरी रंगाची छटासुद्धा असते. पावसाळ्यात ही फुलपाखरे जेंव्हा पानावर बसतात तेंव्हा ती थोडेसे पंख उघडून बसतात आणि सतत ते पंख असे काही हलवतात की त्यांच्या ठिपक्यांच्या मुळे ते पंख चक्राकार फिरत असल्याचा भास होतो. यासाठी ते त्यांचे

खालचे पंख आधी हलवतात आणि ही क्रीया अर्धवट असतानाच वरचे पंखसुद्धा हलवायला सुरवात करतात. या त्यांच्या अजब आणि एकमेव वैशिष्ट्यामुळे त्यांना आपण जर एकदा बघितले तर ती आपण सहज ओळखू शकतो.
हे फुलपाखरू सहज दिसणारे असले तरी यांची उडण्याची पद्धत जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत जाणारी असते. त्यातून याचा रंग काळा, पांढरा असल्यामुळे झाडीतील दाट काळोखात ती बसली तर पटकन दिसत नाहीत. मात्र यांचा वावर रानहळद, पेव या झाडांच्या आसपास असतो. कारण या जातींवर या फुलपाखराच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालण्यापुर्वी मादी बऱ्याच झाडांचे आधी परिक्षण करते आणि जेंव्हा तीला एखादे झाड योग्य वाटेल तेंव्हाच त्या झाडाच्या पानाखाली आपले पोट वळवून एक लालसर रंगाचे, गुळगुळीत, गोलाकार अंडे घालते. अंडयातून बाहेर आल्यावर अळीअ प्रथम अंडयाचे टरफल

मटकावते आणि नंतर त्या झाडाच्या पानाची एक छोटीशी वळवून आपल्याकरता खोली बनवते. इतर फुलपाखरांच्या अळीप्रमाणे ही अळीसुद्धा खादाड असली तरी थोडीशी लाजाळू असते आणि आपला खाण्याचा प्रोग्राम फक्त रात्रीच उरकते. अळीनंतर कोषसुद्धा त्याच झाडावर होतो आणि त्याचा रंगसुद्धा अळीच्य रंगाशी मिळताजुळता असतो. कोषाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबलचक सोंड. ही सोंड त्यांच्या पंखाच्यासुद्धा बाहेर आलेली असते. अर्थातच प्रौढ फुलपाख्रराची सोंडसुद्धा शरीराच्यामानाने फारच मोठी प्रगत झालेली असते. "स्कीपर" जातीतील हे फुलपाखरू असल्यामुळे त्यांना फुलांतील मध खुप प्रिय असतो आणि त्यातून या लांबलचक सोंडेमुळे त्यांना घंटेसारख्या किंवा खोलगट फुलांतील मधसुद्धा सहज पीता येतो.